रत्नागिरी
?रत्नागिरी महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ११ मी |
जिल्हा | रत्नागिरी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 415639 • +०२३५२ • MH08 |
रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१]
हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणितज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.
इतिहास
पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
ब्रह्मदेशाचा (म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारताच्या पहिले मंदिर आहे.
भूगोल
रत्नागिरी शहर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे.
लोकसंख्या
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार रत्नागिरीची लोकसंख्या ७६,२३९ एवढी आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. ८६% पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लिम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत. रत्नागिरीतील ११% लोकसंख्या ही ६ वर्षाखाली आहे.
प्रमुख व्यवसाय
मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट,भारती शिपियार्ड, गद्रे मरिन प्रोडक्ट्स, आणि जे.के. फाईल्स हे ७६,२३९ एवढी मधील मुख्य उद्योग आहेत. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.
शिक्षणसंस्था
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, ह्यामुळे रत्नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे.
नागरी सुविधा
येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] येथे एक विमानतळ सुद्धा आहे. येथे बस स्थानक व रेल्वे स्थानक आहे. लोकांच्या सुविधेसाठी D-mart व Reliance आहे. भरपूर किराणा दुकाने व इतर दुकाने सुद्धा आहेत.
वाहतुकीची साधने
रत्नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख हमरस्ते रत्नागिरीमध्ये मिळतात.
रत्नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्नागिरी शहरातूनच पार पडला होता. छशिट-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, लोटिट-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटिट-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांमुळे रत्नागिरी ते मुंबई हा जलद रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.
रत्नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून ते मिरकरवाडा येथे आहे. जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स व अल्ट्राटेक या कंपन्यांच्या खाजगी जेट्टी रत्नागिरीमध्ये आहेत. रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे.
पर्यटनस्थळे
टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर, भाट्ये चौपाटी, काळा समुद्र, सुवर्णदुर्ग किल्ला
रत्नागिरी किल्ला
हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे. हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशांना उघडतो. डिसेंबर २०१७ मध्ये जिद्दी माउन्टेनिअर्स या रत्नागिरीतील साहसी खेळांच्या / गिर्यारोहकांच्या संघटनेने या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध लावला आहे. याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने येथे हौशी पर्यटक आणि साहसी शहरवासियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
चित्रदालन
- बाळ गंगाधर टिळकांचे जन्मस्थान
- कवी केशवसुतांचे जन्मस्थान
- आरे-वारे समुद्रकिनारा
- रत्नागिरी समुद्रकिनारा
- धमापूर, मालवण
- कोकण रेल्वे
- कान्होजी आंग्रे पुतळा रत्नागिरी
- रत्नदुर्ग
- वेळणेश्वर, रत्नागिरी
- वेळणेश्वर, रत्नागिरी, अजून एक दृश्य
- वेळणेश्वर, रत्नागिरी समुद्रकिनारा
- वेळणेश्वर, रत्नागिरी
- देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग
- नारळ संशोधन केंद्र रत्नागिरीनारळ संशोधन केंद्र रत्नागिरी
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,०४ एप्रिल २०२२
- ^ /https://www.bankofindia.co.in/
बाहेरील दुवे
- रत्नागिरी रॉयल ऑरियंट ट्रेन
- रत्नागिरी.आयवार्प.कॉम Archived 2011-07-20 at the Wayback Machine.
- फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज