Jump to content

माधवराव जोशी

महादेव नारायण ऊर्फ माधवराव जोशी (७ जानेवारी, इ.स. १८८५ - १६ ऑक्टोबर, इ.स. १९४८) हे एक मराठी नाटककार होते. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वऱ्हाडात झाले. इ.स. १९११ साली पुण्यात आल्यावर माधवरावांनी काही वर्षे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली. रंगभूमीच्या आकर्षणामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते नाट्यलेखनाकडे वळले.

अयशस्वी नाटके

पौराणिक नाटकांसाठी माधवरावांनी जुन्या पंडित कवींची कविता आणि तत्कालीन पौराणिक नाटके यांचा कसून अभ्यास केला. असे असले तरी, माधवराव जोशांची ’कर्णार्जुन’ आणि ’कृष्णविजय’ ही नाटके रंगभूमीवर अजिबात यशस्वी झाली नाहीत.

विनोदी नाटके

पौराणिक नाटकांनी अपयश दिल्यानंतर माधवराव जोशी विनोदी नाटकांच्या लेखनाकडे वळले. सन १९१४मध्यी त्यांचे रंगमंचावर आलेले ’सं. विनोद’ हे नाटक, उतावळ्या सुधारकांची थट्टा करणारे कथानक, त्यातील भरपूर विनोदी प्रसंग, वैचित्र्याने नटलेले चटकदार संवाद आणि खाडिलकरांच्या पदांची विडंबने यांमुळे खूप गाजले. ’माता दिसली स्वगृही रखडत’ ’या नवनवल मधु लाडवा’ ’गजकर्ण खाजविता मजा आला’ इत्यादी विडंबनांनी प्रेक्षक खूष होत असे.

म्युनिसिपालिटी

’म्युनिसिपालिटी’ या नाटकाने जोशींना सर्वाधिक ख्याती मिळाली. म्युनिपालिटीत निवडून गेलेले सदस्य कसा गैरकारभार करतात याचे विडंबनचित्र या नाटकात आहे.

बोलीभाषेचा मुक्त वापर करणारे संवाद, प्रासादिक पद्यरचना, नाटकातील प्रमुख हास्यरस आणि उपहासाचा वापर यामुळे माधवराव जोशी यांची नाटके समाजातील सर्व थरांतील लोकांना आवडली. जोशांच्या काही नाटकामधून त्यांनी एका नव्या प्रकारच्या एकांक-प्रवेशी तंत्राचाही उपयोग केला होता.

माधवराव जोशी यांनी लिहिलेली नाटके

  • सं. आनंद (१९२३)
  • उधार-उसनवार (१९४६)
  • करमणूक
  • कर्णार्जुन (१९१०)
  • सं. कृष्णविजय (१९११)
  • सं. कृष्णार्जुन
  • गिरणीवाला अथवा मालक मजूर (१९२९)
  • सं. नामधारी राजे
  • सं. पद्मिनी विलास
  • पुनर्जन्म ऊर्फ सावित्री (१९३१)
  • पैसाच पैसा (१९३५)
  • सं. प्रेमगुंफा
  • प्रेमसागर
  • सं. प्रेमळ लफंगे
  • प्रोफेसर शहाणे (१९३६)
  • मनोरंजन (राधाकृष्णाच्या कथाप्रसंगावरील पौराणिक नाटक, १९१६)
  • मोरांचा नाच (१९३८)
  • वऱ्हाडचा पाटील (१९२८)
  • सं. वशीकरण (१९३२)
  • सं. विनोद (प्रहसनवजा नाटक, १९१४)
  • सं. विश्ववैचित्र्य (१९३२)
  • सं. सत्त्वसाफल्य
  • स्थानिक स्वराज्य अथवा संगीत म्युनिपालिटी (१९२५)
  • सं. हास्यतरंग (१९२१)

विशेष

नाटककार म्हणून माधवरावांची कारकीर्द सुमारे २७ वर्षांची होती. या कालावधीत त्यांनी २४ नाटके लिहिली. त्यांच्या बहुतेक नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर किमान ३० वर्षे होत राहिले; म्य़ुनिसिपालिटी’चे तर अजूनही होतात.

माधवराव जोशी हे सन १९४४ साली जळगाव येथे झालेल्या ३७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.