मृणालिनी देवी
मृणालिनी देवी (६ मार्च १८८८[१] - डिसेंबर १९१८[२]) ह्या अरविंद घोष यांच्या पत्नी होत्या.
कौटुंबिक पार्श्वभूमी
वडील भूपालचंद्र बोस (१८६१-१९३७) इंग्लंडमध्ये शिकून परत आलेल्या पहिल्या बंगाली लोकांच्या फळीमध्ये मृणालिनीदेवी यांचे वडील होते. शिलॉंग येथे सरकारी नोकरीमध्ये म्हणजे कृषी खात्यामध्ये नोकरी करत असत. मृणालिनी देवी यांचे बंधू सौरीन बोस हे १९११ ते १९१९ या कालावधीमध्ये श्रीअरविंद यांच्यासोबत पाँडिचेरी येथे वास्तव्यास होते. [२]
शिक्षण व विवाह
कलकत्ता येथे ब्राह्मो गर्ल्स स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. मृणालिनीदेवी यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र श्री. गिरीश चंद्र बोस हे त्यांची कलकत्ता मुक्कामी देखभाल करत असत. ते तेथील, 'बंगबासी कॉलेज' नामक प्रसिद्ध महाविद्यालयाचे प्राचार्य होते. [२] त्यांनीच श्रीअरविंद आणि मृणालिनी यांचा विवाह जुळविला. श्रीअरविंद आणि मृणालिनी देवी यांच्या वयामध्ये १४ वर्षांचे अंतर होते. श्रीअरविंद भारतात परतल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये रुजू झाले होते. तेथील महाविद्यालयामध्ये सुमारे ०७ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर ते उप-प्राचार्य झाले होते. तेव्हा त्यांचे वय २९ वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी हिंदू कुटुंबातील मुलीशी हिंदू पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले. दि. ०३ एप्रिल १९०१ रोजी त्यांचा मृणालिनी बोस यांच्याशी विवाह झाला. या विवाहास सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, लॉर्ड सिन्हा ही मंडळी उपस्थित होती.
जीवन
लाग्नानंतर सुमारे वर्षभर श्रीअरविंद व मृणालिनी देवी यांचे नैनिताल येथे वास्तव्य होते. सोबत श्रीअरविंद यांची बहीण सरोजिनी असे.
श्रीअरविंद राजकारण, समाजकारण आणि आध्यात्मिक कार्यामध्ये निमग्न झाल्याने, मृणालिनीदेवी यांना बहुतांशी काळ एकाकीपणेच व्यतीत करावा लागला. श्रीअरविंद यांनी मृणालिनीदेवी यांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. ती बहुतांशी बंगाली भाषेत आहेत. ३० ऑगस्ट १९०५ रोजी श्रीअरविंद यांनी पत्नीस लिहिलेले पत्र अलिपूर बॉम्ब खटल्यामध्ये जप्त करण्यात आले. येथे पत्नीला लिहिताना त्यांनी स्वतःच्या तीन ध्येयवेड्या गोष्टी प्रथमच उघड केल्या होत्या. [१] अलिपूर बॉम्ब खटला प्रकरणात जेव्हा श्रीअरविंद यांना मे १९०८ मध्ये अटक करण्यात आले तेव्हा मृणालिनी देवी तेथे होत्या. आणि त्या अटकेचा त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. विरहकाळामध्ये त्या एखाद्या तपस्विनीप्रमाणे जीवन व्यतीत करत होत्या. या काळामध्ये त्यांना श्रीशारदा माता यांचा आधार होता. भगिनी निवेदिता यांच्या बालिका विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती सुधीरा बोस या मैत्रिणीची त्यांना सोबत लाभली होती.[३]
डिसेम्बर १९१८ मध्ये श्रीअरविंद यांनी त्यांना लिहिले होते, ''माझी साधना आता पूर्ण झाली आहे. मला या विश्वासाठी खूप कार्य करायचे आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी यावे.'' [४] पत्रानुसार मृणालिनीदेवी पाँडिचेरीला जाण्यासाठी निघाल्या आणि त्या दरम्यानच कलकत्ता येथे १७ डिसेंबर १९१८ रोजी एन्फ़्लुएन्ज़ाने मृत्यु आला. [१]
बाह्य दुवे
मृणालिनी देवी यांचे अल्प चरित्र - त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिलेले व्याख्यान
मृणालिनी देवी यांच्याबद्दल अधिक माहिती [५]
संदर्भ
- ^ a b c A.B.Purani (1958). Life of Sri Aurobindo.
- ^ a b c Sri Aurobindo (2006). Autobiographical Notes and other writings of Historical Interest. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
- ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-03-18 रोजी पाहिले.
- ^ Nirodbaran. "Mrinalini Devi". motherandsriaurobindo.in.
- ^ "ऑरोविल विकि".[permanent dead link]