मीना तुपे
मीना भिवसेन तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्यातील दगडी शहाजानपुरा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तुपे यांच्या वडिलांनी त्यांना शिकायला प्रोत्साहित केले, परंतु त्यांच्या आई, शशिकला तुपे यांचा विरोध होता.
तुपे कुटुंबातील चार मुली व एक मुलगा; पैकी मीना तुपे बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठ्या तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले.
मीना तुपे यांना लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली, त्यामुळे त्या काटक झाल्या. त्यांना शिक्षिका व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी शिक्षणशास्त्र पदविकाही मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पोलिसांत भरती झाल्या. त्यांना खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले; त्या हवालदार झाल्या. त्यानंतर त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात महिलांमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत त्यांना ७४९ तरुण-तरुणींमधून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असल्याचा मान मिळाला. हा मिळविणाऱ्या तुपे पहिल्याच महिला प्रशिक्षणार्थी होत.
मीना तुपे आता पोलीस उपनिरीक्षक झाल्या आहेत.