मुरलीधर खैरनार
मुरलीधर काळू खैरनार (२९ जुलै १९५७ नासिक- ०६ डिसेंबर २०१५ नासिक) हे मराठी लेखक असून 'शोध' या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. इतिहासाचे अभ्यासक, नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वक्तृत्वकलेचे प्रशिक्षक, संघटक आणि मुक्त पत्रकार म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या 'वैष्णव' या कादंबरीवर त्यांनी त्याच नावाने दूरदर्शन मालिका बनविली.[१] तथापि तिचे प्रसरण रखडले गेले.
सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासवृत्ती देण्यात आली होती. ही अभ्यासवृत्ती प्रतिष्ठानने जाहीर केल्यानंतर ती मिळविणारे मुरलीधर खैरनार हे पहिले मानकरी होते. त्यांनी नाटके, एकांकिका आणि माहितीपटांची निर्मिती केली.आवर्त, बिरबलाची गोष्ट, आणखी एक नारायण निकम, आरोपी अनंत राघो बनाम, जास्वंदीचे ओले हात, अजब न्याय वर्तुळाचा, राजाची गोष्ट, घालीन लोटांगण, शुभमंगल, चूकभूल द्यावी घ्यावी अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही नाटकांत त्यांनी अभिनयही केला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पुनर्निर्मित ‘गाढवाचं लग्न’ या व्यावसायिक नाटकाचे आजवर तीनशेहून अधिक प्रयोग झाले.[२]
बहुरंगी व्यक्तिमत्त्व
दिग्दर्शनातील हुकमी एक्का, व्यासंगी व्याख्याता, व्यावसायिक नाटकाच्या मार्केटिंगची गणिते जुळविणारा व्यवस्थापक, वेळप्रसंगी जेथे जो कमी पडेल ती भूमिका साकारणारा हरहुन्नरी कलाकार, असे एकना अनेक चेहरे धारण करणारे मुरलीधर खैरनार, हे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते.
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी फैय्याज यांच्या विरोधात खैरनार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता.
नाशिकमधील दीपक मंडळातील सांस्कृतिक विभागातर्फे त्यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, आणखी एक नारायण निकम यासारखी नाटके दिग्दर्शित केली. नाशिकमधून अनेक तरुणांना त्यांनी व्यावसायिक नाटकांत काम करण्याची संधी दिली. त्यातून अनेकजण पुढे अभिनेते, अभिनेत्री झाले.
शेतकरी संघटनेशी ते संबंधित होते. संघटनेच्या 'ग्यानबा' या मासिकाचे ते संपादक होते.
लेखन
- शोध (कादंबरी - जुलै,२०१५ )
- मुळीच अवघड नाही.
शिक्षण
- प्राथमिक शिक्षण : नवभारत प्राथमिक शाळा, नासिक आणि श्रीराम विद्यालय, नासिक
- बी. ए. (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय, नासिक)
व्यावसायिक कारकीर्द
- मुरलीधर खैरनार यांनी ११ वर्षे नाशिक, पुणे आणि मुंबईत, गांवकरी, देशदूत आणि तरुण भारत या दैनिकांतून पत्रकारिता केली.
- १८ माहितीपटांची निर्मिती
- १९७५-८५ : ५०हून अधिक एकांकिका, नाटकांचे दिग्दर्शन
- नाट्य परिषदेच्या विविध पदांवर काम
- १९७६ : आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात सहभाग आणि तुरुंगवास
- १९८५-८७ : शेतकरी संघटनेचे काम, चार व्यावसायिक नाटकांची निर्मिती व त्यांचे महाराष्ट्रभर ४००हून अधिक प्रयोग
सन्मान व पदे
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या कादंबरी लेखनासाठीच्या एक लाख रुपयांच्या अभ्यासवृत्तीचे पहिले (२०१३) मानकरी [३]
- अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे खजिनदार व कार्यवाह
- नाट्य परिषदेच्या अखिल भारतीय नियामक मंडळाचे सदस्य
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक शाखेचे जिल्हाप्रमुख
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शेतकरी संघटना, दीपक मंडळ इत्यादी संस्था आणि संघटनांमध्ये खैरनार यांनी सक्रिय कार्यकर्त्या भूमिका पार पाडली.
पुरस्कार
- उत्कृष्ट कादंबरी लेखनसाठीचा पुरस्कार - सार्वजनिक वाचनालय, नाशिक[४]
- ‘शोध’साठी मसापचे ह.ना. आपटे पारितोषिक (२०१६)
शोध विषयी
'शोध' ही खैरनार यांची कादंबरी 'सुरतेची लूट 'या कथानकाभोवती रचलेली आहे. ती राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली. सुरतेहून मिळालेली लूट महाराष्ट्रात आणताना तिचा एक मोठा हिस्सा वाटेतच हरवला. त्याचा कसा शोध घेला गेला हा या कादंबरीचा विषय आहे.
मराठी साहित्यात संशोधन करून लिहिणारे अनेक लेखक आहेत. मात्र, सुमारे २० वर्षे किल्ले पालथे घालून, ऐतिहासिक दस्तावेज तपासत त्यावर कादंबरी लिहिणारा आणि एकाच महिन्यांत कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल करणारा हा आगळा मराठी लेखक होता. [५]
- ‘शोध’ खजिन्याचा; सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचाही !
- 'शोध':एक अद्भुतनी रोमांचक वाचनानुभव
- "शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी
हे ही वाचा
- मुरलीधर खैरनार यांचे निधन[permanent dead link]
- ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन
- आग्रह मराठी भाषेच्या शुद्धतेचा! Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
- मुरली खैरनार : एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व
- ‘मुरलीधर, तू कधी रे लिहिशील?’
संदर्भ
- ^ ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन, http://www.lokmat.com/storypage.php?catid=14&newsid=10017421
- ^ ज्येष्ठ रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन, http://www.lokmat.com/storypage.php?catid=14&newsid=10017421
- ^ प्रसिद्ध लेखक, रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन, लोकसत्ता, प्रतिनिधी, http://www.loksatta.com/nashik-news/writer-murlidhar-khairnar-no-more-1167627/
- ^ एबीपी माझा वेब टीम, http://abpmajha.abplive.in/maharashtra/murlidhar-khairnar-no-more-167946 Archived 2016-01-22 at the Wayback Machine., १० डिसेंबर २०१५ रोजी पहिले
- ^ http://www.rajhansprakashan.com/node/1286