Jump to content

भैरी भवानी

भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी,काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी(राजपूत), खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत.