महांकाली नदी
महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील महांकाली नदीचा उगम हा बसप्पावाडी तलावातून होतो. या नदीची लांबी २२.५ किमी असून ही अग्रणी नदीची उपनदी आहे. महांकाली नदीचे खोरे कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत आहे. कवठेमहांकाळमधील ११ गावे आणि जत मधील ९ गावे महांकाली नदीच्या खोऱ्यात येतात या नदीला २० गावांतून अनेक छोटे मोठे नाले येऊन मिळतात.
महांकाली नदीवर बसप्पावाडी गावापासून ते शिंगणापूर गावापर्यंत एकही बांधबंधारा नव्हता. या भागात पाऊस कमी असतो. त्यातूनही बंधारा नसल्याने पाणी वाहून पुढे जायचे, त्यामुळे बसप्पावाडी, अंकले, कोकळे, ढफळापूर, कुडनूर, करलहट्टी या गावांना नदी पात्र असूनही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असे. जानेवारी २०१७मध्ये डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांच्या जलबिरादरी टीमने महांकाली नदीची पाहणी केली आणि कोकळे कुडनूर हद्दीत नदीवर लोकसहभागातून बंधारा बांधण्यास सुरुवात केली. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि एक एक करत आज जलबिरादरीच्या मदतीने आणि लोकसहभागातून महांकाली नदीवर साखळी पद्धतीने ५ सिमेंट बंधारे बांधून तयार झाले आहेत. अग्रणी अगस्ती बंधारा, अग्रणी जलतीर्थ बंधारा; अग्रणी माऊली बंधारा, अग्रणी विठ्ठल बंधारा,अग्रणी संगमनाथ बंधारा हे पाच बंधारे कौकले गावच्या महाकाली नदीवर बांधण्यात आले आहेत. जेव्हां हे बंधारे पावसाच्या पाण्याने किंवा योजनेच्या पाण्याने भरतील तेंव्हा संपूर्ण महांकाली नदी आणि परिसरात विविध कामांसाठी पाणी भरपूर उपलब्ध होणार आहे.या पाच़ बंधाऱ्यामुळे दरवर्षी कौकले गावाला पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे टॅंकर बंद झालें आहेत. तसेच गावांतील विहीरी आणि बोअरवेल यांनासुद्धा खूप फरक पडला आहे. जलबिरादरीच्या मदतीने आणि लोकसहभागामधून बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे कौकले आणि परिसरामध्ये शेतीविकास होऊ लागला आहे. परिसरात बागायत शेतीमधग्येसुद्धा वाढ होऊ लागली आहे. या बंधाऱ्याळे गावांतील लोकांमधे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
हे सुद्धा पहा
- जिल्हावार नद्या