मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष | |
---|---|
जन्म नाव | मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष |
जन्म | ७ जून १९१३ मुंबई, महाराष्ट्र |
मृत्यू | - १९ एप्रिल २०१० |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | समीक्षा |
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (जम्म : दादर-मुंबई, ७ जून १९१३; - १९ एप्रिल २०१०) हे मराठी भाषेतील समीक्षक व ललितलेखक होते. मराठी लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होते.
राजाध्यक्ष मुंबईतील ’साहित्य सहवास’ या वसाहतीत रहात. वसाहतीच्या नावाचा वापर करून त्यांनी स.ह. वासकर या टोपणनावाने काही लिखाण केले आहे. शिवाय ' पुरुषराज अळुरपांडे’ असे काहीसे विक्षिप्त नाव घेऊन त्यांचे काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकात येत असत. वजशेष म्हणजे पु.ल. देशपांडे, रा.वा. अलूरकर हे दोन लेखकही याच ' पुरुषराज अळुरपांडे’ या टोपणनावाने लिखाण करीत असत.
जीवन
मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे शालेय शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्यातील वर्डस्वर्थ पारितोषिक त्यांनी पटकावले होते. १९३६ ते १९७१ या काळात अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज, मुंबई येथील इस्माईल युसूफ तसेच एलफिन्स्टन महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले होते.
राजाध्यक्ष यांनी पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही काही काळ काम पाहिले होते. त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ‘अभिरुची’ मासिकातून केली. या मासिकात ‘निषाद’ या टोपणनावाने प्रसिद्ध झालेले ‘वाद-संवाद’ हे त्यांचे सदर खूप गाजले होते. राजाध्यक्ष यांनी रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा, ज्योत्स्ना, समीक्षक अशा मासिकांमधून वेगवेगळ्या नावांनी लेख लिहायला सुरुवात केली होती. ‘पाच कवी’ (१९४६) हे आधुनिक कवींच्या कवितांचे संपादन केलेले त्यांचे पहिले पुस्तक होय. या पुस्तकात त्यांनी केशवसुत, बालकवी, विनायक, गोविंदाग्रज, ना. वा. टिळक यांच्या काव्यांचा आढावा घेतला होता. त्यांची ‘खर्डेघाशी’ (१९६३), ‘आकाशभाषिके’(१९६३), ‘शालजोडी’, ‘अमलान’(१९८३), ‘पंचम’(१९८४), ‘पाक्षिकी’(१९८६) ही लघुनिबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘शब्दयात्रा’(१९८६) हे साहित्यविषयक टिपणांचे आणि ‘भाषाविवेक’(१९९७) ही पुस्तकेही प्रकाशित आहेत. कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’ हा ग्रंथही अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. पु. ल. देशपांडे, अलूरकर आणि मं.वि. या तिघांनी ‘अभिरुची’ मासिकात ‘पुरुषराज अलुरपांडे’ या टोपणनावाने केलेले एकत्रित लेखन हा मराठीच नव्हे तर बहुधा जागतिक साहित्यातीलही एक आगळा प्रयोग ठरावा. अभिरुची मासिकात त्यांनी वाद-संवाद हे सदर चालवले.
अंतर्मुखता हे नव्या काव्याचे प्रमुख लक्षण असल्याचे सांगून काव्यातील ऐहिकता, निसर्गप्रेम आणि गूढवादाचा उलगडा त्यांनी आपल्या लेखनातून केला.
राजाध्यक्ष यांच्या ललित लेखनात आंबोलीसारखे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण, शामगढ हे आडवळणाचे रेल्वेस्थानक, शेवटची ट्राम ट्रेन आदी विषयही आढळतात. सत्यनिष्ठेवर पोसलेले त्यांचे लेखन हे बावनकशी सोन्यासारखे आहे. राजाध्यक्ष यांनी अनेक वर्षे ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले होते. ज्ञानपीठ पुरस्कार समिती व साहित्य अकादमी (मराठी समिती) यांचेही ते काही काळ सदस्य होते.
वाद-संवाद
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी, भाषेचा-आशयाचा बोजडपणा, नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली चाललेला भोंगळपणा हे या वाद-संवादाचे विषय असत. वृत्ती-प्रवृत्तींवर टीका केली जाई आणि ती व्यक्तिगत पातळीवर घसरणार नाही, याची काळजीही घेतली जाई. शमा आणि निषाद म्हणजे अनुक्रमे द.ग. गोडसे आणि मं.वि. राजाध्यक्ष यांनी हे चुरचुरीत आणि पौष्टिक सदर जवळजवळ नऊ वर्षे चालवले. त्या काळात या सदरावर अनेकांचा रोषही ओढवला, पण अशी वृत्तिलक्ष्यी टीका वाचण्याची सवय वाचकांना लागली. 'टवाळा आवडे विनोद' या वचनाला छेद देणारे लेखन मं.विं.नी या सदरात सातत्याने केले.
१९४३ ते ५३ या वर्षांतील या सदरांचे निवडक संकलन वाद-संवाद (निषाद आणि शमा) याच नावाने प्रसिद्ध झाले आहे. तात्कालिक लेखन वगळून आजही प्रस्तुत वाटेल, असे लेख यात घेतल्याचे संपादकांनी म्हणले आहे. 'मुद्रणसाक्षेप' किंवा 'पदवी आणि प्रबंध' असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत. सिनेमागृहात राष्ट्र्गीत वाजवण्याचा आग्रह धरणाऱ्या एका सरकारी आदेशाचे एकदा बरेच चर्वितचर्वण झाले होते. 'राष्ट्र्गीताचा बेंडबाजा' या स्फुट लेखातून ही व्याधी तशी जुनीच असल्याचे कळते आणि निषादाचा अर्थात मं.वि. राजाध्यक्ष यांचा द्रष्टेपणा जाणवून मान आदराने झुकते.
मं.वि. राजाध्यक्ष यांची टोपणनावे
मं.वि. राजाध्यक्ष यांनी विविध टोपणनावांनी लिखाण केले आहे. त्यांतील काही नावे : निषाद, पुरुषराज अलुरपांडे, स.ह. वासकर
प्रकाशित साहित्य
समीक्षा
- भाषाविवेक (१९९७)
- शब्दयात्रा’(१९८६)- साहित्यविषयक टिपणे
लघुनिबंध
- अमलान’(१९८३)
- आकाशभाषिके’(१९६३)
- खर्डेघाशी’ (१९६३)
- निवडक खर्डे (२०१३)
- पंचम’(१९८४)
- पाक्षिकी’(१९८६)
- मनमोकळे
- शालजोडी
संपादित
- पाच कवी’ (१९४६) - केशवसुत, बालकवी, विनायक, गोविंदाग्रज, ना. वा. टिळक यांच्या कवितांचे संपादन.
इतर
- हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर - कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने लिहिलेला इंग्रजी ग्रंथ.
सदस्यत्व
- नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त
- ज्ञानपीठ पुरस्कार समिती व साहित्य अकादमी (मराठी समिती)
संदर्भ
बाह्य दुवे
- लोकसत्ता.कॉम[permanent dead link]