Jump to content

मोलीमा

मोलीमा हे एक वास्तुरचनाविशेष आहे. प्रायः हवामानाचे आघात निष्क्रिय करणे, पुढे झुकणाऱ्या विटांच्या किंवा दगडांच्या ओळींस आधार देणे, कोनाडे, खिडक्या, दारे, झरोके इत्यादींना ठसठशीत उठाव देणे, वास्तूंचे ऊर्ध्वगामित्व व भूसमांतरत्व खुलविणे, बैठकी भागांचे स्थिरत्व दर्शविणे व जेथे वास्तूच्या आकाराच्या धारणेत व दिशेत बदल होतो, तेथे लयबद्ध सांधा देणे इत्यादींसाठी वास्तूनिर्मितीत मोलीम्यांची योजना केली जाते. या मोलीम्यांच्या आकारांस कारणपरत्वे विविध घाट दिलेले असतात. या घाटांचे ज्या वस्तूंशी साम्य असते, त्या वस्तूंच्या नावांनी मोलीमे ओळखले जातात. दरवाज्यावरती गणेशपट्टी असते.

ऊर्ध्वकमलपट्टा, अधःकमलपट्टा, कपोतचंचुपट्टा, मणिबंधी पट्टा, कुंभपट्टा, प्रस्तरकणी अशी त्यांची नावे भारतीय वास्तूशिल्पात आढळतात. या मोलीम्यांच्या पृष्ठभागांवर वेलबुट्ट्या, भौमितिक आकारांची नक्षी, स्वस्तिकमाळा इत्यादींचे पोत चढविल्यामुळे छायाप्रकाशाचा विलोभनिय खेळ साधला जाऊन वास्तूस आगळे सौंदर्य प्राप्त होते. देवालयाच्या जोत्यावर आडवे धावते पट्टे असतात त्यांवर हत्ती, घोडे, नर, पुष्प इत्यादींचे शिल्पांकन असते. त्यांना अनुक्रमे ‘गजथर’, ‘अश्वथर’, ‘नरथर’, ‘पुष्पथर’ इत्यादी नावे आहेत. त्यांतून शाही मिरवणूका, युद्धे इ. प्रसंगांचे दर्शन घडते. मेक्सिको, ईजिप्त, ग्रीस, इटली, इराणभारत येथील वास्तूंवर सूर्यप्रकाशाची दाहकता कमी करणारे मोलीमे असतात. इंग्लंड, फ्रान्स यांसारख्या देशांतील वास्तूंमधील मोलीमे हिमवर्षाव पृष्ठभागावरून घरंगळत जाईल, अशा प्रकारचे असतात. जास्त पर्जन्यवृष्टीच्या देशांतील वास्तूंतील मोलीमे वारा, पाऊस यांपासून वास्तूचा बचाव करणारे असतात. म्हणूनच वास्तुसौंदर्य व वास्तुसंरक्षण या दोन्ही दृष्टींनी मोलीम्यांची योजना केली जाते.