मसूर (कराड)
मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गांव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे.
समर्थांची मारुती स्थापना प्रेरणा व स्वरूप
समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारुती होय.
महारुद्र हनुमान व मंदिर
मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती 'मसूरचा मारुती' म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान' असेही म्हणतात. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रह्मापुरी भाग ओढ्यापलीकडे आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे व डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभार्ऱ्याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे. देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फूट लांबीरुंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे.
देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतिवर्षी ह्याच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी ह्या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. ह्या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना 'कल्याण' हा शिष्य मिळाला.
शिष्य कल्याण
'कल्याणा'चे मूळ नाव 'अंबाजी' असे होते. समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, 'अंबाजी, कल्याण आहे ना?' त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, 'सर्व कल्याण आहे.' अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे 'कल्याण' हेच नाव रूढ झाले.
समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज 'रामदासी' मसूर येथे आले असता त्यांना मारुतीरायांनी 'येथेच राहा' असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरुस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पद्धत ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही.