येसूबाई सावरकर
सरस्वतीबाई उर्फ येसूबाई गणेशपंत सावरकर या स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या वाहिनी म्हणून येसूवहिनी या नावाने सामान्यपणे ओळखल्या जातात.[१][२] रूढार्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग नसला तरीही आपले पती गणेशपंत सावरकर (बाबाराव) आणि दीर विनायक सावरकर तसेच नारायण सावरकर यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आत्मनिष्ठ युवती संघाची केलेली स्थापना, कवी गोविंदांच्या कवितांचे केलेले जतन आणि वेळोवेळी प्रसंगावधान दाखवून मित्रमेळा (अभिनव भारत) या क्रांतिकारी संघटनेतील अनेक सदस्यांना केलेलं सहकार्य हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
बालपण आणि लग्न :
सरस्वतीबाई सावरकर यांचा जन्म इ.स. १८८५ साली त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे फडके कुटुंबात झाला. लग्नाआधी त्यांना कोणतेही रूढ शिक्षण मिळाले नाही. पुढे इ.स. १८९६ साली त्यांचे लग्न भगूर, नाशिक येथे वतनदार असणाऱ्या गणेश सावरकरांशी झाले. गणेशपंतांनी त्यांचे नाव यशोदा असे ठेवले व पुढे त्या येसूबाई म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतर निरक्षर येसुबाईंना त्यांचे धाकटे दीर विनायक सावरकर यांनी लिहायला वाचायला शिकवले. वतनदारी असल्यामुळे सावरकर कुटुंब समृद्ध होते. आणि त्यामुळे सुरुवातीचा काळ तरी येसूबाईसाठी सुखासमाधानाचा ठरला.
प्लेगची साथ :
इ.स. १८९६ मध्ये बाबाराव सावरकर पुढील शिक्षणासाठी नाशिकला गेले. याच काळात बाबारावांना योगविद्येमध्ये रुची निर्माण झाली आणि त्यांच्या मनात संन्यास घेण्याचा विचार घोळू लागला परंतु त्याच दरम्यान इ.स. १८९८ मध्ये नाशिक मध्ये प्लेगची साथ आली आणि ते भगूरला परतले. पुढे भगूरही प्लेगच्या विळख्यात सापडले. या साथीत सावरकर कुटुंबही होरपळून निघाले. येसुवहिनींचे सासरे, चुलत सासरे याच साथीत स्वर्गवासी झाले. सर्वात धाकटे दीर नारायण सावरकर यांनाही प्लेगची लागण झाली पण गणेशपंत आणि येसूबाईंच्या अखंड सेवेमुळेच ते या भयंकर रोगातून बचावले.
कौटुंबिक आघात :
याच काळात सावरकर कुटुंबाला एकामागोमाग एक आघात सहन करावे लागले. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या मृत्युपाठोपाठ घरातील वतनदारी गेली आणि दारिद्र्याचे दिवस आले. विनायक सावरकर यांचा मुलगा प्रभाकर याचाही मृत्यू झाला. येसूबाईंनाही इ.स.१९०३-०४ च्या सुमारास एक मुलगी झाली पण ती अल्पायुषी ठरली. त्यानंतरही त्यांना एक मुलगी झाली पण जगू शकली नाही.
क्रांतीची ज्योत :
सावरकर कुटुंबातील तीनही बंधू देशभक्त होते. इंग्रज सरकार उलथून टाकण्याच्या ध्येयाने भारावून गेलेले होते व याचसाठी अखंड प्रयत्नही करत होते. १९०६ ते १९०९ या काळात गणेशपंत सावरकर यांनी याच उद्देशाने स्वातंत्र्यासाठी तरुणांना प्रेरित करणाऱ्या कवी गोविंद यांच्या कवितांच्या पुस्तिका प्रकाशित केल्या. या कामासाठी येसूबाईंनी आपला एकेक दागिना विकला. परंतु हीच पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल पुढे बाबारावांवर देशद्रोहाचा खटला भरवण्यात आला आणि त्यांना १९०९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली.
याच पाठोपाठ १९१० मध्ये स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनाही लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना तब्बल दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावून अंदमानला धाडण्यात आले. हा काळ येसूबाई सावरकरांसाठी घरातील मोठी सून या नात्याने सर्वात खडतर असा होता. दोन्ही बंधुंच्या अटकेनंतर सावरकरांच्या घरावर जप्ती आली आणि काही मोजके सामान घेऊन येसूबाई आणि इतर सदस्यांना घराबाहेर पडावे लागले. इंग्रज सरकारच्या भीतीमुळे माहेरच्या माणसांनी, नातेवाईकांनीही आपल्या घराचे दरवाजे बंद केले पण अशा परिस्थितीतही येसूबाई खचल्या नाहीत. बाबारावांचे स्नेही असलेल्या रामभाऊ दातार यांनी त्यांना आश्रय दिला. पॅरीसमध्ये राहणाऱ्या क्रांतिकारक मादाम कामा या काळात सावरकर कुटुंबासाठी दर महिना ३० रुपये पाठवत असत. पुढे १९१६ मध्ये नारायणराव सावरकर डॉक्टर होऊन मुंबईला स्थायिक होईपर्यंत सावरकर कुटुंबाने अत्यंत कष्टात दिवस काढले.
येसूबाईंचे कार्य :
१) स्वदेशी व्रत : १९०५ साली स्वदेशी आंदोलनातून प्रेरणा घेऊन येसूबाईंनी स्वदेशीचे व्रत अंगिकारले. बांगड्यांची काच परदेशातून येत असे म्हणून काचेच्या बांगड्या घालणे सोडून दिले त्याऐवजी दोऱ्यात काळे मणी ओवून केलेल्या बांगड्या घालायला सुरुवात केली. त्याकाळी साखरही परदेशातून येत असे त्यामुळे साखर खाणेही सोडून दिले.
२) आत्मनिष्ठ युवती संघ: मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेच्या बहुतांश सदस्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झाली आणि त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांच्या बायका मुलांवर मोठा कठीण प्रसंग ओढवला. परंतु या अवघड काळात आत्मनिष्ठ युवती संघातर्फे अशा अनेक स्त्रियांना येसूबाईंनी धीर दिला. दर शुक्रवारी संघाची सभा भरत असे. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून त्यावर चर्चा होत असे तसेच स्वदेशीचे व्रत गावोगावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असत.
३) कवी गोविंदांच्या कवितांचे जतन : बाबाराव सावरकरांनी ज्या पुस्तिका छापल्या होत्या त्या त्यांच्या अटकेनंतर जप्त झाल्या परंतु येसूबाईंना या सर्व कविता मुखोद्गत होत्या, त्यांनी त्या आत्मनिष्ठ युवती संघातील इतर स्त्रियांना शिकवल्या व अशा तऱ्हेने त्यांच्यामुळे कवी गोविंदांच्या या कविता नष्ट झाल्या नाहीत.
४) येसूबाईंचे प्रसंगावधान : १९०८ मध्ये बाबाराव सावरकर मुंबईत असताना त्यांना अटक झाली. त्यादिवशी नाशिकच्या आपल्या घरावर पोलिसांची धाड येईल हे येसूबाईंनी ओळखले. सावरकरांच्या घरात तर सरकारने बंदी घातलेली अनेक पुस्तके, पिस्तुले अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी असत. परंतु येसूबाईंनी अत्यंत चपळाईने विश्वनाथ केळकर यांच्या मदतीने काही महत्त्वाचे साहित्य लपवले तर काही नष्ट केले. काही कवी गोविंदांच्या घरात ठेवले तर काही पुस्तके जाळून टाकली. हे काम होईपर्यंत पहाटेचे चार वाजले आणि त्यानंतर अर्ध्या तासातच पोलिसांची धाड पडली परंतु येसूबाईंच्या तत्परतेमुळे कोणताही महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही.
५) मित्रमेळ्यातील कार्यकर्त्यांना आधार : मित्रमेळा उर्फ अभिनव भारत या संघटनेचे सदस्य श्री. बर्वे हे नाशिक जवळील कोठुर गावी राहत असत. त्यांच्या घरात काही बॉम्ब लपवून ठेवले होते, बाबारावांच्या अटकेनंतर पोलिसांची धाड येण्यापूर्वी हे बॉम्ब नष्ट होणे किंवा लपवणे आवश्यक होते. नाशिकमधील अभिनव भारतचे सर्व कार्यकर्ते पोलिसांना माहित होते त्यामुळे बर्वे यांच्यापर्यंत निरोप कसा पोहोचवावा असा प्रश्न निर्माण झाला होता. याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्नेही गणपतराव जोगळेकर नाशिकला आले होते. येसूबाईंनी प्रसंगावधान दाखवून जोगळेकर यांच्याबरोबर आपला निरोप कोठुरला पाठवला आणि त्यामुळेच पोलीस येण्यापूर्वी बॉम्ब नष्ट झाला. अशा अनेक प्रसंगांमुळे येसूबाई सावरकर या मित्रमेळ्यातील सर्व सदस्यांसाठी बाबाराव सावरकरांइतक्याच आदरणीय ठरल्या.
येसूबाईंचा मृत्यू आणि अखेर पतीची भेट नाहीच :
१९१६ मध्ये मुंबईला स्थायिक झाल्यानंतर अंदमानला बाबाराव सावरकरांची भेट घेता यावी यासाठी येसूबाई आणि नारायणरावांनी अनेक खटपटी केल्या परंतु त्यांचे बहुतेक अर्ज नाकारण्यात आले. १९१८ च्या शेवटी त्या आजारी पडल्या. याकाळात त्यांना अनेक वेळा भ्रम होत असत. आपले पती बाबाराव आपल्याला भेटायला घरी आले आहेत असा भास त्यांना होत असे. याच दरम्यान ८ फेब्रुवारी १९१९ रोजी येसूबाईंना पतीला भेटण्याची परवानगी देणारे पत्र नारायणरावांना मिळाले परंतु आता उशीर झाला होता. पत्र मिळण्यापूर्वी तीन दिवस म्हणजेच ५ फेब्रुवारी १९१९ला वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी येसूबाई पंचत्त्वात विलीन झाल्या होत्या.
स्वा. सावरकरांनी आपल्या वहिनीचे केलेले वर्णन “तू ध्येयाची अससी मूर्ती, माझे वाहिनी माझे स्फूर्ती” या ओळी सार्थ करणारे आयुष्यच त्या जगल्या.
संदर्भ
- ^ "सरस्वतीबाई गणेश ऊर्फ येसूवहिनी सावरकर". लोकसत्ता. 2013-07-06. 2020-05-30 रोजी पाहिले.
- ^ सहस्रबुद्धे, उत्तरा. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया.