Jump to content

रस्ता सुरक्षा दल

     वाहतूक शाखेची प्रमुख दोनच कार्य आहेत. एक वाहतूक सुरळीत ठेवणे आणि दुसरे म्हणजे आवश्यक ती सर्व उपाययोजना करून रस्ते अपघातास प्रतिबंध करणे. यासाठी वाह्तूक नियंत्रण शाखेची तीन विभाग आहेत. पहिला विभाग वाहतूक शिक्षण दुसरा विभाग वाहतूकीचे नियोजन व तिसरा विभाग वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत. यामध्ये वाहतूक शिक्षण हा पाया आहे. वाहतूक नियमांचे शिक्षण व नियोजनावर भर दिल्यास अंमलबजावणी वरील ताण कमी होतो, असे संशोधनांनी सिद्ध केले आहे. वाहतूक शिक्षण विभाग अंतर्गत आर.एस.पी. हा विषय राबवण्यात येतो.
     आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. ते देशाचे भविष्य आहेत व त्यांना संस्कारक्षम अशा शालेय वयात पदकाव्यात, वाहतूक नियमन, प्रथमोपचार, अग्निशमन व नागरी संरक्षण असे सव्रांगीण प्रशिक्षण दिल्यास ते कर्तव्य दक्ष नागरिक बनतील. या उदात्त हेतूने महाराष्ट्रातील बऱ्याच शाळामधून आर.एस.पी. हा विषय शिकविण्यात येत आहे.

रस्ता सुरक्षा दलाचा इतिहास

     लोक संख्येतील अफाट वाढ व देशाची औद्योगिक प्रगती, यामुळे वाहनांची संख्या अफाट वाढली आहे. अत्यंत वेगवान अशा वाहनांबरोबरच वाहनांच्या अपघातातही लक्षणीय वाढ झालेली आहे. या गोष्टीची दखल घेऊन पोलीस खात्यातील वाहतूक नियंत्रण विभागाने सन १९४८ मध्ये रस्ता सुरक्षिततेचे  शिक्षण देणाच्या उद्देशाने एक प्रचार शाखा सुरू केली. या मोहिमे अंतर्गत, शाळकरी मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. रस्त्यांवरील सुरक्षेबाबत मुलांना चित्रपट दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमास शाळेकडून, विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून प्रशंसनीय असा प्रतिसाद मिळाला. यातूनच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन व रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्याची संकल्पना पुढे आली.
     फेब्रुवारी सन १९५१ मध्ये भरडा न्यु हायस्कूल, मुंबई येथे मुलांचे एक पथक निवडण्यात आले. त्यांना वाहतूक नियमाचे प्रशिक्षण देण्यात आले.  या प्रशिक्षित मुलांनी उत्कृष्टपणे त्यांचे कर्तव्य पार पाडले. जनतेने व वृत्तपत्राने या शालेय विद्यार्थ्यांची खूप प्रशंसा केली अशा रीतीने शालेय सुरक्षा छात्र सैनिकांच्या कामास सुरुवात झाली. पुढे सन १९५७ मध्ये त्यांचा पथकास, रस्ता सुरक्षा दल असे नाव देण्यात आले. सन १९६२ला विदर्भ बुनियादी हायस्कूल ,नागपूर येथे  वाहतूक सुरक्षा दलाची स्थापना करणेत आली. व १८ मे१९७६ला "वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन,नागपूर"या नावाने संस्था पंजिबद्ध झाली.(MAH 60/76/N & No.F/1921/N.).RSP नागपूर संघटनेद्वरे राज्यातील माध्यमिक शाळेतील बाल सैनिकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून १)पद कवायत,२)वाहतूक नियंत्रण,३) नागरी संरक्षण, ४)अग्निशमन व ५) प्रथमोपचार आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण दिले जाते.   रस्ता सुरक्षा दलाचे ब्रीदवाक्य “आमचे जीवन सेवेसाठी” असे आहे.  

रस्ता सुरक्षा दलाचा ध्वज

     ध्वजाची लांबी – रुंदी २/३ प्रमाणात आहे. ध्वजाचा रिंग गडद अंजिरी असून, मध्यभागी आठ आऱ्यांचे चक्र असलेले पुष्पचक्र असते. त्या चक्राच्या आत आर.एस.पी. अक्षरे व त्याखाली जिल्ह्याचे नाव अंकित केलेले असते. वरती ‘रस्ता सुरक्षा दल’ व खाली ‘आमचे जीवन सेवेसाठी’ अशी अक्षरे आहेत. 

रस्ता सुरक्षा दलाचा उद्देश

१.आत्मरक्षा, जनसेवा व देशभक्तीची भावना वाढीस लावणे.

२. विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध रीतीने राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे.

३. सामाजिक व सार्वजनिक सेवा कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे.

४. कोणत्याही संकटाच्या वेळी देशाचे व स्वतःचे रक्षण करणे.

५. जीवनाच्या फावल्या वेळेचा उपयोग सामान्य जनतेची सेवा करण्यात खर्ची घालणे.

६. विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन, सेवा, सहिष्णुता, समता, बंधुता इत्यादी गुणांचा विकास करणे.

७. वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार करून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करणे.