रसवंतीगृह
उसाचा रस काढून विकणाऱ्या दुकानास महाराष्ट्रात गुऱ्हाळ किंवा रसवंतीगृह असे म्हणतात. सर्वसाधारणत: उन्हाळ्यात रसवंतीगृहात मोठीच गर्दी असते. उसाचा रस मानवी आरोग्यास चांगला असतो. महाराष्ट्रात बहुतांश एसटी बसस्थानकाच्या आवारांत रसवंतीगृह असते.
रस काढण्याची पद्धत
विजेवर चालणाऱ्या यंत्रामध्ये उस, लिंबू टाकून त्याचा रस काढला जातो.
पुढे तो रस गाळण्यातून गाळून व त्यात बर्फ मिसळून ग्राहकांना पिण्यासाठी दिला जातो. तसेच येथे बिनबर्फाचा रस सुद्धा मिळतो.
बर्फ
सदर बर्फ हा बर्फाच्या कारखान्यातून एखाद्या चारचाकी वाहनातून / बैलगाडीतून आणला जातो. रसवंतीगृहात कोणतेही शीतकपाट (फ्रीज) उपलब्ध नसतानादेखील भर उन्हाळ्यात हा बर्फ न वितळता कित्येक तास घनरूपात राहू शकतो कारण सदर बर्फ तयार करताना त्यात काही अशी रसायने मिसळलेली असतात, की जी मानवी शरीरास घातक असतात.
रस विकण्याची पद्धत
रस शक्यतो काचेच्या पेल्यात ग्राहकांना पिण्यासाठी दिला जातो.
रस हा लहान (अर्धा) पेला, मोठा पेला, जंबो ग्लास किंवा लिटरवर विकला जातो.
बरेच ग्राहक रसात मीठ टाकून रस पितात.
पेले धुण्याची पद्धत
क्वचितच काही ठिकाणी हे काचेचे पेले नळाखाली धुतले जातात.
बहुतेक ठिकाणी पेले धुण्यासाठी पाण्याने भरलेल्या दोन बादल्या ठेवलेल्या असतात.
ग्राहकाने रस पिल्यावर तो काचेचा पेला पहिल्या बादलीतील पाण्यात बुचकळून काढतात आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या बादलीतील पाण्यात बुचकळून काढतात. नंतर तो ओला पेला टेबलावर पालथा घालून ठेवतात आणि पुन्हा अन्य ग्राहकास रस पिण्यासाठी देतात.
त्यानंतर इतर पेलेदेखील बादलीतील त्याच पाण्यात बुचकळून काढतात. बादलीतील पाणी दिवसभर तसेच असते.
पेले धुण्याच्या या पद्धतीमुळे एखाद्या ग्राहकाने रस पिताना त्या पेल्याला लागलेली त्याच्या तोंडातील लाळ, थुंकी ही तो पेला धुताना त्या बादलीतील पाण्यात मिसळते. इतर पेले त्याच पाण्यात बुचकळून काढत असल्याने सदर लाळ, थुंकी ही इतर पेल्यांनादेखील लागते. आणि त्याच पेल्यातून रस पिताना इतर ग्राहकांच्या तोंडाद्वारे त्यांच्या शरीरात जाते.
जर रस पिणाऱ्या एखाद्या ग्राहकास एखादा संसर्गजन्य रोग झाला असल्यास त्यांच्या लाळ, थुंकीद्वारे त्या रोगाची लागण रस पिणाऱ्या अन्य ग्राहकांसदेखील होऊ शकते.