रघुनाथ जगन्नाथ सामंत
रघुवीर सामंत ( वाई, २४ डिसेंबर १९०९; - दादर-मुंबई, १७ सप्टेंबर १९८५) हे मराठी लेखक, प्रकाशक व संपादक होते. यांचे मूळ नाव रघुनाथ जगन्नाथ सामंत. ‘रघुवीर सामंत’ या नावाने, तसेच ‘कुमार रघुवीर’ ह्या टोपण नावाने त्यांनी लेखन केले.[१]
जीवन व कार्य
रघुवीर सामंतांचे वडील जगन्नाथ सामंत सबजज्ज होते. वाई , भिवंडी, डहाणू, कल्याण, धुळे , पुणे, ठाणे या ठिकाणी नोकरी करून शेवटी ते ठाणे येथे स्थायिक झाले. मुलगा रघुवीर याला शिक्षणासाठी त्यांनी वसतिगृहात ठेवले होते.
इ.स. १९३३ साली रघुवीर सामंतांनी 'पारिजात प्रकाशन' सुरू केले. त्यांची तीन वर्षांची मुलगी ज्योती अकाली निधन पावल्यामुळे तिच्या स्मृत्यर्थ सामंतांनी इ.स. १९४३ साली 'अमरज्योति वाङमय' ही प्रकाशनसंस्था सुरू केली. बालवाङमय प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. दोन्ही प्रकाशनसंस्थांतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, सांघिक अभिनयगीते, नाट्यात्मक कादंबऱ्या, ग्रामीण जीवनावरील कादंबऱ्या, नाटके, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर छोटी पुस्तके आणि विज्ञानकोशाचे दोन खंड अशी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तके इ.स. १९३३ ते १९६५ या कालावधीत सामंतांनी प्रकाशित केली.
इ.स. १९३४ च्या जानेवारी महिन्यात सामंतांनी 'पारिजात' मासिक सुरू केले. जानेवारी, इ.स. १९३४ ते फेब्रुवारी, इ.स. १९३५ या वर्षभराच्या काळात त्यांनी 'पारिजात'चे चौदा अंक प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९४० साली जानेवारी महिन्यात 'ज्योती' नावाचे मासिक सुरू करून फेब्रुवारी, इ.स. १९४१ पर्यंत त्याचेही चौदा अंक प्रकाशित केले.
कोल्हापूरच्या एस.एम.टी.टी.(Shri Maharani Tarabai Govt. College of Education) महाविद्यालयातून सामंतांनी अध्यापनक्षेत्रातील पदवी मिळवली होती. इ.स. १९३८ ते १९५० या काळात त्यांनी गिरगावातील 'चिकित्सक हायस्कूल' मध्ये शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९४१ साली त्यांनी 'चिरंजीव' या चित्रपटनिर्मितीत भाग घेतला होता. 'चिकित्सक'मधील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी खंडाळ्याला 'घरकुल' हे लाॅजिंग बोर्डिंग इ.स. १९५० ते १९५३ या काळात चालवले. इ.स. १९५७ साली रघुवीर सामंत पुन्हा अध्यापन व्यवसायाकडे वळाले. इ.स. १९५७-५८ ही दोन वर्षे पालघरजवळच्या सातपाटी येथील 'आदि जनता हायस्कूल'मध्ये मुख्याध्यापक, इ.स. १९५९ साली माहीम-मुंबईच्या लोकमान्य विद्यालयात फर्स्ट असिस्टंट व इ.स. १९६० साली मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यावर इ.स. १९६१ च्या जानेवारी महिन्यात ठाकुरद्वार(मुंबई)च्या मराठा मंदिर शाळेत त्यांची बदली करण्यात आली. इ.स. १९६१ च्या जून महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन सामंत अध्यापन व्यवसायापासून दूर झाले.
लेखन
पस्तीस वर्षात सामंतांनी शब्दचित्रे, स्वभावचित्रे, लघुनिबंध, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, गीते, बालगीते, अभिनयगीते, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तके असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. 'ज्ञानपारिजात' या विज्ञानकोशाची केलेली निर्मिती हे रघुवीर सामंतांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेले उल्लेखनीय काम होते.
हृदय हा रघुवीर सामंत यांचा पहिला व्यक्तिचित्रणसंग्रह. त्याकाळी व्यक्तिचित्रणांना शब्दचित्रे म्हणत. या संग्रहाचे चार अंतर्गत विभाग असून त्यांत १२ चित्रणे आहेत. या संग्रहात व्यक्तिचित्रांबरोबर व्यक्तिप्रधान कथाही आहेत. या शब्दचित्रांपैकी 'सुभान्या' हे व्यक्तिचित्रण अतिशय गाजले होते. सन १९३५ ते १९५५ याकाळात त्यांच्या लेखनावर त्यांच्या अध्यापन व्यवसायाचा प्रभाव आहे. आदर्शवादी, बोधवादी व कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या 'ह्रदय'मधील कथा वास्तववादी व सोज्वळ आहेत.
रघुवीर सामंतांनी प्रकाशित केलेले साहित्य
नाव | साहित्यप्रकार | भाषा | प्रकाशन | प्रकाशन वर्ष |
---|---|---|---|---|
अमर विश्व साहित्य | कथा | अनुवादित बालसाहित्य | इ.स. १९६२ | |
आजची गाणी | सांघिक गेय गीते | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३९ |
आदर्श कृषीवल | चरित्र | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४४ |
आपले व्यक्तित्व | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५९ | |
आम्हाला जगायचंय | कादंबरी | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५४ |
आम्ही खेडवळ माणसं | ग्रामीण जीवनावरील कादंबरी | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९४८ |
उपकारी माणसे (खंड १- प्रवासातील सोबती) | पत्रात्मक कादंबरी | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३८ |
उपकारी माणसे (खंड २- अभ्रपटल) | कथात्मक कादंबरी | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३८ |
उपकारी माणसे (खंड ३- आकाशगंगा) | मिश्र कादंबरी | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३८ |
उपकारी माणसे (खंड ४- घरोघरच्या देवी) | नाट्यात्मक कादंबरी | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४४ |
एम. व्हिटॅमिन | दोन अंकी नाटक | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५७ |
गीतज्योती | मुलांसाठी अभिनय गीते | मराठी | अमरज्योती वाङ्मय | इ.स. १९४४ |
जिवंत झरे | कथासंग्रह | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५९ |
जीवनगंगा | कादंबरी | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४७ |
टाॅम सायरची साहसे | कथासंग्रह | अनुवादित बालसाहित्य | इ.स. १९५७ | |
तांडा | कथासंग्रह | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९४६ |
तारांगण | अभिनव चित्रबंध | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४० |
दिलजमाई | कथा-निबंध | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५९ |
जलदेवतेचा न्याय | संपादित बालसाहित्य | मराठी | इ.स. १९४३-४४ | |
पणत्या | लघुनिबंध | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३८ |
मडक्यातील न्याय | संपादित बालसहित्य | मराठी | इ.स. १९४३-४४ | |
मसालेवाईक प्राणी - पहिले सात | स्वभावचित्रे | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४० |
मसालेवाईक प्राणी - दुसरे सात | स्वभावचित्रे | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४० |
माणसाचे शेपूट | मराठी | इ.स. १९४४ | ||
माॅबी डिकचा राक्षस | ानुवादित बालकादंबरी | मराठी | इ.स. १९६२ | |
मृगजळातील वादळे | कथा-निबंध | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९५६ |
रक्तनी शाई | कविता व सांघिक गीते | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४७ |
रजःकरण | कथा-निबंध | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९४१ |
वाळूतील पाउले | कथाशब्दचित्रे | मराठी | पारिजात प्रकाशन, मुंबई | इ.स. १९३४ |
व्यवहारचतुर कसे व्हावे? | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई | इ.स. १९५९ | ||
सुरंगीची वेणी | रूपांतरित रशियन कथा | मराठी | भारतगौरव ग्रंथमाला, मुंबई | इ.स. १९३५ |
हृदय | व्यक्तिचित्रणसंग्रह | मराठी | इ.स. १९३२ | |
ज्ञानपारिजात (परडी १ ली), मी अनंत विश्वाचा रहिवासी | कोश | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९६२ |
ज्ञानपारिजात (परडी २ री), अथांग अंतराळात मायलेकरे | कोश | मराठी | अमरज्योती वाङ्मय, मुंबई | इ.स. १९६४ |
संदर्भ आणि नोंदी
- ^ अ.र. कुलकर्णी. "सामंत, रघुवीर जगन्नाथ". १५ जुलै २०१४ रोजी पाहिले.