Jump to content

मामा तलाव

राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या तलावांची निर्मिती करण्यात आली होती. स्वातंत्र्योत्तर काळात या तलावांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या तलावांची सिंचनक्षमता घटली. तसेच देखभालीवरचा खर्च वाढला. सध्या प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात एकूण ५९५७ माजी मालगुजारी तलाव आहेत. यांत नागपूर जिल्ह्यातील २१७, भंडारा जिल्ह्यातील १०२५, गोंदिया जिल्ह्यातील १३५२, चंद्रपूर जिल्ह्यातील १६७८, गडचिरोली जिल्ह्यातील १६४५ तलाव आणि चाळीस अन्य तलावांचा समावेश आहे. या सर्व तलावांची एकूण सिंचनक्षमता १,१३,५१८ हेक्‍टर आहे. सध्या या सर्व तलावांची देखभाल जिल्हापरिषदांकडून केली जाते. तथापि, प्रत्येक वेळी या तलावांच्या दुरुस्तीसाठी जिल्हापरिषदेला राज्यशासनाकडे हात पसरावे लागतात.

या मामा तलावांच्या देखभालीवर कोट्यवधींचा खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पूर्व विदर्भातील सुमारे सहा हजार तलाव जिल्हापरिषदेकडून शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाचा निर्णय लवकरच होण्याची शक्‍यता आहे. मागील पाच वर्षांत या तलावांवर सात कोटींचा खर्च झाला आहे, तर अवघे दोन कोटी सत्तावीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी तीन जणांची समिती नियुक्त झाली आहे. जिल्ह्यांतील मामा तलावांची विद्यमान स्थिती,त्यांच्या देखभालीचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा सांगोपांग विचार करून या तलावांचे व्यवस्थापन सरकारकडे द्यावे, की पाणी वापर करणाऱ्या संस्थांकडे द्यावे, की जिल्हा परिषदांकडेच ठेवावे याची शिफारस ही समिती करेल.

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे