युनियन ऑफ इंटरनॅशनल टेक्निकल असोसिएशन
विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा संघ आहे. त्याची स्थापना १९५१ मध्ये झालेली असून त्याचे कार्यालय पॅरिस येथे यूनेस्कोच्या इमारतीत आहे. या संघाच्या २६ आंतरराष्ट्रीय संघटना सदस्य आहेत. सदस्य संघटनांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महासभांचा समन्वय करणे यूनेस्को, ⇨ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स वगैरे संस्थांशी सहकार्य करणे विविध भाषांत तांत्रिक संदर्भ साहित्य सूची व तांत्रिक शब्दकोश प्रसिद्ध करणे अशा कामांचा या संघाच्या कार्यात समावेश आहे. या संघाच्या काही महत्त्वाच्या सदस्य संघटनांसंबंधीची माहिती खाली दिली आहे.
इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर हायड्रॉलिक रिसर्च
द्रवाच्या प्रवाहासंबंधीच्या संशोधनाकरिता १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेदर्लंडसमधील डेल्फ्ट येथे असून तिचे २३०० व्यक्तिगत व २७० निगम सदस्य आहेत. प्रकाशने : जर्नल (त्रैमासिक फ्रेंच वा इंग्रजीत) डिरेक्टरी ऑफ हायड्रॉलिक रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज (दर ५ किंवा ६ वर्षांनी), प्रोसिडिंग्ज ऑफ बायोनियल काँग्रेसेस.
इंटरनॅशनल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चरल एंजिनियरिंग
कृषी अभियांत्रिकीविषयी १९३० साली स्थापन झालेला हा आयोग पॅरिस येथे असून त्याच्या २३ राष्ट्रांतील संस्था व ६ राष्ट्रांतील व्यक्तिगत सदस्य आहेत. मृदाविज्ञान व जलविज्ञान यांचा कृषी अभियांत्रिकीतील उपयोग मृदा संधारण, सिंचन व जमीन सुधारणा ग्रामीण क्षेत्रातील बांधकामे व साधनसामग्री कृषी यंत्रसामग्री ग्रामीण विद्युत् पुरवठा व एकूण ऊर्जेच्या संदर्भात त्याचा उपयोग शेतीच्या कामाचे शास्त्रीय पद्धतीने आयोजन इ. विषयांवर हा आयोग कार्य करतो.
इंटरनॅशनल कमिशन ऑन ग्लास
काचनिर्मितीची कला, विज्ञान व तंत्रविद्या यांसंबंधीच्या माहितीचा विनिमय व सहकार्य होण्यासाठी १९३३ मध्ये व्हेनिस येथे झालेल्या आयोगाचे कार्यालय झेकोस्लोव्हाकियातील प्राग येथे आहे. २१ राष्ट्रांतील संस्था वा व्यक्ती या आयोगाच्या सदस्य आहेत. प्रकाशने : बिब्लिऑग्राफी ऑफ ग्लास लिटरेचर डिक्शनरी ऑफ ग्लास मेकिंग (६ भाषात) वगैरे.