मांदेली
मांदेली हा माश्याचा एक प्रकार असून विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई भागात हा विपुल सापडतो. तसेच पूर्व किनाऱ्यावर ओरिसात नदीमुखखाड्यांतून व इंडोनेशियाच्या द्वीपसमूहापर्यंत हा सापडतो.
मांदेलीच्या शरीराची लांबी सु. १८–२० सेंमी. असते. शरीर लांबट, शेपटीकडे निमुळते होत जाणारे, दोन्ही बाजूंनी चापट असते. मुस्कट टोकदार असून वरचा जबडा पुढे आलेला असतो. तोंडाची फट खालच्या बाजूला व डोळ्यांपर्यंत खोलवर गेलेली असते. जीभेवर व तालूवर बारीक बारीक दात असतात. पृष्ठपक्ष (हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी पाठीवरील त्वचेची स्नायुमय घडी; पाठीवरील पर) लहान असून तो मागच्या बाजूस शेपटीपर्यंत गेलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) मागच्या बाजूला वाढून पुच्छपक्षाला (शेपटीच्या पराला) मिळालेला असतो. शेपटी टोकदार व लांब असते. पुच्छपक्ष पालींमध्ये (खंडांमध्ये) विभागलेला नसतो. अंगावर लहान लहान खवले असतात. डोक्यावर अजिबात खवले नसतात. रंग सोनेरी चमकदार असून शरीराच्या खालच्या बाजूवर काळसर ठिपक्यांच्या २ ते ३ ओळी असतात.
मुंबई किनाऱ्यावर वर्षभर आढळणारा हा मासा या भागात अत्यंत लोकप्रिय आहे. हा ताजा किंवा खारवून, वाळवूनदेखील खातात. याच्या प्रजोत्पादनाविषयी विशेष माहिती नाही. याच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एक पौष्टिक खाद्य मत्स्य म्हणून याला महत्त्व आहे.
बाह्य दुवे
- सोन्याचांदीची मासोली Archived 2008-02-05 at the Wayback Machine.