माळढोक
माळढोक (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत 'ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.
मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारताच्या कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या इसवी सन २०११मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. २०१८मधे ही संख्या १५० वर आली आहे. शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडुपे, इत्यादी आहे.[ संदर्भ हवा ]
आढळ
माळढोक पक्षी भारतामधे फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांत आढळतो. महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे [अहमदनगर], नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो. सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्ष्यासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे.[ संदर्भ हवा ]
महाराष्ट्रातील संवर्धन
महाराष्ट्रात केवळ काही मोजके माळढोक शिल्लक राहिले असल्यामुळे त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत, यांमध्ये पक्ष्यांना रेडिओ कॉलर लावण्याचा समावेश आहे. डॉ.प्रमोद पाटील हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बरोबर काम करणारे पर्यावरण संरक्षण तज्ज्ञ माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.[ संदर्भ हवा ]
- माळढोक हा भारताच्या राजस्थान राज्याचा राज्यपक्षी आहे.
बाह्य दुवे
- पक्ष्यांची मराठी नावे (१) Archived 2015-05-12 at the Wayback Machine.
- Bird Names (English-Marathi)
- पक्ष्यांची मराठी नावे (२) Archived 2015-09-16 at the Wayback Machine.