Jump to content

मल्लिका अमर शेख

मल्लिका अमर शेख
जन्म नाव मल्लिका अमर शेख
जन्मफेब्रुवारी १६, इ.स. १९५७
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म मुस्लिम / बौद्ध
कार्यक्षेत्र कवयित्री, लेखिका
साहित्य प्रकारकविता
विषयविद्रोही कविता
वडील अमर शेख
पतीनामदेव ढसाळ
अपत्ये पुत्र:
कन्या:

मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका नामदेव ढसाळ (१६ फेब्रुवारी, १९५७) ह्या मराठी लेखिका आहेत. त्या कवी अमर शेख यांच्या कन्या व कवी कै. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत.

जन्म व बालपण

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख हे मल्लिका शेख यांचे वडील होत. वयाच्या सातव्या वर्षी मल्लिका यांनी पहिली कविता लिहिली. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटक, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. ‘वाळूचा प्रियकर’, ‘देहऋतू’, ‘महानगर’ आणि ‘माणूसपणाचं भिंग बदलल्यावर’ या संग्रहांतील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. त्यांनी शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता करता नाटकात काम करावे असे वाटू लागले. पुढे नाटके व एकांकिका लिहिल्या.

जडणघडण

कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेला परखड स्पष्टवक्तेपणा, विचारांचे स्वातंत्र्य आणि वादविवादातून विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आयुष्यात पुढे फार उपयोगी पडली. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचे केंद्र असणाऱ्या मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा वावर असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे.घरात जीवन समृद्ध करणारे धडे घेत असताना त्यांना शाळेत जाऊन शिकण्याऐवजी हे सगळे ऐकणे, पाहणे खूप आवडायचे. घरामध्ये वडिलांची शब्दांची सतत होत असलेली झटापट मल्लिका अनुभवत.
दलित पॅंथरची स्थापना करणारे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्याशी त्यांचा प्रेम विवाह झाला. मला उद्ध्वस्त व्हायचंय हे त्यांचे आत्मकथन खूप गाजले. पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणाऱ्या निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झाले होते.[]

प्रसिद्ध काव्यपंक्ती

नाक्यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये
पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत,
तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाहीत.

साहित्यकृती

  • वाळूचा प्रियकर (१९७९)
  • महानगर (१९९३)
  • देहऋतु (१९९९)
  • समग्राच्‍या डोळा भिडवून (२००७)
  • सूर एक वादळाचा (२००६) याहीर अमर शेख यांच्‍याविषयीचे संपादन
  • मला उद्ध्‍वस्‍त व्‍हायचंय (१९८४) विस्‍फोटक आत्‍मकथन

पुरस्कार

  • साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्‌यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१६)

संदर्भ

  1. ^ डॉ. संजीवनी तडेगावकर. "परखड आणि स्पष्टवक्ती मल्लिका". १५ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.