Jump to content

मीरा अल्फासा

१९७८ भारताच्या टपालखात्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेले तिकीट
मीरा अल्फासा उर्फ श्रीमाताजी

मीरा अल्फासा - (जन्म - इ.स.१८७८ मृत्यू - इ.स.१९७३)

  • श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी - संस्थापक, संचालक या नात्याने श्रीमाताजी म्हणून ओळखल्या जातात.
  • श्रीअरविंद सोसायटी, पाँडिचेरी - संस्थापक, कार्यकारी अध्यक्ष []
  • ऑरोविल, पाँडिचेरी - संस्थापक

कौटुंबिक पार्श्वभूमी

जन्म फ्रान्समध्ये पॅरिस येथे दि. २१ फेब्रुवारी १८७८ रोजी झाला. श्रीमती मॅथिल्ड इस्मलालून आणि बँकर मॉरिस अल्फासा या आईवडिलांच्या पोटी श्रीमाताजींचा जन्म झाला. त्यांचे नाव 'मीरा' असे ठेवण्यात आले. मीरेच्या जन्माच्या वर्षभर आधी मॉरिस आणि कुटुंबीय इजिप्तमधून फ्रान्सला आले होते.

शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे घरीच झाले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना आपल्या कार्याची जाणीव होती. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणे शक्य झाले होते. पुढे श्रीमद्भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचे राजयोग या पुस्तकांमधून त्यांना मार्गदर्शन मिळाले. इ.स.१८९३ मध्ये त्यांनी आर्ट स्टुडिओमध्ये जायला सुरुवात केली. तेथे त्यांनी चित्रकलेचे प्रगत अध्ययन केले. त्या एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून गणल्या जात होत्याच. तसेच त्या उत्तम पियानो-वादक होत्या; त्या लेखनही करत असत.

मीरा अल्फासा
जन्म २१ फेब्रुवारी १८७८
मृत्यू १७ नोव्हेंबर १९७३
पाँडिचेरी
राष्ट्रीयत्व फ्रान्स, भारत
टोपणनावे श्रीमाताजी, मदर
ख्याती श्रीअरविंद यांच्या आध्यात्मिक सहयोगिनी
जोडीदार चित्रकार हेन्री मॉरिसेट, पॉल रिचर्ड्स
अपत्ये आंद्रे मॉरिसेट
संकेतस्थळ
https://motherandsriaurobindo.in/


बालपणातील आध्यात्मिक अनुभव

त्यांच्या आध्यात्मिक आयुष्याविषयी सांगावयाचे झाले तर, त्यांच्याच शब्दांच्या आधारे असे म्हणता येईल: " वयवर्षे ११ ते १३ च्या दरम्यान त्यांना आलेल्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे त्यांना ईश्वराचे अस्तित्व उघड झाले; एवढेच नव्हे, तर मनुष्य त्या ईश्वराशी एकात्म पावू शकतो हेही त्यांना ज्ञात झाले, मनुष्य त्याच्या कृतीद्वारे आणि त्याच्या जाणिवेद्वारे समग्रतया त्या ईश्वराशी एकरूप होऊन, दिव्य जीवनाद्वारे त्याचे आविष्करण करू शकतो हे त्यांना त्या अनुभवांमधून समजून आले."

गूढवादाचा अभ्यास

इ.स. १९०५ च्या सुमारास मीरा गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी अल्जेरियामध्ये पोलिश गूढविद्याशास्त्रज्ञ मॅक्स थिऑन यांच्याकडे गेल्या. मॅक्स थिऑन आणि त्यांच्या पत्नीचा गूढशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. इ.स.१९०६ मध्ये पॅरिसला परतल्यावर मीरा अल्फासा यांनी अध्यात्मसाधकांचा एक छोटा गट स्थापन केला. इ. स. १९११ ते १९१३ या दरम्यान पॅरिसमधील विविध समूहांसमोर त्यांनी व्याख्याने दिली. त्यांच्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी (मीरा अल्फासा) श्रीमाताजी आपले पती मि. पॉल रिचर्ड्स यांच्यासमवेत पाँडिचेरीला आल्या.

योगी श्रीअरविंद यांच्याशी भेट

दि. २९ मार्च १९१४ रोजी श्रीमाताजी व श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष यांची प्रथम भेट झाली. अनेक वर्षे आंतरिक रित्या श्रीमाताजींना ज्यांचे आध्यात्मिक बाबतीत मार्गदर्शन मिळत होते ते मार्गदर्शक श्रीअरविंदच आहेत, हे श्रीमाताजींनी पहिल्याच भेटीत ओळखले. आणि आपले उर्वरित सर्व कार्य हे श्रीअरविंदांबरोबरच होणार आहे हे ही त्यांनी ओळखले. संपूर्ण समर्पित झालेल्या श्रीमाताजींविषयी श्रीअरविंद म्हणाले, " I have never seen anywhere a self-surrender so absolute and unreserved. "

आर्य मासिक

श्रीमाताजी, त्यांचे पती मि.पॉल रिचर्डस व श्रीअरविंद हे तिघे मिळून त्या काळात आर्य मासिक चालवीत असत. फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत प्रकाशित होणाऱ्या या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारी मीरा अल्फासा सांभाळत असत. भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स येथे ते प्रसृत होत असे.

श्रीमाताजींची स्वाक्षरी
श्रीमाताजींची स्वाक्षरी

कर्मभूमी पाँडिचेरी

अकरा महिने भारतात राहिल्यानंतर, पहिले महायुद्ध सुरू झाल्याकारणाने त्यांना फ्रान्सला परतावेच लागले. एक वर्षभर फ्रान्समध्ये राहिल्यानंतर पुढील चार वर्षे त्या जपान मध्ये राहिल्या.

दि. २४ एप्रिल १९२० रोजी त्या पाँडिचेरीला परतल्या आणि त्यांनी श्रीअरविंदांसमवेतच्या त्यांच्या कार्याला सुरुवात केली. उरलेले संपूर्ण आयुष्य त्यांनी पाँडिचेरी येथेच व्यतीत केले.

श्रीमाताजी जेव्हा श्रीअरविंदांसमवेत कार्य करण्यासाठी आल्या तेव्हा श्रीअरविंदांभोवती अगोदरच काही शिष्यगण तयार झाला होता. श्रीमाताजींच्या आगमनानंतर शिष्यवर्गाची संख्या वाढतच गेली. कालांतराने या समूहाचे आश्रमामध्ये रूपांतर झाले. श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी या नावाने त्याची ओळख आहे. दि. २४ नोव्हेंबर १९२६ च्या अधिमानसाच्या अवतरणानंतर (Descent of Overmind) श्रीअरविंदांना अधिक उच्चतर साधनेसाठी एकांतवासात जाणे भाग पडले आणि त्यावेळी त्यांनी आश्रमाची, भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदारी श्रीमाताजींवर सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमाचा विस्तार झाला.

दि.२४ एप्रिल १९५६ रोजी ध्यानानंतर श्रीमाताजींनी 'अतिमानसाचे आविष्करण (Supramental Manifestation) ही आता एक प्रत्यक्ष वस्तुस्थिती बनली आहे,' असे कथन केले.

श्रीमाताजींचे प्रतीक

श्रीमाताजींचे प्रतीक
श्रीमाताजींचे प्रतीक

प्रतीकाचे केंद्र म्हणजे 'अदिती', मधल्या चार पाकळ्या म्हणजे महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. बाहेरच्या बारा पाकळ्या म्हणजे मनःपूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, प्रयत्न-सातत्य, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, सद्भाव, उदारता, समता आणि शांती. यांपैकी पहिल्या आठ गुणांनी ईश्वराप्रत काय वृत्ती असावी हे दर्शविले जाते आणि उरलेले चार गुण मानवतेप्रत काय वृत्ती असावी हे दर्शवितात.


ऑरोविल

श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाने श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनची इ.स.१९५१ मध्ये तर ऑरोविल या आंतरराष्ट्रीय नगरीची स्थापना इ.स.१९६८ मध्ये करण्यात आली. दि. ०२८ फेब्रुवारी १९६८ रोजी, तामिळनाडूच्या दक्षिणेस पाँडिचेरीच्या उत्तरेस, युनेस्को द्वारे समर्थित आंतरराष्ट्रीय समुदाय स्थापन केला. मानवी एकता साध्य करणे हे या आंतरराष्ट्रीय नगरीचे ध्येय आहे. ऑरोविलच्या स्थापना-दिनी श्रीमाताजींनी फ्रेंच भाषेत भाषण दिले होते आणि ते ऑल इंडिया रेडिओ वरून थेट प्रसारित करण्यात आले होते.

पुष्पप्रेम

‘श्रीअरविंदाश्रमा’ची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे १९२७ सालापासून श्रीमाताजी, त्यांना भेटायला येणाऱ्या साधकांशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून फुलांचा उपयोग करत असत. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली होती. अशा रीतीने फुलांची जणू काही एक भाषाच तयार झाली आणि या भाषेच्या माध्यमातून श्रीमाताजी साधकांशी संवाद साधत असत. अल्पावधीतच त्यांनी सुमारे शंभरएक फुलांना आध्यात्मिक भावसूचक, गुणसूचक नावे दिली होती. त्यावर आधारित असलेल्या Flowers and Their Messages या पुस्तकामध्ये एकंदर ८७९ फुलांचे आध्यात्मिक अर्थ देण्यात आले आहेत. इ. स. २००० मध्ये The Spiritual Significance of Flowers या नावाने आणखी एक पुस्तक प्रकाशित केले गेले, त्यामध्ये फुलांच्या शास्त्रीय नावांची भर घालण्यात आली आहे तसेच आणखी १९ फुलांचे अर्थ नव्याने देण्यात आले आहेत.

प्रकाशित साहित्य

कलेक्टेड वर्क्स ऑफ द मदर या नावाचे एकूण १७ खंड प्रकाशित झालेले आहेत. तसेच द मदर्स अजेंडा या नावाने एकूण १३ खंड प्रकाशित झालेले आहेत. शिष्यवर्गाशी झालेल्या संवादांचे संकलन या खंडांमध्ये केलेले आहे. यातील निवडक साहित्याचा अनुवाद अभीप्सा मासिक आणि संजीवन या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.

श्रीमाताजी यांनी श्रीअरविंद लिखित द सिंथेसिस ऑफ योगा या ग्रंथाचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला. तो ला सिंथेसिस देस योगा या नावाने प्रकाशित करण्यात आला. []

काही विख्यात अनुयायी

सत्प्रेम - द मदर्स अजेंडा या पुस्तकांचे लेखक

पवित्र - नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते.

तारा जौहर - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेच्या अध्यक्ष. पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ

हुता हिंडोचा - लेखिका आणि चित्रकार, संग्राहक

सुजाता नहार - मदर्स क्रॉनिकल्स, या अष्ट-खंडात्मक चरित्राच्या लेखिका.

मृत्यू

दि. १७ नोव्हेंबर १९७३ रोजी, वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी श्रीमाताजींनी त्यांचा देह ठेवला.

मराठीमध्ये उपलब्ध साहित्य

चरित्रात्मक लेखन

  • श्रीमातृदर्शन (श्रीमाताजींचे चरित्र आणि विविध आठवणी), प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी, अनुवादक - श्रीमती विमल भिडे व श्री.भा.द.लिमये, प्रथम आवृत्ती १९८८, ISBN 81-7058-703-4
  • मदर - श्री.लक्ष्मीकांत वि.बनसोड, श्रीअरविंद प्रकाशन, ठाणे, प्रथम आवृत्ती - फेब्रुवारी १९९६
  • श्रीमाताजी (स्वतःविषयी), अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ऑगस्ट १९९०
  • श्रीमाताजींचा हात सोडू नकोस, (इंग्रजी पुस्तक - टेक मदर विथ यू), ले.रजनीकांत मेहता, अनुवाद - प्रभाकर नूलकर, प्रकाशक - श्रीमीरा ट्रस्ट, पाँडिचेरी, २००३

श्रीमाताजींची मराठीमध्ये अनुवादित झालेली पुस्तके

  • प्रार्थना आणि ध्यान (ले.श्रीमाताजी) अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, पहिली आवृत्ती १९६९, ISBN 978-81-7058-241-0
  • आदर्श बालक - (आयडियल चाइल्ड, ले.श्रीमाताजी) प्रकाशक - श्रीअरविंद सोसायटी, द्वितीय आवृत्ती - १९७८
  • श्रीमाताजींची उत्तरे - भाग ०१, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, १९७९
  • सत्यगिरीचे आरोहण - (द असेण्ट टू ट्रुथ, ले.श्रीमाताजी) अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, १९८०
  • शिक्षण - भाग ०१, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ऑक्टोबर १९८०
  • माता - (श्रीअरविंद लिखित द मदर) अनुवाद - भा.द.लिमये, विमल भिडे, प्रथम आवृत्ती १९८१
  • चार तपस्या चार मुक्ती - (द फोर ऑस्टेरीटीज अँड द फोर लिब्रेशन्स, ले.श्रीमाताजी) अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, तृतीय आवृत्ती १९८३
  • श्रीमाताजींची आणि श्रीअरविंदांची उत्तरे, (कलेक्टेड वर्क्स ऑफ द मदर, खंड १६, ले.श्रीमाताजी) प्रथम आवृत्ती १९८४, प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 979-81-7058-022-4
  • शिक्षण - भाग ०२, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, एप्रिल १९८४
  • मातेचे चार आविष्कार (श्रीअरविंद लिखित 'द मदर' या ग्रंथावर आधारित ओवीबद्ध भावानुवाद) संजीवन कार्यालय
  • श्रीमाताजींची प्रवचने (१९३०-१९३१) अनुवाद - भा.द.लिमये व विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ऑगस्ट १९९०, ISBN 81-7058-211-3
  • विचारशलाका, अनुवाद - भा.द.लिमये व विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, पाचवी आवृत्ती १९९९, ISBN 81-7058-224-5

बाह्य दुवे

  1. ^ "Sri Aurobindo Society".
  2. ^ K.R.Srinivasa Iyengar (2006). Sri Aurobindo - A biography and a history (5th ed.). Pondicherry: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-813-8.

संदर्भ