मुस्लिम मराठी साहित्य संमेलन
[१]मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मुसलमान मराठी साहित्यिकांनी भरवलेले साहित्य संमेलन होय. इ.स. १९९० साली २४ व २५ मार्चला सोलापूरला या नावाचे पहिले संमेलन भरले. प्रा. फ.म. शहाजिंदे हे संमेलनाध्यक्ष होते.
महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत अनेक उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, यासाठी हे संंमेलन भरते.
ही संमेलने मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ भरवते, त्यासाठी १९८९ साली प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, विलास सोनवणे, इकबाल मिन्ने, अजिज नदाफ, ए.के.शेख, मुबारक शेख, अब्दुल लतीफ नल्लामंदू यांनी मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.
स्थापनेेेेपासूून परिषदेने सात संमेलने घेतली. सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, मुंबई, पुणे, सांगली आणि औरंगाबाद शहरात ही संमेलने झाली. २००९ साली औरंगाबादला झालेले परिषदेचे शेवटचे संमेलन होते. या संमेलनाअगोदर परिषदेची बैठक झाली त्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि नवीन कार्यकारिणी निर्माण झाली. त्यात डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण १८ वर्षे सचिव असणाऱ्या अजीज नदाफना कुठलेच पद मिळालेले नव्हते, यावरून नाराज होऊन त्यांनी साहित्य परिषदेच्या कार्यपद्धतीवर टीका केली .[२] पण संमेलन पार पडले. पण परिषदेच्या सदस्यांमध्ये बेबनाव वाढला. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे काम थांबले.
त्यानंतर २०१०मध्ये डॉ. इकबाल मिन्ने यांच्या पुढाकाराने मुस्लिम मराठी परिषदेच्या काही सदस्यांनी मिळून औरंगाबादमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलने मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ नावाचे मंडळ स्थापन केले. या मंडळाकडून प्रथमच नववे साहित्य समंलेन सांगली येथे घेण्यात आले.
संमेलनाला नदाफ यांनी विरोध दर्शवला. पण 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळाच्या बॅनरखाली हे संमेलन घेण्यात येत होते तेव्हा विरोधाचा सूर मावळला. पण बेन्नूर आणि नदाफ वगळता सारेच सदस्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक यात हिरिरीने सहभागी झाले, त्यामुळे सांगलीचे संमेलन 'नववे' अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन म्हणून सर्व साहित्यिकांनी मान्य केले. डॉ. शेख इकबाल मिन्ने 'मुस्लिम मराठी साहित्य व सास्कृतिक मंडळा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत.
मराठी मुस्लिम साहित्यिक-विचारवंत
पद्मश्री डॉ यू. म. पठाण, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, प्रा. फ. म. शहाजिंदे, जावेद कुरेशी, अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने,मुबारक शेख, बाबा मुहम्मद अत्तार, ए. के. शेख, अमर हबीब, अब्दुल कादर मुकादम, एहतेशाम देशमुख, डॉ. झुल्फी शेख, प्रा. सय्यद महेबूब, डॉ. मुहम्मद आझम, अनवर राजन, डॉ. बशारत अहमद, रझिया पटेल, मीर इसाक शेख, राज काझी, हुसेन जमादार, डी.के. शेख, अख्तर शेख, श्रीमती आशा शेख, असिफ मुल्ला, प्रा.डॉ.तसनीम पटेल, प्रा.ताहेर पठाण, शफी बोल्डेकर, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी), कवयित्री अनिसा सिकंदर शेख, खाजाभाई बागवान, शफी बोल्डेकर, दिलशाद सय्यद रझिया जमादार या मुस्लिम साहित्यिकांनी-विचारवंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावरच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
मुस्लिम मराठी कवी/कवयित्री
डॉ यू. म. पठाण, बादिउज्जमा 'खावर', ए.के. शेख, फ. मुं. शहाजिंदे, डॉ शेख इक्बाल मिन्ने, खलील मोमीन, डॉ जुल्फ़ी शेख, अजीज नदाफ, जावेदपाशा कुरेशी, रफ़ीक़ सूरज, इक्बाल मुकादम, जहीर शेख, एहतेशाम देशमुख, कलीम खान, मसूद पटेल, फातिमा मुजावर, सय्यैद मुजफ्फर, शफी बोल्डेकर, खैरुन्निसा शेख, बदीऊज्जमा बिराजदार उर्फ (साबिर सोलापुरी) , डॉ. बशारत अहमद, नजमा शेख, आय. जी. शेख, बादशहा सय्यद, मुबारक शेख , डी. के. शेख, फकरुद्दीन बेन्नूर, इरफान शेख, साहील शेख, डॉ रफ़ीक़ काझी, बिस्मिल्लाह शेख सोनोशी, शाहिद खेरटकर, आबिद शेख, जस्मीन शेख, फ़ारूक़ काझी, ज़ुल्फ़ीकारबानो देसाई, समीर शेख, सय्यद अल्लाउद्दीन, वगैरे.
बशीर मोमीन (कवठेकर) यांनी ४०००हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गीते ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत[३]. मोमीन (कवठेकर) यांच्या गाण्यांच्या संग्रहात ‘लावणी, ‘गण-गवळण, ‘कविता, ‘भक्तीगीते, ‘पोवाडे', 'देशभक्तीपर गीते' अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य आहे[४][५][६].लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे [७].
साहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष (आयोजक-मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ)
१) आठवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद - १०,११,१२ जुलै २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.शेख इक्बाल मिन्ने[८]
२) नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सांगली - १७,१८,१९ जून २०११; संमेलनाध्यक्ष : जावेद पाशा कुरेशी
३) दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, जळगाव - २०,२१,२२ जानेवारी २०१३ : संमेलनाध्यक्ष : डॉ. मुहम्मद आझम
४) अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल - ३,४,५ नोव्हेंबर २०१७; संमेलनाध्यक्षा : प्रा. बीबी फातिमा मुजावर[९]
५) बारावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पुणे -४, ५, ७ जानेवारी २०१९ संमेलनाध्यक्ष : डॉ. अलीम वकील
जी संमेलने औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई व जळगाव आदी शहरांत झाली, त्यावेळी उस्मानाबाद येथील डॉ. बशारत अहमद, अहमदनगर येथील डॉ. बशीर मुजावर, रायगड येथील प्रा. फातिमा मुजावर व पुणे येथील डॉ. ए.के. शेख हे त्यांपैकी एकेका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
यू.म. पठाण यांच्या २४-१-२०१० रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचे अवतरण
"मराठी मुस्लिम समाजाचे कितीसे प्रतिबिंब मराठी वाङ्मयात उमटले आहे? ज्यांनी मुस्लिम असण्याचे दुःख भोगले आहे व जे अजूनही भोगतच आहेत, त्या मुस्लिम साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. दलित साहित्याप्रमाणेच महाराष्ट्रीय जीवनाचे हे महत्त्वाचे दालन प्रकाशात येणे आवश्यक आहे. आजवर एका तरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात याविषयी कधी विचार झाला का? याची खंत कधी कुणाला वाटली का? ती का बरे वाटली नाही?
तरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन-मार्गदर्शन करायला हवे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांच्यासाठीही माध्यम उपलब्ध करून द्यायला हवे. नवलेखकांच्या शिबिरात त्यांनाही मार्गदर्शन करायला हवे. अल्पसंख्य दर्जा लाभलेल्या मुस्लिम संस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन तरुणांना शैक्षणिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या शाळांत आज मुस्लिम विद्यार्थीही मराठी भाषा शिकत असल्यानेच अ-मराठी बालभारतीची पाठ्यपुस्तके शासनाने म.रा. पाठ्यपुस्तक मंडळाद्वारे संपादित व प्रकाशित केली जातात. या क्रमिक पुस्तकांच्या संपादन समितीचा मी अनेक वर्षे अध्यक्ष होतो. व्यावहारिक मराठीवर या पुस्तकात अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी या संपादन समित्यांवर एक-दोन उर्दूभाषक सदस्यही घ्यावेत. कारण मराठी शिकणाऱ्या उर्दूभाषक मुलांच्या अडचणी त्यांना नेमकेपणाने माहीत असतात. उर्दू माध्यमाच्याच नव्हे, तर इंग्रजीसारख्या अमराठी माध्यमातील मराठीच्या अध्यापनाचा स्तर मला अजूनही फार असमाधानकारक वाटतो. त्याचा मूलगामी विचार करून सत्त्वर कार्यवाही करायला हवी. उर्दू माध्यमांच्या शाळांत मराठी कार्यक्रम किती होतात? उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमांतही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम किती होतात? त्यात मराठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतात का? उर्दू माध्यमाच्या संस्थांतील नियतकालिकात मराठी विभाग असतो का? स्पोकन इंग्लिशसारखे ‘स्पोकन मराठी’ म्हणजे शुद्ध, चांगली, योग्य उच्चारांची, प्रवाही मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही या संस्थांनी चालविण्यास हरकत नाही. मराठीतच नव्हे, तर उर्दूतही आत्मकथन करणारे लेख अल्पसंख्य दर्जा असलेल्या संस्थांच्या मासिकांत अजूनही प्रसिद्ध होत नाहीत; ते व्हावेत यासाठी मुस्लिम मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. उर्दू-मराठी व मराठी-उर्दू अनुवादासाठी राज्याची उर्दू अकादमी व साहित्य संस्कृती मंडळ यांनी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या डी.एड. व बी.एड.च्या अभ्यासक्रमात मराठी अध्यापन पद्धती हा विषय अनिवार्य तर करावाच, पण त्यासाठी काटेकोरपणे अर्हताप्राप्त प्राध्यापकच नेमावेत, अल्पसंख्य दर्जा असलेल्या उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयांनी व पदव्युत्तर केंद्रांनी मुस्लिमांच्या समस्यांविषयी व मराठी अध्यापनाचा स्तर उंचावण्यासाठी संशोधन प्रकल्प घेऊन विधायक सूचनांच्या पुस्तिका प्रकाशित करून त्या प्रसारित कराव्यात. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करण्यासाठी ज्या शिक्षक हस्तपुस्तिका प्रसिद्ध केल्या जातात त्यातील संपादन-मंडळावर एक उर्दू भाषक मराठी तज्ज्ञही असावा. राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संस्थेने यासाठी अशा शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. चांगली मराठी लिपी लिहिण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे व त्यांना व्यावहारिक मराठी भाषेचे शिक्षण देणं हेही मराठी भाषा शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांची फार मोठी गरज आहे, ती अल्पसंख्य दर्जा संस्थांनी लक्षात घ्यायला हवी.
मुसलमान समाजाला मराठी शिकण्याची ॲलर्जी कशी असेल? उलट ती शिकण्यासाठी ते उत्सुकच असतात. महाविद्यालयात मराठी विषय घ्यायला टाळाटाळ करतात, हाही एक गैरसमज आहे. केवळ मराठवाड्याचाच विचार केला तरी यात फारसे तथ्य नाही हे लक्षात येईल.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सारे मुसलमान मराठी साहित्यिक मऱ्हाटी संस्कृतीचे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार कसे आहोत याचे आत्मभान महाराष्ट्रातील मुस्लिमच नव्हे, तर अन्य समाजालाही होईल, अशी माफक अपेक्षा केल्यास ते सयुक्तिकच ठरेल. इन्शा अल्ला, अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील. "[१०]
श्रीपाल सबनीस यांनी अकराव्या मुस्लिम साहित्य समंलेनाच्या (पनवेल) उद्धाटनप्रसंगी केलेल्या भाषणाचा संपादित अंश
मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्य बीबी फातिमा वालेखां मुजावर, स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकुर, माझे स्नेही आणि संमेलनाचे प्रमुख डॉ. शेख इक्बाल, सर्व निमंत्रित पाहुणे आणि रसिक बंधु-भगिनीनो,
गेल्या २५-२६ वर्षाच्या मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे सांस्कृतिक फलित आपण आज अनुभवत आहोत. डॉ. शेख इक्बाल मिन्ने, ए.के. शेख, डॉ. विलास सोनावणे, अजिज नदाफ, मुबारक शेख, उदय टिळक, यांच्या समर्पित योगदानामुळे आज साहित्य चळवळ मुस्लिम व भारतीय परिप्रेक्षात नवे मूल्यभान पेरण्यात यशस्वी झाली आहे. शेकडो मुस्लिम प्रतिभावंत याच चळवळीतून उदयास आले आहेत.
या सर्व लेखक-कवींच्या मराठी भाषा संस्कृतीवरील निष्ठा प्रगल्भ आहेत. संत ज्ञानेश्वर- तुकारामाची व फुुले-रानडे-आगरकर-आंबेडकरांची मराठी भाषा अभ्यासून, मुस्लिम प्रतिभावंतानी ती नव्या जीवन जाणिवा आणि नव्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीने समृद्घ केली आहे. अस्सल मराठी मातीचा गंध व मराठी बहुधार्मिक संस्कृतीचे प्रेम, या साहित्य प्रवाहातून सातत्याने व्यक्त झाले आहे.
पहा : साहित्य संमेलने
संदर्भ
- ^ शेख शफी बोलडेकर, शफी बोलडेकर , हिंगोली . (2001). [www.Sahityadarbar.com "ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य"] Check
|url=
value (सहाय्य): 1. Cite journal requires|journal=
(सहाय्य) - ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2009-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-22 रोजी पाहिले.
- ^ “अवलिया लोकसाहित्यीक”, "दै. सकाळ”, पुणे, 21-Nov-2021.
- ^ "बी. के. मोमीन कवठेकर - लोकसाहित्याचा वारसा पुढे नेणारा लोकशाहीर", “दै. पारनेर दर्शन", १३-नोव्हेंबर-२०२३
- ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2011”
- ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
- ^ आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना Archived 2020-11-08 at the Wayback Machine. "दै.सामना”, 1-March-2019
- ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2019-06-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-27 रोजी पाहिले.
- ^ "संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लिम मराठी!". www.aksharnama.com. 2018-05-16 रोजी पाहिले.
- ^ [Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=Editorial-16-1-12-07-2009-6180d&ndate=2009-07-12&editionname=editorial[permanent dead link]. डॉ. यू.म. पठाण] It is a snapshot of the page as it appeared on 24 Jan 2010 11:59:16 GMT.