Jump to content

रईस खान

उस्ताद रईस खान (जन्म : इंदूर, २५ नोव्हेंबर, इ.स. १९३९; - कराची, ६ मे, इ.स. २०१७) हे एक सतारवादक होते. त्यांचे बालपण मुंबईत गेले. ग्वाल्हेरच्या मेवाती घराण्यातील हद्दू-हस्सू खॉं, बंदे अली खॉं, नथ्थन खॉं, वाजिर खॉं, मुराद खॉं यांच्यासारख्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या रईस खॉं यांना त्यांचे वडील महम्मद खॉं यांच्याकडून सतारीचे शिक्षण मिळाले.

वडील महम्मद खॉं स्वतः रुद्रवीणावादक होते. रुद्रवीणेचा जन्म बीन या वाद्यापासून झाला. या वाद्याच्या वादनात विशिष्ट अशा गायकी अंगाच्या लकबी असतात. रईस खॉं यांनी आधीच्या पिढीतल्या थोर सतारवादकांपेक्षा वेगळी शैली निर्माण करण्याचा ध्यास घेतला, तेव्हा त्यांना या बीनवादनातील अनेक कल्पना उपयोगी पडल्या असाव्यात. त्यांच्या वादनातील मींडकाम जेवढे अप्रतिम, तेवढीच गमक आणि गतकारीही अप्रतिम होती. हिंदी चित्रपटांतील शेकडो गीते ज्या अनेक कारणांसाठी अजरामर झाली, त्यामध्ये खॉंसाहेबांच्या सतारीच्या तुकडय़ांनी आणलेली लज्जत हेही एक महत्त्वाचे कारण होते.

पाकिस्तानी गायिका बिल्किस खानूम यांच्याशी विवाह झाल्यानंतर ते इ.स. १९८६मध्ये पाकिस्तानात गेले आणि नंतरच्या काळात त्यांचे भारतात येणे अवघडच होऊन बसले.

पाकिस्तान सरकारने रईस खान यांना पाकिस्तानमधला तिसऱ्या क्रमांकाचा सितारा-इ-इम्तियाझ हा नागरी किताब देऊन गौरवले.