Jump to content

मराठी विश्वकोश : अठरावा खंड

मराठी भाषेच्या इतिहासात भूषणावह ठरेल असा मराठी विश्वकोश निर्मितीचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. नियोजित वीस संहिता खंडांपैकी अठरावा खंड १५ ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशित करण्यात आला.

परिचय

शेख अमर (शाहीर अमर शेख) ते सह्याद्रि (नोंदशीर्षकांतील तत्सम शब्द संस्कृतप्रमाणेच) एवढ्या नोंदींचा या खंडात समावेश आहे. ‘शेतकामाची अवजारे व यंत्रे’ ही प्रस्तुत खंडातील पहिली विस्तृत नोंद असून ‘संस्कृत साहित्य’ ही या खंडातील सर्वाधिक विस्तृत नोंद ठरते. संगणक आणि संगीतविषयक नोंदीही तपशीलवार आणि त्या त्या क्षेत्राचा गंध नसतानाही जिज्ञासूपणाने वाचन करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा आहेत.

‘समाज’, ‘संस्कृति’, ‘संग्रहालये’ या नोंदीही खास मराठी विश्वकोशीय धाटणीच्या आहेत. श्री रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर, सत्यसाईबाबा या नोंदी ह्या एकाच खंडात अवतरण्याचा योगायोग घडून आला आहे पण रामदेवबाबा व रविशंकर यांच्यावरील नोंदी तितक्याशा तटस्थ व विश्वकोशीय प्रकृतीला मानवणाऱ्या गंभीर प्रकृतीच्या वाटत नाहीत. रामदेवबाबांच्या नोंदीतील गुगल या संकेतस्थळावर त्यांचा कार्यक्रम व यौगिक साधना यांना १७,५०० पृष्ठे दिलेली आहेत हे वाक्य या नोंदीचा दर्जा दाखविण्यास पुरेसे आहे. (पृष्ठ १९७). जनप्रबोधनासाठी इतर माध्यमे उपलब्ध आहेत ! इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राशी संबंधित नोंदी मात्र मोजक्या शब्दांत नेमकेपणाने मांडण्याची परंपरा कायम राखली गेली आहे. संदेशवहन, संपीडक, संगणक, संचसिद्धान्त, संभाव्यता, संकरज ओज, सरल हरात्मक गति या नोंदींमधील भाषेची ढब पाहता आजची मराठी भाषा शास्त्रीय व तांत्रिक प्रक्रियांचा भार अर्थसुलभतेने पेलू शकते याची खात्री पटते. यापूर्वीच्या खंडांप्रमाणेच वैद्यकशास्त्राशी संबंधित नोंदी भाषिक दृष्टीने अभिनव आणि तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त आहेतच पण संदर्भ म्हणून होणारा विश्वकोशाचा वापर पाहता उपचार अधिक तपशिलाने द्यावयास हवे होते असे वाटल्यावाचून राहत नाही. ‘सरदेशमुख, त्र्यंबक विनायकराव’ या नोंदीतील त्यांचे वडील त्र्यंबकराव हे संस्थानिकांचे खाजगी सचिव होते हे वाक्य खटकते (तिरपा ठसा माझा, पृष्ठ ७६६). संदर्भग्रंथांची नेत्रसुखदता यथातथाच असते पण सतराव्या आणि अठराव्या खंडांच्या बाबतीत हे विधान अप्रस्तुत ठरते. सतराव्या खंडाच्या प्रसिद्धीनंतरच एक ते सतरा या खंडांचा समावेश असलेला सीडींचा संच सातशे रुपयांत मंडळाने उपलब्ध केला होता. (खरे तर एक डीव्हीडी हा सुटसुटीत पर्याय ठरला असता.) त्यात ह्या सर्व खंडांसाठी सहाय्यभूत ठरू शकेल अशा परिभाषा संग्रहाचा समावेश नव्हता ही घोडचूक आहेच पण काही पानांवरील पेनपेन्सिलीच्या खुणा आणि एकदोन ठिकाणी पृष्ठांच्या क्रमात झालेली गडबड वगळता हा उपक्रमही कौतुकास्पदच आहे.

यथावकाश मंडळाने सर्व खंडांतील नोंदींचे विषयानुरूप वर्गीकरण करून त्या स्वतंत्रपणे ग्रंथरूपात किंवा सीडींच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास मराठी विश्वकोशाच्या उपयुक्ततेत आणखी भर पडेल.