रघुनाथ अनंत माशेलकर
रघुनाथ अनंत माशेलकर | |
पूर्ण नाव | रघुनाथ अनंत माशेलकर |
जन्म | १ जानेवारी १९४३ माशेल, गोवा |
निवासस्थान | पुणे, महाराष्ट्र |
नागरिकत्व | भारतीय |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | रासायनिक अभियांत्रिकी |
प्रशिक्षण | रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई |
ख्याती | हळदीच्या स्वामित्वाची लढाई |
पुरस्कार | पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री शांती स्वरूप भटनागर पुरस्कार |
वडील | अनंत माशेलकर |
आई | अंजली माशेलकर |
रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.[२] रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.
आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत.
बालपण आणि शिक्षण
रघुनाथ माशेलकरांचा जन्म गोवा राज्यातील माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्. एम् शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.
डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळणार आहे. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. २३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.
डॉ. माशेलकरांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’अंजनी माशेलकर फाऊंडेशन’ स्थापन केले आहे.
हळदीचा पेटंट
जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हणले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले.
भारतीयांच्याकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला.
बासमती तांदूळ
हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध १८९८ मध्येच लावला, पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते. अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात.
रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- फेलो, रॉयल सोसायटी.
- निदेशक, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR).
- पद्मश्री.
- पद्मभूषण.
- पद्मविभूषण
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१३)
- ज्ञानविज्ञान ब्रह्मर्षी पुरस्कार (२०१८)
बाह्यदुवे
- "मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान - रघुनाथ अनंत माशेलकर डॉ.मानसी राजाध्यक्ष यांचा लेख". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-12-28 रोजी पाहिले.
संदर्भ
- ^ IChemE Gala Awards Programme, 25 October 2007 Archived 2009-08-29 at the Wayback Machine. Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar
- ^ CSIR