Jump to content

रजनी लिमये

रजनी लिमये
जन्म रजनी दातीर
१७ मे, इ.स. १९३७
मृत्यू १८ जानेवारी, इ.स. २०१८
नाशिक
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.ए. मराठी, संस्कृत; डिप्लोमा इन टीचिंग ऑफ मेंटली रिटार्डेड
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
जोडीदार नागेश लिमये
अपत्ये गौतम लिमये
पुरस्कार
  • १९८६ मध्ये केंद्र सरकारचा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार, १९८८ मध्ये ‘दलित मित्र पुरस्कार, लोककल्याण पुरस्कार, श्यामची आई पुरस्कार, संस्कृतीवैभव पुरस्कार, इ.


रजनी नागेश लिमये (माहेरच्या रजनी दातीर) (जन्म : नाशिक, १७ मे १९३७; - नाशिक, १८ जानेवारी २०१८) या शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका होत्या. त्यांनी 'प्रबोधिनी न्यास' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेची १ जानेवारी १९७७ साली स्थापना केली. या संस्थेंतर्गत केलेल्या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.[][]

शिक्षण

रजनी दातीर यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या सरस्वती मंदिरात झाले आणि माध्यमिक शिक्षण पुणे, पंढरपूर, पनवेल येथे झाले. सन १९५४मध्ये पनवेलच्या के. व्ही. कन्या विद्यालयातून त्या माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी ठाणे केंद्राच्या गुणवत्ता यादीत त्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी होत्या. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयामधून मराठीसंस्कृत विषय घेऊन त्या एम. ए. झाल्या. कोल्हापूरच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी बी.एड.ची पदवी संपादन केली. पुण्याच्या कामायनी प्रशिक्षण महाविद्यालयातून डी.टी.एम.आर. म्हणजे डिप्लोमा इन टीचिंग ऑफ मेंटली रिटार्डेड ही पदविका प्रथम क्रमांकाने मिळवली.

कारकीर्द

त्यांनी १९६४मध्ये नाशिकच्या पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. त्या इंग्रजी, मराठी व संस्कृत ह्या भाषांच्या शिक्षिका होत्या. माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना त्यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक मार्गदर्शन शिबिरांमध्ये त्या मार्गदर्शक करत असत.

रजनी लिमये यांना आपला मुलगा गौतम मतिमंद आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जानेवारी १९७७मध्ये मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली. रजनी लिमये यांच्याबरोबर नागपूरच्या ‘नंदनवन’ संस्थेत प्रशिक्षण घेऊन आलेल्या अहोर नावाच्या शिक्षिका होत्या. दोघींनी मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. त्यांच्या शाळेमुळे मुलांचे मतिमंदत्व स्वीकारणाऱ्या जागरूक पालकांच्या पाल्यांची संख्या वाढत गेली. मतिमंद मुलांच्या शिक्षणासंदर्भात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षिकांच्या सहकार्याने शाळेला स्थिरता प्राप्त झाली.

रजनी लिमये यांनी १९७७ साली ‘प्रबोधिनी न्यास’ या संस्थेची स्थापना केली. १९८३मध्ये संस्थेसाठी नगरपालिकेने नव्या पंडित कॉलनीत जागा दिली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री. लतीफ ह्यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन झाले. दोन वर्षांनी ‘प्रबोधिनी न्यास’च्या इमारतीचे उद्घाटन वि. वा. शिरवाडकरांच्या हस्ते झाले. १९८९मध्ये पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या उपप्राचार्या असताना त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली व संपूर्ण वेळ प्रबोधिनीचे कार्य केले. ‘प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करून त्याच्या प्रमुख समन्वयिका म्हणून त्यांनी काम केले. प्रबोधिनी न्यासाच्या विकासासाठी रजनी लिमये यांनी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा ह्या देशांचा चाळीस दिवसांचा अभ्यासदौरा केला. तेथील विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी दिल्या. सिंगापूर, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ ह्या विषयावर त्यांनी निबंध वाचन केले. राष्ट्रीय न्यासाच्या जिल्हा समिती सदस्या, प्रबोधिनी पालकसमितीच्या अध्यक्षा म्हणून रजनी लिमये यांनी काम केले.[]

प्रबोधिनी न्यास

या शाळेत तीन ते अठरा वर्षे वयोगटातील मुले शिकतात. शारीरिक विकास, स्वावलंबन, मनोसामाजिक कौशल्य आणि संपर्क कौशल्य ही या शाळेची चार प्रमुख उद्दिष्टे आहेत. मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणयोग्य, प्रशिक्षणयोग्य व नुसते सांभाळण्यास योग्य अशा तीन गटांत विभागले जाते. त्याप्रमाणे क्रमश: लेखन-वाचन-अंकगणित, व्यवहार करण्यापुरते उद्योग व सांभाळ असे तीन प्रकारचे संस्कार त्यांच्यावर होतात. मानसोपचार, शारीरोेपचार या विषयांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची योजना केली जाते. मुलांजवळ असलेल्या बुद्धीचा उपयोग कसा करावयाचा याचे शिक्षण त्यांना देतात. पॅकिंग करणे, फाईल्स तयार करणे अशी सोपी व पुनरावृत्ती असणारी कामे त्यांना शिकवतात. शाळेत इतर सामान्य शाळांप्रमाणेच विविध सणसमारंभ, विविध दिन साजरे केले जातात.[] ही मुले सहलीचा आनंद घेतात. राख्या, ग्रीटिंग कार्ड्स तयार करणे, धान्ये निवडणे यांसारखी कामे करतात. काही मुले बालवाडीपासून दहावीपर्यंत पुढे जातात.

अठरा वर्षें पूर्ण झालेल्या मुलांना शाळेत ठेवता येत नाही. त्यांच्यासाठी नाशिकमधील सातपूर भागात संरक्षित कार्यशाळा आहे. या शाळेत शिवणकाम, बाइंडिंग, सुतारकाम असे व्यवसाय शिक्षण दिले जाते. यांतून त्यांना स्वतःच्या पायावर काही अंशी उभे राहण्याचा आत्मविश्‍वास मिळतो. कार्यशाळेच्या शेजारच्या जागेत मुलांसाठी वसतिगृह आहे. तिथे वीस मुलांची सोय आहे. सर्व मिळून दीडशे मुलांची मान्यता संस्थेला मिळाली आहे.

प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी वीस शिक्षकांना शिक्षण दिले जाते. या केंद्रास दिल्लीच्या ‘राष्ट्रीय पुनर्वास संस्थाना’ची मान्यता मिळाली आहे. शिक्षकांना स्पेशल डी.एड. पदविका मिळते. सर्व शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषदांच्या, नगरपालिकांच्या शाळांतून मोबाईल टीचर म्हणून नोकरी मिळते.[]

पुरस्कार

  • १९८६मध्ये केंद्र सरकारचा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार
  • १९८८मध्ये ‘दलित मित्र पुरस्कार
  • लोककल्याण पुरस्कार
  • श्यामची आई पुरस्कार
  • संस्कृतीवैभव पुरस्कार

साहित्यिक योगदान

रजनी लिमये ह्या लेखिका, कवयित्रीही आहेत. ‘गोडुली गाणी’ (बालकांची गाणी) व ‘जागर’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.

मृत्यू

१८ जानेवारी २०१८ रोजी रजनी लिमये यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे निधन | eSakal". www.esakal.com. 2020-03-06 रोजी पाहिले.
  2. ^ ऑनलाईन, सामना. "रजनीताई लिमये | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-06 रोजी पाहिले.
  3. ^ Rai, Shashikala (2013). Zinda Kahaniyan (हिंदी भाषेत). वाणी प्रकाशन. ISBN 978-93-5072-460-6.
  4. ^ "Prabodhini Trust :: An Institution For the care of Mentally Challenged ::" (इंग्रजी भाषेत). 2020-03-06 रोजी पाहिले.
  5. ^ "Prabodhini Trust :: An Institution For the care of Mentally Challenged ::" (इंग्रजी भाषेत). 2020-03-06 रोजी पाहिले.
  6. ^ "माझी आक्का". Loksatta. 2020-03-06 रोजी पाहिले.