Jump to content

योगेश्वरी

मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शहर परळी वैजनाथपासून अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहू दिशेस महाद्वार आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळयांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरूषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. नवरात्रात येथे महोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो. शहरापासून २-३ कि. मी. अंतरावर बालाघाटातील एका डोंगरात मराठीतील आद्यकवी मकुंदराजांची समाधी आहे. हा संपूर्ण परिसर शांत व सुंदर आहे. जवळच जयंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात.

संतकवी दासोपंत यांनी अंबेजोगाईस वास्तव्य करून आपली साहित्य रचना केली. त्यांचे निवासस्थान एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. अमलेश्वर, सकलेश्वर ही मंदिरे जांभुळवेट व अनेक सिद्ध पुरूषांची साधनास्थाने या परिसरात आहेत.