मनोहर नरे
कामगार नेते मनोहर नरे (इ.स. १९३८ - १४ ऑक्टोबर, इ.स. २०१४) हे एक मराठी नाट्यनिर्माते होते. ते मुंबईतील शिवाजी मंदिर न्यासाचे ६ वर्षे विश्वस्त होते. २३ जानेवारी १९८० रोजी नरे यांनी ओम् नाट्यगंधा नावाची नाट्यसंस्था काढली. या संस्थेद्वारे त्यांनी ओम नाटय़गंधातर्फे त्यांनी ३०हून अधिक नाटके रंगभूमीवर आणली. नाटकाशी संबंधित असे प्रभाकर पणशीकरांचे ’जिंकू दाही दिशा’ आणि ’मांगल्याचं लेणं’ हे कार्यक्रमही त्यांच्या नाट्यसंस्थेने रंगमंचावर सादर केले होते. नृत्यांगना सुरेखा पुणेकर या नरे यांच्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आल्या.
मनोहर नरे यांनी कोहिनूर मिलमध्ये काम करत असताना १९६९ साली राष्ट्रीय मिल मजदूर संघात प्रवेश केला;. त्यानंतर त्यांनी कामगार संघटनेच्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी दाखविलेल्या लढाऊवृत्तीने त्यांनी गिरणी कामगार चळवळीत आपला ठसा उमटविला होता. ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे २५ वर्षे सचिव आणि शेवटी उपाध्यक्ष होते. ते संघटनेच्या तरुण कामगार आघाडीचे अध्यक्ष होते. यातून त्यांनी कर्जमुक्ती, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. संघटनेच्या नाट्यविषयक चळवळीला पुढे नेण्याचे कामही त्यांनी केले..
’माझ्या जीवनाचा नूर कोहिनूर’ हे मनोहर नरे यांचे आत्मचरित्र अरुण धाडीगावकर यांनी शब्दबद्ध केले आहे.
मनोहर नरे यांच्या ओम् नाट्यगंधा या संस्थेची निर्मिती असलेली मराठी नाटके
- आई रिटायत होते
- गाढवाचं लग्न
- नटसम्राट
- वस्त्रहरण (या मालवणी नाटकाचे ६०० प्रयोग ’ओम् नाट्यगंधा’ने केले.)
- वासूची सासू
- सानेचे काय झाले
- संगीत सौभद्र
अन्य कार्यक्रम
- जिंकू दाही दिशा
- मांगल्याचं लेणं
- सोळा हजारात देखणी