येनाची लढाई
येनाची लढाई : नेपोलियनने प्रशियाविरुद्ध १४ ऑक्टोबर १८०६ रोजी जिंकलेली एक प्रसिद्ध लढाई. डिसेंबर १८०५ मध्ये ऑस्टरलिट्झ येथील लढाईत नेपोलियन बोनापार्टने ब्रिटन, ऑस्ट्रिया व रशिया यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला त्यामुळे ऑस्ट्रियाने रशिया व ब्रिटन या दोघांशीही असलेला संबंध तोडला. १८०६ मध्ये प्रशियाने नेपोलियनच्या आक्रमणाविरुद्ध लढण्याची तयारी केली व बर्लिनच्या नैऋत्येस येना आणि आउअरश्टेट या गावांच्या मधोमध १,३०,००० फौज खडी केली. येनाच्या दक्षिणेस असलेल्या थ्युरिंजा जंगलाच्या पश्चिमेला कोबुर्क व बेरूत येथे नेपोलियनने आपल्या सैन्याचे तीन विभाग केले. हे तीन विभाग वेगवेगळ्या मार्गाने बर्लिनच्या रोखाने उत्तरेकडे निघाले. येनापाशी नेपोलियनने दोन विभाग एकत्र करून, जर्मन राजपुत्र होएनलोए याच्या ५१,००० सैनिकांवर दक्षिण व पूर्वेच्या बाजूने हल्ला केला आणि मध्यान्हापर्यंत त्यांचा धुव्वा उडविला. आउअरश्टेटच्या उत्तरेकडून प्रशियाचा राजा तिसरा विल्यम याचा बर्लिनबरोबरचा संबंध तोडण्यात व प्रशियाच्या २७,००० सैनिकांची विल्हेवाट लावण्यात नेपोलियनचा दुय्यम मार्शल दाव्हू हा यशस्वी झाला. या लढाईत प्रशियाच्या प्रचंड सैन्याचा पराभव करण्यात व जर्मनी-प्रशियावर फ्रान्सची सत्ता स्थापण्यात नेपोलियन यशस्वी झाला. या लढाईत नेपोलियनच्या युद्ध व रणकौशल्याचे काही पैलू खालीलप्रमाणे दृष्टोत्पत्तीस येतात. उदा., सैन्याची विभागणी करून त्यांची आगेकूच अलगपणे करणे, शत्रूवर आघात करताना मात्र हे वेगवेगळे विभाग एकत्र करणे, प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटण्यापूर्वीच शीघ्र हालचालीने शत्रूच्या बगला व पिछाडी कमजोर करणे, आकस्मिक घाला घालणे आणि लढाई जिंकण्याचा पाया घालणे इत्यादी.