Jump to content

मंगलाजोडी

मंगलाजोडी हे ओरिसा राज्यातील खोरधा जिल्ह्यातील एक गाव असून हे चिल्का सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. येथील मोठा पाणथळ, दलदलीचा प्रदेश अनेक स्थलांतरीत पक्ष्यांना आकर्षित करतो. हे गाव स्थलांतरीत तसेच पाणपक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

निसर्ग

चिल्का या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या काठी वसलेले या गावावर निसर्गसौंदर्याचा वरदहस्त आहे. जगभरातील अनेक ठिकाणांहून इथे हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षी येतात. येथील दलदलीच्या प्रदेशात स्थलांतराचा हंगाम जेव्हा भरात असतो तेव्हा एका वेळी सुमारे १.५ लाख पक्षी वास्तव्यास असतात. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकार यांच्यासाठी हे गाव खास आकर्षण आहे.नोव्हेंबर ते मार्च हा हंगाम येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे गाव जगातील महत्त्वाच्या दलदलींच्या प्रदेशापैकी एक असून आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन प्रदेश म्हणून जाहीर झाले आहे.

आढळणारे पक्षी

येथे काळ्या डोक्याचा शराटी,मोर शराटी,चक्रवाक(स्थलांतरीत), नदी सुरय,कापशी घार,कंठेरी चिखल्या,कमळपक्षी,जांभळी पाणकोंबडी,मळगुजा,पाणकावळा,नकट्या,शेकाटा(स्थलांतरीत) इ.पक्षी आढळतात.

उद्योग व्यवसाय

गावात मुख्यत: चिल्का तलावात मासेमारी करणारे कोळी आहेत. तसेच आता पर्यावरण पर्यटन हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात लाकडी होड्या तयार करण्याचा व्यवसाय सुद्धा केला जातो. आजूबाजूच्या अनेक गावातील कोळी येथून होड्या खरेदी करतात.

पक्षी निरीक्षणाबरोबरच येथे चैत्र महिन्यात होणाऱ्या दांडा यात्रेसाठी सुद्धा येथे पर्यटक येतात. रामलीला सुद्धा मोठ्या उत्साहात सादर केली जाते.

वाहतूक व्यवस्था

मंगलाजोडीला रेल्वेने अथवा रस्त्याने सहज पोचता येते. मुक्तेश्वर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. जवळचे बस स्थानक तांगी येथे भुवनेश्वर पासून ६० कि.मी.वर आहे. कालूपाडा घाट हे अजून एक जवळचे रेल्वे स्थानक आहे. येथे काही एक्स्प्रेस गाड्या थांबतात.

गावात कार्यरत संस्था

मंगलाजोडी येथे काही वर्षांपूर्वी पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर चोरटी शिकार होत असे. त्याला आळा घालण्यासाठी स्थानिक युवकांनी प्रयत्न केले. उदरनिर्वाहाच्या प्रश्नामुळे काही गावकरी पक्ष्यांची शिकार करून ते विकत आहेत, हे लक्षात आल्यावर काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यात आली. गावामध्ये महावीर पक्षी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली.इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गावकऱ्यांना प्रशिक्षण तसेच स्थलांतरीत पक्ष्यांविषयीचे शिक्षण देण्यात आले. त्यामुळे पूर्वीचे शिकारी आता पर्यटकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि पक्ष्यांच्या संवर्धनाच्या कामात त्यांचा सहभाग आहे.या प्रयत्नांना यश येऊन चोरटी शिकार थांबली आहे. पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

मंदिरे

पतित पावन मंदिर हे गावातील सर्वांत जुने आणि सर्वांत मोठे मंदिर आहे. तसेच गुप्तेश्वर, नीलकंठेश्वर, मा मंगला, मा ब्राह्मणी, मा बालीमाझी देवी यांची मंदिरे गावात आहेत.

चित्रदालन