माधवी मेहेंदळे
डॉ. माधवी मेहेंदळे या नेत्रशल्यविशारद आहेत, त्या लेखिका, चित्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
(जन्म: १५ जून १९६२, नागपूर)
शिक्षण
- माधवी यांचे नागपूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये १९८३ साली एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाले. एम.बी.बी.एस या पदवी-शिक्षणामध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठात प्रथम येत, सुवर्णपदक संपादन केले.
- १९८७ साली पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमधून डिप्लोमा इन ऑफ्थॅल्मिक मेडिसिन अँड सर्जरीचे शिक्षण पूर्ण केले. या मध्येही पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या.
- तर १९९० साली 'मास्टर्स ऑफ सर्जरी इन ऑफ्थल्मॉलोजी' चे शिक्षण पूर्ण केले.[१]
व्यावसायिक कारकीर्द
१९८८ सालपासून त्या प्रॅक्टिस करतात. पुण्यामध्ये ‘प्रकाश आय हॉस्पिटल’ हे त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. डोळ्यांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे सर्व नवीन तंत्रज्ञान त्यांनी वेळोवेळी आत्मसात केले. [२]
चित्रकला आणि स्फुट लेखन
एस.एन.डी.टी. विद्यापीठात २००७ साली पूर्ण केलेल्या ‘मास्टर्स इन फाईन आर्टस्’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये माधवी या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
त्यांनी ‘मास्टर्स इन व्हिज्युअल आर्टस्’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम २०१३ साली पूर्ण केला. त्यांनी त्या दोन वर्षांतले अनुभव लिहून काढले. ते लेखन 'सकाळ'मधील दैनंदिन सदरामध्ये क्रमशः आणि 'रंगचिंतन' या नावाने 'अंतर्नाद'मध्ये प्रकाशित झाले.
जगभरातली चित्रं बघण्याच्या ध्यासापोटी युरोपमधील बहुतेक सर्व रंगदालनांना माधवी यांनी भेटी दिल्या. चित्रकलेबद्दल आणि अन्य विषयांवरही त्यांनी लेखन केले आहे.
‘सकाळ’, ‘लोकसत्ता ’, ‘मिळून साऱ्या जणी’, ‘अंतर्नाद’, ‘माहेर’ अशा ठिकाणी त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळमध्ये 'रे जीवना' आणि 'मैत्रीण ', माहेर मध्ये 'दृष्टिपटल' नावाचे सदर लेखनही प्रकाशित झाले आहे.
गडचिरोलीला डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या तर्फे युवा पिढीसाठी 'निर्माण' नावाने शिबिर-मालिका घेतली जाते. त्यावर डॉ.माधवी यांनी लिहिलेली लेख-मालिका 'साप्ताहिक सकाळ'मध्ये प्रकाशित झाली होती.
तारुण्यभान प्रकल्प आणि अन्य सामाजिक कार्य
- डॉ.अभय आणि राणी बंग यांचे कार्य पाहण्याच्या निमित्ताने गेलेल्या माधवी डॉ.राणी बंग यांच्या कार्यात सहभागी झाल्या. तेथे नेत्र-शिबिरे घेतली. चष्मे वाटप केले. डॉ.राणी बंग यांचे लैंगिक शिक्षणाचे कार्य शहरी भागातही आवश्यक आहे लक्षात आल्यावर डॉ.माधवी यांनी 'तारुण्यभान' या नावाने तो कार्यक्रम 'रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो'च्या साह्याने पुण्यामध्ये आयोजित केला. यासाठी त्यांना लोकसत्ताचे साहाय्य लाभले. पहिल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेनंतर असे अनेक कार्यक्रम डॉ.राणी बंग यांच्या सहाय्याने आयोजित केले.[३]
- मुक्तांगणच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी च्या साह्याने, त्यांनी व्यसन-मुक्ती शिबिरे भरवली, पथ-नाट्य स्पर्धा यांसारख्या उपक्रमामधून व्यसन-मुक्ती सारखा विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
- रेणू गावसकरांच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या डोळ्यांची तपासणी, मुकबधिर मुलांची डोळ्यांची तपासणी त्या मोफत करून देतात.
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य म्हणून २०१३ सालपासून त्या कार्यरत आहेत. रेणुका स्वरूप व्यवसाय प्रशिक्षण संस्था, म ए सो कलावर्धिनी, एम.ई.एस कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे,[४] यांच्या अध्यक्षा म्हणून तसेच राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, या शाळेच्या शाळासमिती अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. [५][६]
- २०११-१२ या वर्षामध्ये माधवी या 'रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो'च्या अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होत्या. [१]
ग्रंथसंपदा
- दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो - चरित्र, ग्रंथाली प्रकाशन, ISBN 13: 9789384475567
- Rx - अनुभव कथन (ललित लेख संग्रह), अमेय प्रकाशन, २००९, (प्रस्तावना - अनिल अवचट)
- दृष्टिपटल (पुस्तक) - वैद्यकीय अनुभवावर आधारित ललित लेख संग्रह, ग्रंथाली प्रकाशन, २०१४, 978-93-84475-05-5
- चेकपॉईंट चार्ली, प्रवासवर्णनात्मक कादंबरी, ग्रंथाली प्रकाशन, ISBN 978-93-84475-98-7, २०१६, (सुमित्रा भावे आणि मंगला गोडबोले यांची प्रस्तावना.)
- पाॅल गोगँ - एक कलंदर कलाकार, रोहन प्रकाशन, जानेवारी २०२३, ISBN 13: 978-9392374999
पुरस्कार
- 'दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो' या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा २०११ चा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ''पु.ल.देशपांडे पुरस्कार' मिळाला.[७]
- 'दृष्टिपटल' या ललित लेख संग्रहास पुणे नगर वाचन मंदिर यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला आहे.[८]
बाह्य दुवे
डॉ.माधवी मेहेंदळे यांची मुलाखत (ध्वनिफीत)
संदर्भ
- ^ a b "Interviewing Dr. Madhavi Mehendale". Marathi Podcasts by Netra Bhalerao.
- ^ आकाशवाणीच्या पुणे विविध भारती केंद्रावरून प्रसारित 'व्यक्तिवेध' या कार्यक्रमात डॉ. माधवी मेहेंदळे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.
- ^ "थिंक महाराष्ट्र". www.thinkmaharashtra.com.
- ^ "Shri Prasad Vanarase in conversation with Dr. Madhavi Mehendaley". MES College of Performing Arts.
- ^ डॉ.केतकी मोडक (२०२२). ध्यासपंथे चालता. पुणे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी.
- ^ "mespune.in". mespune.in.
- ^ डॉ.माधवी मेहेंदळे (२०११). दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल अँजेलो. पुणे: ग्रंथाली प्रकाशन. ISBN 978-93-84475-56-7.
- ^ डॉ.माधवी मेहेंदळे (२०१६). चेकपॉईंट चार्ली. पुणे: ग्रंथाली प्रकाशन. ISBN 978-93-84475-98-7.