मृणालिनी फडणवीस
डॉ. मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. या ३ मे २०१८पासून या पदावर आहेत. त्यांच्या आधीचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार हे १० डिसेंबर २०१७पर्यंत कुलगुरू होते. मधल्या काळात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते..[१]
[२]
फडणवीस या एक उत्तम चित्रकार आहेत.
शिक्षण
डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून अर्थशास्त्र, तसेच इकॉनॉमेट्रिक्स या विषयांत एम.ए., तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.[३]
कार्य
नागपूरच्या महिला महाविद्यालयात १९८३मध्ये त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर २००३ मध्ये त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य झाल्या.
२०११ -२०१५ या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या.[४]
त्यानंतर त्या नागपूर विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून काम करीत होत्या.
अभ्यास दौरा
नवी दिल्लीच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनतर्फे एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन झाले होते. यामध्ये सोलापूरच्या कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याबरोबरच दिल्ली, चंदीगड, चेन्नई येथील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समावेश होता. सुरुवातीला चीनची राजधानी बीजिंग येथील देसंग मेन आणि जीवांग गिऑन या शैक्षणिक संस्थांना भेट देऊन या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने चीनच्या भाषेबद्दल व संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी भारतीय विद्यार्थ्यांना चीनची मेंडोरीन भाषा व चिनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे याविषयी चर्चा झाली. त्यानंतर कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी डॉ. कोटणीस मेमोरियलमधील अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. बीजिंग विद्यापीठात एक तासाचे विशेष चर्चासत्र पार पडले. त्यामध्ये चीनमधील व भारतीय विद्यापीठांतील उच्च शिक्षणाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर अभ्यास मंडळाने टेनझीन आणि जीनान या शहरातील दोन विद्यापीठांना भेट देऊन व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस संदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी चीनच्या शिष्टमंडळाला दिली.
पुरस्कार
पुणे विनोद विद्यापीठाच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार (१३ ऑगस्ट २०१९)
कौतुक
डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व असून यातून जीवन जगण्याला एक नवी ऊर्जा प्राप्त होत असते. प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते, त्या कलेला व्यासपीठ मिळणे फार महत्त्वाचे असते. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करत असतानाही चांगली कला जोपासली आहे. सुंदर चित्रे त्यांनी काढली आहेत. यावेळी खासदार डॉ. महास्वामी यांनीही कुलगुरूंच्या चित्रांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.[५]
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Dr Mrunalini Fadnavis - Vice Chancellor of Solapur University, Solapur (मराठी व्यक्तीपरिचय)" (इंग्रजी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू | eSakal". www.esakal.com. 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ News, Nagpur. "डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती". www.nagpurtoday.in. 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ News, Nagpur. "डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती". www.nagpurtoday.in. 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "Lokmangal News | News Detail". Lokmangal News (इंग्रजी भाषेत). 2019-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.