यारॉस्लाव्ह सेफर्ट
यारॉस्लाव्ह सेफर्ट (२३ सप्टेंबर १९०१-१० जानेवारी १९८६). चेक कवी आणि पत्रकार. जन्म प्राग शहरी. १९५० पर्यंत त्याने पत्रकारी केली तथापि एकीकडे त्याचे काव्यलेखनही चालू होते. ‘सिटी इन टीअर्स’ (इं. शी) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९२० सालीच प्रसिद्ध झाला होता. तरुण वयात त्याचा साम्यवादाकडे ओढा होता. त्याच्या आरंभीच्या कवितांतून श्रमजीवी वर्गाबद्दलची आस्था, सोव्हिएट रशियाकडून असलेल्या अपेक्षा प्रकट होतात.
१९२० नंतरच्या काही वर्षांत सोव्हिएट रशियाच्या साम्यवादी प्रयोगाने अन्य काही चेक कवीही भारावून गेले होते तथापि सेफर्टचा कम्युनिस्ट पक्षाबद्दलचा उत्साह पुढे ओसरला. १९२९ मध्ये त्याने कम्युनिस्ट पक्ष सोडला. ‘पोएटिझम’ (इं. शी) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चेक काव्यसंप्रदायात तो सामील झाला. ‘विशुद्ध कविता’ हे ह्या काव्यसंप्रदायाचे ध्येय होते.
‘ऑन वायरलेस वेव्ह्ज’ (१९२५, इं. शी), ‘द नाइटिंगेल सिंग्ज राँग’ (१९२६, इं. शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून विशुद्ध कवितेकडे झुकणारी त्याची प्रवृत्ती दिसून येते. देशात घडणाऱ्या घटनांविषयी तो संवेदनशील होता. ‘म्युनिक करारा’ नुसार चेकोस्लोव्हाकियाचा काही भाग जर्मनीला जोडण्यात आला, तेव्हा त्याने ‘स्विच ऑफ द लाइट्स’ (१९३८, इं. शी.) मधल्या कविता लिहिल्या. त्याचे सु. ३० काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. यांशिवाय त्याने अनेक नियतकालिकांमधून लेखन केले, तसेच लहान मुलांसाठीही लिहिले. १९६६ साली चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्रकवी म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले.