रवी पटवर्धन
रवी पटवर्धन | |
---|---|
जन्म | रवी पटवर्धन ६ सप्टेंबर १९३७ |
मृत्यू | ६ डिसेंबर २०२० ठाणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | अग्गंबाई सासूबाई |
पत्नी | नीता |
अपत्ये | २ पुत्र, १ कन्या |
रवी पटवर्धन (जन्म : ६ सप्टेंबर १९३७; - डिसेंबर २०२०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २००हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.
आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आले होते. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
पटवर्धनांची आई नव्वदीपर्यंत ठणठणीत होती. नऊवारी नेसून बुलेटवर मागे बसून बिनधास्त फिरायची. तरुणपणी ती घोडेस्वारीसुद्धा करायची. तिची व्यायामाची आवड रवी पटवर्धन ह्यांच्यात उतरली.
"माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे," असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे ६ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणायला ‘मृत्यू’ जिंकला, पण म्हणून रवी पटवर्धन यांची ‘जिद्द’ हरली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते मृत्यूला झुंज देत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहिले, हाच त्यांचा विजय.वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही. अखेरपर्यंत ते रंगभूमीची सेवा करत राहिले.
वयाच्या ८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
कथा कुणाची व्यथा कुणाला
१९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात पटवर्धन होते. रिझर्व्ह बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे प्रवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि हा प्रयोग झाला. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्याने ‘तुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल का’, अशी विचारणा पगार यांनी केल्यावर बँकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. रवी पटवर्धन या नाटकात ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका करत होते.
अन्य नाटके
पुढे याच यशवंत पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’ या व्यावसायिक नाटकातही रवी पटवर्धन यांनी काम केले. १९७० मध्ये ‘नाट्यनिकेतन’च्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो.ग. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या.
इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेन्री’ करायचे. या नाटकानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.
पुढे रवी पटवर्धनांनी विजया मेहता यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘अमात्य राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’ या भूमिका केल्या; ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली.
१९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात रवी पटवर्धांना काम मिळाले मला काम मिळाले. त्यांना या नाटकामुळे नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले.
दूरचित्रवाणी मालिका
दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात ‘गप्पागोष्टी’ नावाचा एक २२ मिनिटांचा उपकार्यक्रम असे. ‘गप्पागोष्टीं’मध्ये रवी पटवर्धन ‘वस्ताद पाटील’ असत. त्यांची ही भूमिका ज्यांनी पाहिली त्यांच्या ती अजूनही स्मरणात असेल. शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. मनोरंजनाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रबोधन होईल, असा हा ‘गप्पागोष्टी’ नामक कार्यक्रम होता. पटवर्धनांचा रेडिओसाठी प्रायोजित कार्यक्रम करणारा एक चमू होता. त्यातले मानसिंग पवार हे माया गुजर, राजा मयेकर, वसंत खरे, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी आणि रवी पटवर्धनांना घेऊन गप्पागोष्टी सादर करीत. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की ‘बीबीसी’ या जगविख्यात वृत्तवाहिनी कडूनही त्याची दखल घेतली गेली. १०० भाग प्रसारित झाल्यानंतर तो कार्यक्रम थांबविला. हा कार्यक्रम ‘वन शॉट, वन टेक’ व्हायचा. चित्रीकरणापूर्वी थोडा वेळ तालीम करून थेट सादरीकरण व्हायचे.
रवी पटवर्धन यांची नाटके आणि (त्यांतील त्यांची भूमिका)
- अपराध मीच केला
- आनंद (बाबू मोशाय)
- आरण्यक (धृतराष्ट्र)
- एकच प्याला (सुधाकर)
- कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान)
- कोंडी (मेयर)
- कौंतेय
- जबरदस्त (पोलीस कमिशनर)
- तुघलक (बर्नी)
- तुझे आहे तुजपाशी (काकाजी)
- तुफानाला घर हवंय (आप्पासाहेब, बापू)
- पूर्ण सत्य
- प्रपंच करावा नेटका
- प्रेमकहाणी (मुकुंदा)
- बेकेट (बेकेट)
- भाऊबंदकी
- मला काही सांगायचंय (बाप्पाजी)
- मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस)
- विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर)
- विषवृक्षाची छाया (गुरुनाथ)
- वीज म्हणाली धरतीला
- शापित (रिटायर्ड कर्नल)
- शिवपुत्र संभाजी (औरंगजेब)
- सहा रंगांचे धनुष्य (शेख)
- सुंदर मी होणार (महाराज)
- स्वगत (एकपात्री प्रयोग, जयप्रकाश नारायण)
- हृदयस्वामिनी (मुकुंद)
रवी पटवर्धनांनी काही नाटकांची निर्मितीही केली आहे, ती नाटके अशी :
- एकच प्याला
- तुफानाला घर हवंय
रवी पटवर्धनांची भूमिका असलेले चित्रपट
- अंकुश (हिंदी)
- अशा असाव्या सुना
- उंबरठा
- दयानिधी संत भगवान बाबा
- ज्योतिबा फुले
- झाँझर (हिंदी)
- तक्षक (हिंदी)
- तेजाब (हिंदी)
- नरसिंह (हिंदी)
- प्रतिघात (हिंदी)
- बिनकामाचा नवरा
- सिंहासन
- हमला (हिंदी)
- हरी ओम विठ्ठला
दूरचित्रवाणी कार्यक्रम / मालिका
- अग्गंबाई सासूबाई मालिका
- आमची माती आमची माणसं (शेतकऱ्यांसाठीचा दैनिक मराठी कार्यक्रम) : यातला गप्पागोष्टी हा उपकार्यक्रम (वस्ताद पाटील यांची भूमिका)
- एक वाडा झपाटलेला [मालिका]
- तेरा पन्ने (तेरा भागांची हिंदी मालिका, मुख्य भूमिका हेमा मालिनी)
- महाश्वेता (हिंदी मालिका, तत्त्वनिष्ट व ध्येयनिष्ठ शिक्षक)
- लाल गुलाबाची भेट (मराठी नाटक, लेखक : रत्नाकर मतकरी)