महाराष्ट्र चित्तपावन संघ
१९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर पुण्यात व पुण्याबाहेरही चित्पावनांचे संघ निघू लागले. १९३५ साली सांगलीचे उद्योगपती विष्णूपंत वेलणकर यांच्या देणगीमुळे आणि वि.ना. जोशी केम्पवाडकर यांनी औद्योगिक निधीसाठीदिलेल्या ट्रस्टच्या व्याजाच्या तरतुदीमुळे लीगची आर्थिक चणचण दूर झाली.. १९३६ च्या दरम्यान कार्यकारी मंडळ स्थापन झाले. नंतर सभासद नोंदणी, विद्यार्थीसहाय्य अशी कामे सुरू झाली. लीग हे विदेशी नाव बदलून १९३६ च्या आरंभी महाराष्ट्र चित्पावन संघ हे व्यापक नाव कायम करण्यात आले. कायदेशीरपणा येण्यासाठी घटना, नियम, रजिस्ट्रेशन करण्यात आले.
१९३९ पासून चित्पावन संघ उद्दिष्टांनुसार समाजोपयोगी कामे करीत आहे.. गणेश गोविंद गोरे आणि त्यांचे मदतनीस सीतारामपंत वझे यांनी निरलसपणे काम करून संस्थेत कार्यप्रवणता व चैतन्यशीलता आणली. पुढे संघाला असेच कार्यकर्ते मिळत गेले. बॅ. अनंतराव खाजगीवाले यांच्या नेतृत्वाखाली ग.वि.नातू, ना.चिं. नातू, स.वा.जोशी, सी.वि. केळकर, कृ.के. काळे, ग.स.मराठे इत्यादी कार्यकर्ते तळमळीने कार्य करू लागले. सभासदसंख्या वाढली, देणग्या मिळाल्या आणि संघाच्या कार्याची व्यापकता वाढली. आता महाराष्ट्र चित्पावन संघ हा विद्यार्थी साहाय्य, शिष्यवृत्या इत्यादींबरोबर इतर कामेही करू लागला. गुणिजनांचा सत्कार, थोरांचे स्मृतिदिन, वासंतिक रसपान, चित्पावनांशी संबंधित कामांना मदत, राष्ट्रीय आपद्कालीन साहाय्य अशी मदतीची अनेक कामे पार पाडण्यात येऊ लागली. ही कामे करताना कुठलाही जातिभेद अथवा धर्मभेद करण्यात येत नाही. विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे खेड्यापाड्यांतून आलेल्या अनेक गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवासाची, खाण्यापिण्याची आणि अभ्यासाची सोय करण्यात येते. त्यासाठी जंगली महाराज रोड आणि मॉडेल कॉलनी येथे दोन भव्य वसतिगृहे आहेत.
बहुतेक सर्व आडनावांच्या कोकणस्थ ब्राम्हणांच्या कुलवृत्तांत ग्रंथांचा संग्रह आणि इतर काही उपयुक्त ग्रंथांचे जतन करून त्याचा उपयोग जनतेला करू दिला जातो. महाराष्ट्र चित्पावन संघाचे चित्पावन वधू-वर सूचक मंडळ असून शेकडो लोक याचा लाभ घेत असतात.
१९५२ साली गणेश विष्णू पेंडसे यांनी पुण्यातील टिळक रोडवरील साहित्य परिषदेसमोरील पेंडसे भवन ही इमारत आणि . शिवराम गंगाधर गोगटे यांनी नागनाथ पाराजवळील गोगटे वाडा या त्यांच्या मालकीच्या इमारती संस्थेला देऊन टाकल्या. १९६४ च्या आरंभी लिमयेवाडीतील मोने वाडा संस्थेला मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र चित्पावन संघाला पुण्यातील कार्याची व्याप्ती करण्यासाठी हक्काच्या जागा मिळाल्या.
महोत्सव आणि संमेलने
- २०-४-१९५८ : रौप्य महोत्सव, अध्यक्ष बडोद्याच्या परशुराम पॉटरीजचे परशुरामपंत गणपुले.
- इ.स. १९८३ : सुवर्ण महोत्सव, अध्यक्ष उद्योगपती बा.म. गोगटे
- ५-२-२००२ : १००० कुटुंबांचे महासंमेलन, अध्यक्ष अभिनेते चंद्रकांत गोखले
- २३-१२-२००७ : जागतिक महासंमेलन, अध्यक्ष रमेश दामले
शाखा
- महाराष्ट्र चित्पावन संघाच्या डोंबिवली व अहमदनगर व श्रीरामपूर येथे शाखा होत्या, त्या इ.स.२०११ साली बंद करण्यात आल्या.
- पुणे शाखा (चालू आहे). या शाखेतर्फे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
- विदर्भातील शाखा - अकोला, अमरावती, नागपूर. या शाखांतर्फे नागपूरला २० जानेवारी २०१३ रोजी पहिले वैदर्भीय चित्तपावन संमेलन रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृतिभवनाच्या परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. व्हीसीएचे माजी अध्यक्ष ॲड. शशांक मनोहर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वि.स. जोग अध्यक्ष होते.
पहा : ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था