यू.आर. राव
उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत.
यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले.
कारकीर्द
अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.
आर्यभट्ट
पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा.
अन्य उपग्रह
यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
मंगळाची मोहीम
भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते.
पुरस्कार आणि सन्मान
- वॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. (२०१३ मध्ये)
- इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार
- पद्मविभूषण
- युरी गागारिन पुरस्कार, वगैरे.