Jump to content

महेश भागवत

महेश मुरलीधर भागवत (१७ जून, १९६९:पाथर्डी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविल्यानंतर ते आयपीएस झाले. भागवतांची ५ सप्टेंबर, १९९७ रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे ते मणिपूर-त्रिपुरा केडरमधून आंध्र प्रदेश केडरमध्ये आले. १ जुलै २०१६ पासून ते तेलंगण राज्यात राचकोंडा [हैदराबादचा पूर्व भाग)चे पोलीस आयुक्त आहेत.

नक्षलवाद्यांशी समन्वय

आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात काम करीत असताना पीपल्स वॉर ग्रुपच्या नक्षलवाद्यांनी सिरपूर-कागजनगरचे आमदार आणि त्यांच्या चार अंगरक्षकांची हत्या केली. नक्षल्यवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहिल्यावर भागवत यांनी पाठिंब्यामागची कारणे शोधून काढली आणि नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणारा अज्ञातम्‌ स्वेच्छा हा प्रकल्प राबविला. पोलीस आणि नागरिकांमधील समन्वयासाठी मैत्री संघम्’ निर्माण केला. मी कोसम् या उपक्रमाद्वारे त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगचे उदाहरण दिले.

स्त्रियांच्या व्यापाराचे रॅकेट

आंध्र प्रदेशातील नलगोंडाचे पोलीस अधीक्षक असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. त्यात अडीचशे व्यक्तींना अटक करून लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका केली. त्यानंतर पीडित स्त्रियांना उदबत्त्या, भांडी निर्मितीचे, शिवणकामाचे शिक्षण देऊन उपजीविकेचे साधन दिले. या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले जीवन येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांनी अशासकीय संस्थांची मदत घेत शेकडो मुले, महिला, युवतींची सुटका केली आहे.

विशेष

अंधश्रद्धा निर्मूलन समितीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत आणि नर्मदा बचाओ आंदोलनात मेधा पाटकर यांच्यासोबत भागवतांनी काही काळ काम केले आहे.

महेश भागवत

  • प्रेसिडेन्ट्स पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (PPMG)-२००४
  • पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस (PMMS)-२०११
  • लैंगिक शोषणासाठी आणि बाल किंवा इतरही मजुरीसाठी होणाऱ्या मानवी तस्करीविरुद्ध केलेल्या कार्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने महेश भागवत यांना २०१७ सालचे ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हीरोज ॲवॉर्ड’ प्रदान केले आहे.