Jump to content

मराठी विज्ञान परिषद

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे.[] मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत.

अशाच उद्देशाने कलकत्यात १९१३ साली ’भारतीय विज्ञान परिषद संस्था’ स्थापन झाली आहे. मराठी विज्ञान परिषद या संस्थेहून निराळी आहे.

उद्देश

१. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे. २. विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे. ३. विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे. ४. वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे[]

कार्य

वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, मासिक विज्ञान गप्पांचा कार्यक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरूकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक चालवणे, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.

मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.

मराठी विज्ञान परिषदेला भारत सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, तसेच इचलकरंजीचे फाय फाउंडेशन यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

'परिषदेचे विभाग

मुंबई व कोकण

१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) रोहा, ८) रत्‍नागिरी, ९) नारिंग्रे

पश्चिम महाराष्ट्र

१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर

पुणे विभाग

मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे या हेतूने १९६७ साली मराठी विज्ञान परिषद (पुणे विभाग) ह्या संस्थेची स्थापना झाली.

उत्तर महाराष्ट्र

१) धुळे, २) चाळीसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक

मराठवाडा

१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव

विदर्भ

१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशीम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया

महाराष्ट्राबाहेर

१) बडोदा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ

अधिवेशने

  • मराठी विज्ञान परिषदेचे पहिले अधिवेश १९६६मध्ये झाले होते.
  • ४४वे अधिवेशन नागपूरला २२ ते २४ जानेवारी २०१० या कालावधीत झाले होते.
  • ४५वे अधिवेशन बोर्डीला १८-२० डिसेंबरला भरले होते.
  • ४६वे अधिवेशन ३ ते५ नोव्हेंबर २०११दरम्यान पुणे मुक्कामी झाले होते.
  • ४७वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर २०१२ या काळात बारामती येथे झाले.
  • ५४वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन २०१९ हे १८ ते २० जानेवारी, २०२०ला केशवसुत स्मारक, मालगुंड, रत्‍नागिरी येथे झाले.


पुरस्कार

कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार -२०१७

मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा, ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार’[] हा पुरस्कार या वर्षी मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येत आहे. सामान्य माणसापर्यंत मराठी भाषेतून विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने, परिषद करीत असलेल्या गेल्या पाच दशकांच्या प्रयत्नांना मिळालेली ही मोठी पावती आहे. विविध विषयांवरील अभ्यासवर्ग, व्याख्याने, पुस्तके, इ-पुस्तके, मासिक, अशा विविध माध्यमांद्वारे, परिषद मराठीतून विज्ञानप्रसाराचे हे कार्य करीत आली आहे. या अभिमानास्पद गौरवाला पात्र होण्यासाठी, परिषदेच्या सत्तरहून अधिक विभागांतील परिषदेचे कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, कर्मचारीवृंद, अशा अनेक घटकांचा हातभार लागला आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

बाह्य दुवे

  1. ^ "संपर्क – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)" (इंग्रजी भाषेत). 2022-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ "परिषदेबद्दल – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)" (इंग्रजी भाषेत). 2022-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-20 रोजी पाहिले.
  3. ^ [१]दि.२२ फेब्रुवारी २०१८ च्या शासननिर्णयानुसार सन २०१७ या वर्षाचा “कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा-संवर्धक पुरस्कार”