युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड
ऑक्सफर्ड विद्यापीठ हे ब्रिटनमधील ऑक्सफर्ड शहरात आहे. इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या भागातील सर्वांत जुने विद्यापीठ असे त्याचे वर्णन केले जाते. अकराव्या शतकात त्याची स्थापना झाली; मात्र ते जास्त नावारूपाला आले बाराव्या शतकानंतर. ११६७ मध्ये पॅरिस विद्यापीठातून परदेशी शिक्षणतज्ज्ञांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे ते तज्ज्ञ ऑक्सफर्डमध्ये आले आणि हळूहळू तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास सुरुवात झाली. या विद्यापीठात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादंग झाल्यामुळे १२०९ मध्ये काही शिक्षणतज्ज्ञ तेथून बाहेर पडले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची स्थापना केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी चाळीस स्वायत्त महाविद्यालये आणि संस्था निगडित आहेत. कुलगुरू या विद्यापीठाच्या कामकाजाचे प्रमुख असतात. कुलपतिपदी एखाद्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते आणि ती आजन्म त्या पदावर कायम असते. ऑक्सफर्ड विद्यापीठाशी निगडित महाविद्यालये विशिष्ट विषयासाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, नफिल्ड महाविद्यालयात समाजशास्त्र हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. ऑक्सफर्डमधील ग्रंथालय ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय असून, त्यातील पुस्तके सलग लावली, तर त्यांची लांबी ११७ मैल होते.