माधवी देसाई
माधवी रणजित देसाई (२१ जुलै, इ.स. १९३३; कोल्हापूर - १५ जुलै, इ.स. २०१३; बेळगाव) या मराठीतील एक लेखिका होत्या. त्या भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या व रणजित देसाई या लेखकाच्या पत्नी होत्या. रणजित देसाई यांची आधीची पत्नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित नाच गं घुमा हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि काही व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत.
सत्तावीस वर्षांपूर्वी बेळगावजवळ कडोली येथे माधवी देसाई यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले. त्यानंतरच सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९०पासून त्यांचे वास्तव्य गोव्यात बांदिवडे येथे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑक्टोबर २०१२मध्ये, त्या आपल्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावात रहावयास आल्या.
वयाच्या ८०व्या वर्षी, म्हणजे १५ जुलै २०१३ रोजी सकाळी साडेचारला त्यांचे बेळगाव येथे निधन झाले.
कुटुंब
- पती कै. रणजित देसाई
- कन्या : लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके
- जावई आणि नातवंडे
माधवी देसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- अंजलीबाई मालपेकर यांचे चरित्र
- अमृता प्रीतम यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद
- असं म्हणू नकोस (कथासंग्रह)
- कथा एका राजाची (कादंबरी)
- कथा सावलीची (स्त्रीविषयक कथा)
- कस्तुरीगंध (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
- कांचनगंगा (कथा)
- किनारा (कथा)
- गोमन्त सौदामिनी (गोव्यातील १०० कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक)
- घे भरारी (कथा, पटकथा व संवादलेखन-हा चित्रपट यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केला होता.)
- चेरी ब्लॉसम (कादंबरी जून २०१३, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर)
- जगावेगळी (कादंबरी)
- धुमारे (कथा, प्रवासवर्णन)
- नकोशी (कथासंग्रह)
- नर्मदेच्या तीरावर (व्यक्तिचित्र-संग्रह)
- नाच गं घुमा (आत्मचरित्र), (मराठीत अनेक आवृत्त्या; हिंदी आणि कन्नड भाषेत भाषांतरे)
- नियती (कथा)
- परिचय (कथासंग्रह)
- प्रार्थना (कथा)
- फिरत्या चाकावरती (हावठण या कोकणी कादंबरीचा मराठी अनुवाद)
- भारत माझा देश आहे (कादंबरी)
- मंजिरी (कादंबरी)
- महाबळेश्वर शैल यांच्या कोकणी पुस्तकांचे अनुवाद
- विश्वरंग (चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे व्यक्तिचित्रण)
- शाल्मली (ललित लेख)
- शुक्रचांदणी (कथासंग्रह)
- सागर (कथासंग्रह)
- सीमारेषा (माहितीपर कादंबरी)
- सूर्यफुलांचा प्रदेश (व्यक्तिचित्रण); (इंग्रजी भाषांतर -‘द लॅंड ऑफ सनफ्लॉवर्स’)
- स्वयंसिद्ध आम्ही (चरित्रात्मक-संस्कृत)
- हरवलेल्या वाटा (कथा)