Jump to content

राघव यादवीयम्

श्री राघव यादवीयम् हे एक संस्कृत स्तोत्र आहे. इ.स. १७व्या शतकातील कांचीपुरम् येथील कवी वेंकटध्वरि यांनी हे स्तोत्र रचले आहे.


रचना:

या स्तोत्राला अनुलोम-विलोम काव्य असेही म्हणले जाते. या स्तोत्रात एकूण ३० श्लोक आहेत. हे श्लोक सरळ वाचल्यास रामकथा तयार होते आणि उलट वाचल्यास कृष्णकथा तयार होते. अशा रीतीने केवळ ३० श्लोक मात्र कृष्णकथेचे ३० श्लोक धरले तर एकूण ६० श्लोक या स्तोत्रात आहेत.


शीर्षक :

या स्तोत्राच्या नावातूनच हे स्तोत्र श्रीराम व श्रीकृष्ण यांची स्तुती करणारे आहे हे ध्वनित होते. राघव म्हणजेच रघुराजाच्या कुळामधील राजा श्रीराम व श्रीकृष्ण यादव कुळातील होता. म्हणून या स्तोत्रास राघवयादवीयम् असे नाव दिले आहे.


अनुलोम-विलोम काव्य :

या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक सरळ वाचल्यास रामकथा तयार होते व उलट वाचल्यास कृष्णकथा तयार होते. उदाहरणार्थ या स्तोत्रातील पहिला श्लोक असा आहे-

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः।

रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥

सरळ अर्थ (श्रीरामस्तुती) : ज्यांच्या ह्रदयात सीता वास करते व ज्यांनी आपली पत्नी सीतेसाठी सह्याद्री पर्वतरांग ओलांडून लंकाधिपती रावणाचा वध केला व वनवास पूर्ण करून अयोध्येस परत आले अशा प्रभू श्रीरामांना मी वंदन करतो.


उलट क्रमाने हा श्लोक असा होतो-

सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः।

यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥

अर्थ(श्रीकृष्णस्तुती) : रुक्मिणी तसेच इतर गोपस्त्रियांचे पूज्यस्थान असणाऱ्या तसेच सदैव लक्ष्मीसमवेत विराजमान असणाऱ्या व ज्यांचे तेज अनेक रत्नांच्या तेजापेक्षाही अधिक आहे अशा भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो.


रचनाकर्ता :

या स्तोत्राची रचना श्री वेंकटध्वरि यांनी केली आहे. त्यांचा जन्म अरसनीपलाई या कांचीपुरम् जवळच्या गावात झाला. त्यांचे काव्यावर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी एकूण १४ काव्यांची रचना केली. त्यापैकी लक्ष्मी सहस्रनाम ही त्यांची प्रमुख रचना मानली जाते.