Jump to content

मासवडी

मासवडी

मासवडी हा एक महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ आहे. हा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात केला जातो. मासवडी चा उगम हा महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात झालेला आढळतो. या तालुक्यात शिव काळापासून हा पदार्थ बनवला जातो. हा भाग शेतकरी लोकांचा असून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे मांसाहार क्वचितच होत होता. त्यामुळे शाकाहाराला प्राधान्य देणारा भाग आहे. त्यातूनच शाकाहाराला तुल्यबळ चव, आरोग्यदायक, कमी तेलाचा वापर त्याच प्रमाणे खोबरे, तीळ, लसूण, शेगदाणे यांचा भरपूर प्रमाणात वापर मासवडीला आरोग्यदायक बनवतो. मासवडी बरोबर डाळीची आमटी ही बनविली जाते व मासवडी त्यामधे बुडवून बाजरीची, ज्वारीची भाकरी बरोबर खाल्ली जाते. जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी हॉटेलमधे मासवडी खायला मिळते. तसेच शुभ प्रसंगी पाहुणचारासाठी या भागातले लोक मासवडीचा बेत हमखास करतात. जुन्नरच्या भागातील अनेक महिला मासवडी, आमटी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असे जेवण बनवून कृषी पर्यटनाला आणखी आनंददायी बनवत आहेत. या तालुक्यातील काळवाडी गावातील महिला या मधे अग्रेसर आहेत.

कृती

सारण

२ टेस्पून तीळ

१/४ कप सुकं खोबरं

२ टीस्पून खसखस (ऐच्छिक)

४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून

१ मध्यम कांदा

१/२ टीस्पून गरम मसाला

१ टीस्पून लाल तिखट, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग

२ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून (ऐच्छिक)

२ टीस्पून तेल

चवीपुरते मीठ

आवरणासाठी

१ कप बेसन

२ टेस्पून तेल

१/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून जिरं

२ टीस्पून लसूण पेस्ट

चवीपुरते मीठ

बनवण्याची कृती

१)सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले मी मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..

२)कढईत तेल गरम करून त्यात हिंग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ठेवावा आणि गार झाला कि मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना लाल तिखट, गरम मसाला आणि मीठही घालावे. वाटलेले कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.

३)सारण तयार झाले कि आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हळद, लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात १ कप पाणी घालावे. पाण्यात मीठ आणि लाल तिखटही घालावे. पाण्याला उकळी आली कि त्यात बेसन घालून भरभर घोटावे. गुठळ्या होवू देउ नयेत. मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खाऊन पहावे. कच्चट लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे.

४)पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच प्लास्टीकच्या पेपरवर मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.

या वड्या झणझणीत रश्श्याबरोबर छान लागतात.