रदोये डोमानोविच
रदोये डोमानोविच | |
---|---|
रदोये डोमानोविच | |
जन्म नाव | रदोये डोमानोविच |
जन्म | १६ फेब्रुवारी १८७३ ओवसिष्टे, सर्बिया |
मृत्यू | १७ ऑगस्ट, १९०८ (वय ३५) बेलग्रेड, सर्बिया |
राष्ट्रीयत्व | सर्बिया |
कार्यक्षेत्र | लेखक, पत्रकार, शिक्षक |
कार्यकाळ | इ.स.१८९५ ते इ.स.१९०८ |
प्रसिद्ध साहित्यकृती | नेता (१९०१) आणि इतर |
रदोये डोमानोविच (१६ फेब्रुवारी १८७३ – १७ ऑगस्ट १९०८) हे एक सर्बियन लेखक, पत्रकार, शिक्षक होते ज्यांच्या उपहासात्मक लघुकथा प्रसिद्ध आहेत.
चरित्र
रदोये डोमानोविच यांचा जन्म मध्य सर्बियामधील ओवसिष्टे या गावात झाला, त्यांचे वडील स्थानिक शिक्षक व उद्योजक मिलोश डोमानोविच होते तर आई परसीदा त्सुकिच, पहिल्या आणि दुसऱ्या सर्बियन उठावातील एक लष्करी अधिकारी पावले त्सुकिच यांची वंशज होती. त्यांचं बालपण क्रग्यूयेवत्स जवळील यारूशित्स या गावात गेलं जिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यांनी माध्यमिक शिक्षण क्रग्यूयेवत्समधून पूर्ण केलं आणि फिलॉसॉफीची पदवी बेलग्रेड विद्यापीठामधून मिळवली जिथे ते सर्बियन भाषा आणि इतिहास शिकले.
१८९५ मध्ये, डोमानोविचना सर्बियाच्या दक्षिण भागातील पायरॉत येथे शिक्षकाचं काम करण्याची संधी मिळाली, जो भाग नुकताच ऑटोमन साम्राज्यातून मुक्त झाला होता. पायरॉत मध्ये, ते याशा प्रोदानोविच (१८६७–१९४८) या शिक्षक व कार्यकर्त्याला भेटले ज्यांनी त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाला आकार देण्यास मदत केली. तिथेच ते त्यांची त्यांच्या भावी पत्नी म्हणजेच स्रेमस्की कार्लोवतसी गावातील गरीब शिक्षिका, नतालिया राकेतीच (१८७५–१९३९) यांच्याशी भेट झाली. ज्यांनी त्यांना त्यांच्या लहान आणि धकाधकीच्या जीवनात साथ दिली. त्यांना तीन मुलं होती.
ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या पिपल्स रॅडीकल पार्टीमध्ये गेल्यामुळे, त्यांचा ओब्रेनोविच घराण्याच्या सरकारशी संघर्ष सुरू झाला. आणि त्यांची १८९५ च्या शेवटी व्रन्ये येथे बदली करण्यात आली व १८९६ मध्ये पुन्हा लेस्कोवत्स येथे बदली करण्यात आली. शिक्षक म्हणून काम करत असतानाच डोमानोविच यांची लिखाणाची कारकीर्द सुद्धा सुरू झाली. त्यांनी पहिली सत्यकथा १८९५ मध्ये प्रकाशित केली. १८९८ मध्ये सरकारविरोधात पहिल्यांदाच लोकांसमोर आल्यानंतर त्यांना व त्यांच्या पत्नीला सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आले आणि डोमानोविच त्यांच्या कुटुंबासहित बेलग्रेड मध्ये आले.
बेलग्रेड मध्ये, ते काही लेखकांसोबत “तारका” नावाच्या साप्ताहिकासाठी व विरोधी, राजकीय वर्तमानपत्र “प्रतिध्वनी” साठी काम करू लागले. याच वेळी ते त्यांच्या “सैतान” आणि “भावनांचे निर्मूलन” यासारख्या उपहासात्मक लघुकथा लिहून प्रकाशित करू लागले. त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कथा, “नेता” (१९०१) आणि “त्रासर्बिया” (स्त्रादिया, १९०२) यांच्या प्रकाशनामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. या कथांमधून त्यांनी सरकारचा ढोंगीपणा आणि चुका लोकांसमोर आणल्या.
१९०३ मध्ये अलेक्झांडर ओब्रेनोविच यांची राजवट संपवणाऱ्या चळवळीनंतर, डोमानोविच यांना शिक्षण मंत्रालयात लेखनिकाची नोकरी मिळाली, आणि नवीन सरकारने त्यांना एक वर्षासाठी जर्मनीमध्ये जाण्याची परवानगी दिली. हा काळ त्यांनी म्युनिक मध्ये व्यतीत केला. सर्बियामध्ये परतल्यावर, समाजामधील बदलाच्या अभावामुळे रदोये फार निराश झाले. त्यांनी स्वतःचं राजकीय साप्ताहिक “त्रासर्बिया” सुरू केलं. त्यातून ते नव्या लोकशाहीमधील कमजोर मुद्द्यांवर भाष्य करत होते, पण त्यांच्या लेखनात पूर्वीसारखं सामर्थ्य व स्फूर्ती राहिली नव्हती.
न्यूमोनिया आणि क्षयाबरोबर दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर, रदोये डोमानोविच यांचा ३५व्या वर्षी, १७ ऑगस्ट १९०८ रोजी मध्यरात्रीनंतर अर्ध्या तासात मृत्यू झाला. त्यांच्यावर बेलग्रेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं बाकीचं अप्रकाशित लेखन पहिल्या महायुद्धामध्ये नष्ट झालं.[१]
साहित्य
रदोये डोमानोविचयांच्या सर्वात प्रसिद्ध साहित्यातील काही कथा:
- सैतान, १८१८
- भावनांचे निर्मूलन, १८१८
- ठसा, १८११
- नेता, १९०१
- प्रिन्स मार्को पुन्हा एकदा सर्बियामध्ये, १९०१
- सामान्य सर्बियन बैलाचा तर्क, १९०२
- मृत समुद्र, १९०२
- आधुनिक उठाव, १९०२
- त्रासर्बिया, १९०२