Jump to content

भोपाळ वायुदुर्घटना


भोपाळ वायुदुर्घटना ३ डिसेंबर, १९८४ या दिवशी मध्यप्रदेश येथील भोपाळ या शहरात घडली. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टॅंकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट (एम. आय. सी.) वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास २०,००० लोकांना या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे मृत्यू ओढवला तर ५००,०००हून जास्त जण जखमी अथवा अपंग झाले.

१९८४ मध्ये वायुदुर्घटनेत मरण पावलेल्या आणि अपंग झालेल्यांचे भोपाळ स्मारक

पार्श्वभूमी

युनियन कार्बाईड इंडिया लि. हा एकोणीसशे सत्तरच्या दशकात भोपाळमधला एक महत्त्वाचा प्रकल्प होता. अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीची ही भारतातील सबसिडियरी. इथे ‘सेव्हिन’ (कार्बारिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाईल आयसोसायनाइट (एमआयसी) व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाईल आयसोसायनाइट वायुरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकन तसेच भारतीय कंपनीला होती. एम.आय.सी.चे रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो द्रव साठवला जात असे. अशा तीन टाक्या जमिनीखाली होत्या. त्यापैकी एका टाकीमधून द्रव एम.आय.सी.चे गॅसमध्ये रूपांतर झाले.

दुर्घटना

दोन डिसेंबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशीच्या रात्री नाईट पेट्रोलिंग युनिटने जवळच्या पोलीस कंट्रोल रूमला रात्री १.२५ च्या सुमारास पहिली बातमी कळवली की, कसलासा वायू पसरला आहे आणि लोक घाबरून पळत आहेत. वायुगळती युनियन कार्बाईडमधून होत असल्याचाही संदेश पोहोचला. युनियन कार्बाईडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु एकही जबाबदार अधिकारी सापडेना. रात्री दोनच्या सुमारास कंट्रोल रूममधील फोन सतत खणखणू लागले आणि पोलीस केवळ एवढीच माहिती देऊ शकत होते की, शहरात वायुगळती झाली आहे आणि पाण्याचा वापर केल्यास होणारा त्रास कमी होऊ शकेल. मात्र, हा वायू इतका विषारी असल्याची कल्पना यंत्रणेलाच नसल्यामुळे केवळ लोकांमधली भीती दूर करणे आणि पळणाऱ्यांची सुरक्षितता एवढीच बाब प्रामुख्याने त्या रात्री विचारात घेतली जात होती. तीन डिसेंबरची सकाळ उजाडली. सकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत या घटनेची तीव्रता लक्षात आली. मृत्यूने घातलेले थैमान लक्षात येऊ लागले. लोक मृत अथवा घायाळ शरीरे भोपाळ मेडिकल कॉलेजच्या आवारात पोस्टमार्टमसाठी आणून टाकू लागले. या परिस्थितीत नेमक्या इलाजाबाबत डॉक्टरांमध्येही संदिग्धताच होती.

१६ डिसेंबर १९८४पासून ‘ऑपरेशन फेथ’ हाती घेण्यात आले. कंपनीपासून दूरवरच्या कॅम्प्समधून लोकांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या ऑपरेशनपूर्वीच जुन्या भोपाळमधील बरेच लोक उठून निघून गेले होते. १६ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ‘फेथ ऑपरेशन’ सुरू झाले. या प्रक्रियेदरम्यान कंपनीच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी टाकण्यात येत होते. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधूनही सतत पाण्याचा शिडकावा कंपनीवर होत राहिला. लोकांच्या मनात विश्वास उत्पन्न व्हावा म्हणून मुख्यमंत्र्यांसह सगळा अधिकारी काफिला ऑपरेशनदरम्यान कंपनीमध्येच दिवसभर राहत होता. आणि २२ डिसेंबरच्या संध्याकाळी ‘ऑपरेशन फेथ’ संपले.

दुर्घटनेचे परिणाम

या दुर्घटनेत ३,०००हून अधिक लोकांचा काही दिवसांतच मृत्यू झाला तर जवळपास २०,००० लोकांचा या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे मृत्यू ओढवला. भोपाळ वायु दुर्घटना ही उद्योगजगतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना गणली जाते.

दुर्घटनेची कारणे

मिथाईल आयसोसायनेट असलेल्या टाकीत पाणी शिरल्याने ही दुर्घटना घडली. यामुळे रासायनिक अभिक्रिया सुरू झाली ज्यामुळे इतर गोष्टींबरोबरच भरपूर कार्बन डायऑक्साइड तयार झाला. परिणामी प्रतिसादामुळे टाकीच्या आत तापमान 200° से ( 392° फॅ ) पर्यंत वाढले


युनियन कार्बाईडवरील खटला आणि वॉरेन अँडरसनवरील आरोप

युनियन कार्बाईड कंपनीचे त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), वॉरेन अँडरसन यांच्यावर इ.स. १९९१ मध्ये मनुष्यवधाचा खटला भरण्यात आला. अँडरसन यांना १ फेब्रुवारी १९९२ रोजी भोपाळच्या सरन्यायाधीशांनी मनुष्यवधाचा खटल्यामधे न्यायालयामधे हजर न झाल्याने त्यांना फरारी म्हणून घोषित केले. न्यायालयाने अँडरसन यांच्या अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पणासाठी भारतीय सरकारला आदेश जारी केला. अँडरसन यांना अटक होऊ शकली नाही. अखेर व्हेरो बीच, फ्लोरिडा येथील एका इस्पितळात २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

चित्रपट

भोपाळच्या वायुदुर्घटनेवर 'भोपाल एक्सप्रेस' नावाचा महेश मथाई यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट १९९९ मध्ये निघाला. त्यात नसीरुद्दीन शाह यांच्या व्यतिरिक्त के.के. मेनन व नेत्रा रघुनाथन यांनी कामे केली आहेत.

नोव्हेंबर २०२३ मध्ये या घटनेवर रेल्वे मेन ही वेब सिरीझ प्रदर्शित झाली.

पुस्तक

  • याच दुर्घटनेवर दीप्ती मेस्त्री काबाडे यांचे 'भोपाळ नरसंहार' नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकाची ई-आवृत्ती ई-साहित्य वर वाचता येते.
  • भोपाळच्या वायुदुर्घटनेवर सुबोध जावडेकर यांनी 'आकांत' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
  • जाव्हिएर मोरो, लॅपिए डॉमिनिक या फ्रेंच लेखकांनी भोपाळच्या घटनेवर 'Era medianoche en Bhopal' नावाचे पुस्तक लिहिले आहे डॉ. शरद चाफेकर यांनी 'भोपाळमधील काळरात्र' नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

बाह्य दुवे

  • Alfred de Grazia. A Cloud over Bhopal - Causes, Consequences and Constructive Solutions. 2009-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-03-24 रोजी पाहिले. The first book on the Bhopal disaster, written on-site a few weeks after the accident.
  • Students for Bhopal
  • bhopal.net
  • भोपाळ नरसंहार pdf
  • ग्रीनपीस संस्थेचा भोपाळ वायू दुर्घटने वरील लेख/archivo.greenpeace.org/bhopal/informes/Summary%20of%20Study.pdf या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती] (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)