Jump to content

रस्किन बाँड

रस्किन बॉंड
रस्किन बॉंड
जन्म १९ मे इ.स. १९३४
कसौली, हिमाचल प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा इंग्रजी
कार्यकाळइ.स. १९५१ पासून
वडील ऑब्रे बॉंड
आई एदिथ
पुरस्कारपद्मश्री(१९९९), साहित्य अकादमी पुरस्कार(१९९२)
संकेतस्थळhttp://ruskinbond.bookchums.com/


रस्किन बॉंड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या देहरादून या नयनरम्य शहरात राहतात. बॉंड यांनी कथा, ललित लेखन, कादंबऱ्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

बालपण

कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बॉंड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत.

रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणाऱ्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.

इंग्लंडला प्रयाण

सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि येथील बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अ‍ॅंग्लो इंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मनाने मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झऱ्याकाठी पाणी प्यायला येणाऱ्या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला. लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकऱ्या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी झुरत राहिला. त्याला भारतातल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले.

भारतात पुनरागमन

'द रूम ऑन द रूफ' या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरुण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन ऱ्हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बॉंडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली.

बिबीजी

देहराडूनमध्ये रस्किनला राहायला त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने-बिबीजीने घर दिले. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्‍नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. जिचे वाणसामानाचे दुकान होते. अशी ती देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई होती.

दुपारी बिबीजी रस्किनला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचे आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घाले. मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. तिथे वीज नव्हती. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. त्या प्रकाशात रस्किनचे लेखन चालूच राही.

चित्रपट आणि मानसन्मान

रस्किन बॉंडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन्स' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट, वगैरे). एक था रस्टी’ या नावाने त्याच्या ’रस्टी’कथांवर आधारलेली दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्री मिळाली,. आणि नंतर २०१४ साली पद्मभूषण पुरस्कारही मिळाला.

रस्किन बॉंड यांची पुस्तके

  • All roads lead to Ganga
  • Angry River
  • The Best of Ruskin Bond
  • The blue umbrella
  • Delhi Is Not Far
  • A Face in the Dark and Other Hauntings
  • A Flight of Pigeons
  • Along Mandakini
  • Friends in Small Places
  • Great trees of Gharwal
  • Growing up with trees
  • The Hidden Pool (कादंबरी)
  • Immortal Stories
  • Indian Railway Stories
  • Landore days
  • Love among the bookshelves
  • Nature Omnibus - A Bond with Nature (तीन पुस्तकांचा संच)
  • Night Train at Deoli: And Other Stories
  • Notes from a small room
  • Once upon a mountain's time
  • Panther's Moon.
  • Platform number eight
  • Rain in the Mountains
  • Road to the Bazaar
  • The Room on the Roof (रस्किन बॉंडचे पहिले पुस्तक - वयाच्या १७व्या वर्षी लिहिलेले; मराठी अनुवाद - आशा साठे)
  • Ruskin's Bond Book of Nature
  • Rusty
  • Rusty Comes Home (कादंबरी)
  • At School with Ruskin Bond
  • A Season of Ghosts
  • Strangers On the Roof
  • Susanna's Seven Husbands (कादंबरी)
  • Tales of old Mussoorie
  • Time Stops at Shamli and Other Stories
  • Our Trees Still Grow in Dehra
  • Vagrants in the valley (The room on the roofचा पुढचा भाग; मराठी अनुवाद - आशा साठे)
  • When Darkness Falls and Other Stories
  • White clouds-Green Mountains
  • वगैरे वगैरे.

रस्किन बॉंडची हिंदीत रूपांतर झालेली पुस्तके

  • उड़ान
  • एडवेंचर्स ऑफ रस्टी
  • नाईट ट्रेन ऐट देओली
  • भारत के बच्चे
  • रंग-बिरंगी कहानियॉं
  • रस्किन बॉण्ड की लोकप्रिय कहानियॉं
  • रूम ऑन द रूफ
  • वे आवारा दिन
  • साहसिक कहानियॉं
  • हास्य विनोद की कहानियॉं