माक्स म्युलर
फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले.
लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले.
इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली.
१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले.
तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती.
भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते.
मुल्लरने लिहिलेले किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली लिहिले गेलेले ग्रंथ
- The Sacred Books of the East (५०-खंडी ग्रंथ, यांतल्या फक्त तीन खंडांना मॅक्समुल्लरची देखरेख लाभली नाही)
- Biographical Essays : केशवचंद्र सेन, कोलब्रुक, दयानंद सरस्वती, राजा राममोहनराय, आदींची चरित्रे
- Chips From a German Workshop (तीन खंड) :
- पहिला खंड : ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, झेंड अवेस्ता, बौद्धधर्म, सेमिटिक एकेश्वरी पंथ, इत्यादी विषयांवरील व्याख्याने
- दुसरा खंड : तुलनात्मक दैवतशास्त्र
- तिसरा खंड : वाङ्मय, चरित्रे व प्राचीन वस्तू इत्यादींसंबंधी विवेचन
- India What Can It Teach Us : भारतासंबंधी भाषणांचे संकलन
- Introduction to the Science of Religion
- Olde Lang Syne : (दोन खंड)
- पहिल्या खंडात - मुल्लरशी समकालीन अशा अनेक वाङ्मयाभ्यासी हिंदी व यूरोपीय पंडितांशीं झालेल्या भेटींचे प्रसंग, वाङ्मयलेखन कलेचे सर्वसामान्य विवेचन वगैरे माहिती दिली आहे.
- दुसऱ्या खंडात - आनंदीबाई जोशी, केशव चंद्रसेन, गौरीशंकर उदय शंकर ओझा, दयानंद सरस्वती, देवेंद्रनाथ टागोर, राधाकांत देव, द्वारकानाथ टागोर, नीलकंठ गोरे, पंडिता रमाबाई, बेहरामजी मलबारी, रामकृष्ण परमहंस, रामतून लाहिरी वगैरे सुप्रसिद्ध व्यक्तींची माहिती आली आहे.
- प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा इतिहास (भारतात आजही संस्कृतच्या अभ्यासक्रमात असलेला ग्रंथ)
- षड्दर्शने
- फिजिकल रिलिजन, ॲन्थ्रॉपॉलॉजिकल रिलिजन, व सायकॉलॉजिकल रिलिजन हे तीन धर्मविषयक ग्रंथ