Jump to content

मल्हारगड (चाळीसगाव)

मल्हारगड चाळीसगाव

मल्हारगड हा अत्यंत दुर्लक्षित असा किल्ला आहे.   या किल्ल्यावर गडावर असणाऱ्या सर्व अवशेषांना पहिले असता एका किल्ल्यावर असणाऱ्या सर्व सोयी इथे पृवीच्या काळी होत्या हे दिसून येते. चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण १५ कि. मी. अंतरावर कन्नड घाटातील सह्याद्री पर्वत रांगेंच्या सुळक्यावर हा किल्ला आहे.

               कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दोन मुखी हनुमान मंदिरापासून वर पहिले असता या किल्ल्याचा बुरुज व तटबंदी स्पष्टपणे दिसते. याच हनुमान मंदिरापासून एक पाय वाट किल्ल्यावर जाते, तर घाटाच्या रस्त्याने गाडीने जाण्यासाठी अर्धा घाट पार केल्यानंतर डाव्याबाजूला दुःचाकी व चारचाकी वाहने जाण्यासाठी रस्ता आहे. तेथे जय मल्हार खंडोबा देवस्थान असा फलक आहे. या रस्त्याने गेले असता मुख्य किल्ल्याच्या आधी एक ब्रिटिश कालीन दगडी विहीर लागते व तिच्या वरच्या बाजूला टेकडीवर पडके दगडी बांधकाम आहे. ब्रिटिश काळात घाटातील जकात वसूल करण्याची चौकी असावी असे सांगितले जाते. पुढे गेल्यानंतर आता नव्याने वन विभागाने बांधलेला निरीक्षण मनोरा आहे.  

               याच्याच पुढे किल्ल्याचा खंदक लागतो. हा खंदक  काही वर्षांपूर्वी  गाडी जाण्यापुरता भराव करून रस्ता केला आहे. खंदकांचे बुरुज आताही भक्कमपणे उभे आहेत. मात्र झाडीमध्ये झाकले गेले आहे. खंदक ओलांड्यालनंतर पडक्या बुरुजाचे अवशेष पाहावयास मिळतात. हा बुरुज आज जरी पडक्या अवस्थेत असला तरी त्याच्या बांधकामाच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. याच्याच बाजूला एक भुयार असून तो भुयारी रस्ता किल्ल्यावरून बाहेर पडण्यासाठी दुसरी चोर वाट असावी. कारण या भुयाराच्या दिशेने पायथ्याला शिवापूर नावाचे गाव काही अंतरावर आहे. या गावाच्या बाजूनेही एक पाय वाट किल्ल्यावर येण्यासाठी आहे. हा भुयारी रस्ता पुढे याच पायवाटेला जाऊन मिळत असावा. भुयार पाहून पुढे गेले असता वरच्या बाजूला छोट्याश्या टेकडीवर एक शेंदूर लावलेले हनुमानाची मूर्ती आहे. मूर्ती समोर छोट्या पटांगणासारखी मोकळी जागा आहे. कदाचित त्याकाळी गडावरील शिबंदी येथे बलोपासना (व्यायाम) करत असावे. हनुमानाचे दर्शन घेऊन समोरच खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वी दगडी होते, परंतु ते मंदिर जीर्ण झाल्याने मागे काही वर्षा पूर्वी येथील खंडोबा भक्त बेडीवाले बाबा (सलीम बाबा ) यांनी काही भक्त व देणगीदारांची वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या मंदिरातील खंडोबा, म्हाळसाई, बाणाई यांच्या पुरातन मुर्त्या आहेत.

                    मंदिराच्या समोरील डाव्या बाजूच्या पायवाटेने थोडे खाली गेल्यास तेथे पिण्याचे शुद्ध पाण्याचे मोठे टाके आहे. या टाक्यात बारमाही स्वछ व थंडगार पाणी असते. त्याचेच बाजूला आणखी एक पाण्याचे टाके आहे मात्र त्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. तर मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतर खाली चालत गेल्यास जवळपास १४ पाण्याचे दगडी टाके  आहेत. हे टाके कोरीव असून काही टाके लेण्यांप्रमाणे दिसतात तर मंदिराच्या समोर सरळ २०० ते २५० फूट चालत गेल्यास एक मोठे पाणीचे टाके वजा तलाव आहे याला येथे घोडेपागा असेही म्हणले जाते. यात  घोडे पाणी पित असावे किंवा त्यांना धुण्यासाठी पृवी याचा वापर होत असावा याच घोडेपागे पासून साधारण १५ ते २० फुटावर खालच्या २ मुखी हनुमान मंदिरापासून दिसणारा किल्ल्याचा बुरुज आहे.

             या बुरुजाच्या लगतच दगडात कोरलेली दगडी पायऱ्यांची वाट आहे. ही पायवाट थेट खाली असलेल्या बोढारे गावाच्या फाट्यापर्यंत जाते. किल्ल्यावर असलेल्या मुबलक पाणी साठ्याच्या टाक्यांची व्यवस्था व विस्तृत पठार यावरून याठिकाणी असे लक्षात येते कि पूर्वी घाट माथ्यवर  जाणाऱ्या सैन्याचा विश्रांतीचा थांबा म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व असावे. आज निश्चित असा या किल्ल्याचा कालखंड यावरून राजवट  व याचा इतिहास उपलब्ध होत नसला तरी किल्ला म्हणून मान्यता मिळण्या इतके सारे अवशेष इथे पाहावयास मिळतात.