Jump to content

य.न. केळकर

यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर (१९ जुलै, इ.स. १९०२ ते १३ फेब्रुवारी, इ.स. १९९४) हे इतिहासविषयक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.

य.न. केळकर
चित्र:य.न. केळकर.jpg
जन्म नाव यशवंत नरसिंह केळकर
जन्म १९ जुलै, इ.स. १९०२
पुणे
मृत्यू १३ फेब्रुवारी, इ.स. १९९४
शिक्षण वाङ्मयविशारद
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्महिंदू
कार्यक्षेत्रइतिहास, शिक्षण
भाषामराठी
साहित्य प्रकारइतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती वसईची मोहीम
ऐतिहासिक पोवाडे
वडीलनरसिंह चिंतामण केळकर
अपत्ये विनायक केळकर, लीला केळकर

जीवन

यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्म पुणे येथील गाय अळीत झाला.[] नरसिंह चिंतामण केळकर यांचे ते सर्वात धाकटे चिरंजीव होते. य.न. केळकरांचे बालपण सुखात गेले.

य.न. केळकर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अब्राहम लिंकन वर लिहिलेला लेख 'शालापत्रक' या मासिकात प्रसिद्ध झाला होता. इ.स. १९१९ मध्ये य.न केळकर मॅट्रिक पास झाले. मॅट्रिक झाल्यानंतर य.न. केळकर यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच दरम्यान गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली. त्यात शाळा-महाविद्यालय यांवर बहिष्कार हे एक कलम होते. नरसिंह चिंतामण केळकर यांना ते मान्य नव्हते पण ते काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याने त्यांनी ते मान्य केले आणि यशवंत व बापूराव या आपल्या दोन्ही मुलांना महाविद्यालयातून काढून घरी बसवले.[]

पुढे य.न. केळकर यांनी टिळक महाविद्यालय (आताचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) प्रवेश घेतला. तेथे त्यांना तात्यासाहेब करंदीकर, चिंतामण विनायक वैद्य, शिवराम महादेव परांजपे हे शिक्षक म्हणून लाभले. इ.स. १९२२ साली य.न. केळकर यांनी टिळक विद्यापीठातून 'वाङ्मयविशारद' ही पदवी प्राप्त केली.[]

कारकीर्द

इ.स. १९२५ साली य.न. केळकर यांना त्यांच्या वडिलांनी साताऱ्यातील कन्याशाळेत मास्तर म्हणून नोकरीला पाठवलं. केळकर यांनी बहीण कमलाबाई देशपांडे त्या शाळेची सुपरिटेंडेंट होती. साताऱ्यात नोकरी करत असताना त्यांनी आपले वाचन व लिखाण चालू ठेवले. त्यांना कविता वाचण्याची व लिहिण्याची विशेष आवड होती. साताऱ्यात असताना दोघा बहीण-भावांनी मिळून 'गीत-द्वीदल' हा आपला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. साताऱ्याच्या 'ऐक्य' साप्ताहिकात देखील ते लेख लिहीत असत.[]

'पराग' मासिक

पराग ह्या इतिहास विषयावरील मासिकाची सुरुवात य.न.केळकरांनी केली. ऑक्टोबर १९४७ला ह्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पुढे काही वर्ष हे मासिक सुरू होते. केळकरांसोबत वा.गो जोशी , मो.गं.दिक्षित हे ह्या मासिकाचे संपादक होते. इतिहास विषयक निबंध , स्थळे , कथा , इतिहास क्षेत्रातील बातम्या अश्या स्वरूपाचे लेख ह्या मासिकात प्रसिद्ध होत असत.

पुस्तके

इतिहास विषयक

  • इतिहासातील टेहळणी
  • इतिहासातील सहली , १९५१
  • इतिहासातील सहली खंड २
  • काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे
  • ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास - भाग १ , १९२८
  • ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास - भाग २
  • ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास - भाग ३
  • ऐतिहासिक शब्दकोश भाग १ , १९६२
  • ऐतिहासिक शब्दकोश भाग २ , १९६२
  • भूतावर भ्रमण , १९४०
  • वसईची मोहीम
  • इतिहासातील हिराबाग अथवा हिराबागेचा इतिहास , १९७४
  • होळकरांची कैफियत , १९७२
  • चित्रमय शिवाजी - भाग १ (Pictorial Shivaji Vol.1) , १९२६

इतर

  • तंतकवि तथा शाहीर , १९५२
  • जुन्या अप्रसिद्ध लावण्या , १९७७
  • अंधारातील लावण्या
  • गीत व्दिदल
  • गीत गुंफा
  • विनोद लहरी अथवा विषयांतर
  • तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत
  • कै.न.चिं.केळकर यांचा खाजगी पत्रव्यवहार
  • केळकर कुलवृत्तान्त (सहलेखक - सी.व्ही.केळकर)
  • वाङ्मयाचा वाफा

संदर्भ

संदर्भसूची

  • पुराणिक, श. श्र. ऋषितर्पण.