२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक ही १३ ऑक्टोबर २००४ रोजी आयोजित करण्यात आलेली निवडणूक होती. याद्वारे महाराष्ट्राची ११वी विधानसभा निवडण्यात आली. निवडणुकीपूर्वी राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकशाही आघाडी सरकार होते. मुख्य लढत प्रमुख आघाडी म्हणजे लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पार्टी - शिवसेना यांची युती ह्यांच्या मध्ये होती. इतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि लोकजनशक्ती पक्ष ह्यांचा समावेश होता. ह्या निवडणुकीत आघाडी सरकारने चुरशीच्या लढतीत युतीचा पराभव करून आपली सत्ता कायम ठेवली. विलासराव देशमुख आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसरी आणि अखेरची कारकीर्द ठरली.
निवडणूक प्रक्रिया आकडेवारी
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्यांना निवडण्यासाठी एकूण ६४,५०८ मतदान केंद्रावर ६६,००० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली. एकूण २,६७८ उम्मेदवारांनी ही निवडणूक लढवली ज्यात १,०८३ अपक्ष आणि १५७ महिला उम्मेदवारांचा समावेश होता. एकूण ६,५९,६६,२९६ पात्र मतदारांपैकी ४,१८,२९,६४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशा रीतीने एकूण ६३.४१% मतदान झाले.[१]
निकाल
निवडणुकीचा निकाल १७ ऑक्टोबर २००४ रोजी घोषित करण्यात आला, ज्यात काँग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून बनवल्या आघाडीला म्हणजेच लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत वेंकय्या नायडूंनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांना पक्षाची कमान मिळाली.
निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्वाधिक २१.०६% मते मिळाली. त्यानंतर शिवसेना १९.९७%, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १८.७५% आणि भारतीय जनता पक्षाला १३.६७% मते मिळाली. २८८ सदस्यांच्या विधानसभेत लोकशाही आघाडीने एकत्रितपणे १४१ जागा जिंकल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ७१, काँग्रेसने ६९ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एक जागा जिंकल्या. अशाप्रकारे आघाडीला साधारण बहुसंख्य पाठबळाच्या चार जागा कमी मिळाल्या. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेना-भारतीय जनता पार्टीच्या युतीने ११७ जागा जिंकल्या. त्यात शिवसेना ६२, भाजपा ५४ आणि स्वातंत्र्य भारत पक्षाने (एस टी बी पी) एक जागा जिंकल्या. निवडणुकीच्या निकालामुळे फेकले जाणारे आणखी एक मोठे आश्चर्य म्हणजे बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक २७२ जागा लढवल्या पण त्यांना एकही जागा जिकता आली नाही.[२] निवडणुकीत १९ अपक्ष उम्मेदवार आणि १२ महिला उम्मेदवार विजयी झाले.[१]
निवडणूक कार्यक्रम
क्र.
घटना
दिनांक
१
कार्यक्रम जाहीर
२४ ऑगस्ट २००४
२
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात
१५ सप्टेंबर २००४
३
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
२२ सप्टेंबर २००४
४
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस
२३ सप्टेंबर २००४
५
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
२५ सप्टेंबर २००४
६
निवडणुकीची तारीख
१३ ऑक्टोबर २००४
७
मतमोजणीची तारीख
१६ ऑक्टोबर २००४
मतदान
माहिती
एकूण मतदारसंघ: २८८
उमेदवार: २६७८ (पैकी १५७ महिला)
मतदारांची एकूण संख्या :
पुरुष : ३,४३,७४,३६४
महिला : ३,१५,९१,४२८
एकूण : ६,५९,६५,७९२
मतदान केंद्राची संख्या : ६४,५०८
सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :चिमुर - २२ उमेदवार
सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र : शिर्डी - २ उमेदवार