Jump to content

भेंडवळ

सहदेव भाडळीने प्रस्थापित केलेल्या हवामान आणि पीकपाण्याच्या अंदाजाच्या पद्धतीप्रमाणेच वऱ्हाडात त्याच कामासाठी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे. ही घटमांडणी ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेडवळ गावात होणारी घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, बी-बियाणे कंपन्याही 'बिझनेस'साठी येथे गर्दी करतात.

तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पीकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणते, तरी वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही भेंडवळचे महत्त्व कमी झालेले नाही. अक्षय तृतीयेला या गावात विदर्भ, खानदेशसह अनेक भागातून शेतकरी मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची वाट पाहतात.

शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. मांडणीचे भाकित घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येतो. पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

रामचंद्र वाघ यांनी सुमारे १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली, असे सांगण्यात येते. गावाच्या पारावरील हनुमान मंदिराच्या परिसरात आणि गावातील पूर्वेच्या शेतात अशा दोन ठिकाणी घटमांडणी केली जाते. पारावरची घटमांडणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तर शेतातील मांडणी अक्षय तृतीयेला होते. दोन्ही मांडणींचा अंदाज एकाच दिवशी अर्थातच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सांगण्यात येतो. आज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज वगैरेंनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशीच्या तशी घटमांडणी करून जोपासली आहे.

घटमांडणी आणि निष्कर्ष

अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भेंडवळबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटाची आखणी करण्यात येते. सुमारे सात फ्हूट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात येतो. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात येतात. ही ठेवण्यात आलेली चार ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक मानण्यात येतात. त्यावर पाण्याने भरलेला करवा अर्थात मातीचे भांडे ठेवण्यात येते. करव्यावर वडा, भजे, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी आदी मांडतात. गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह १८ प्रकारच्या धान्याची व खाद्य पदार्थांची प्रतीकात्मक मांडणी करण्यात येते. घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत मानले जाते तर मसूर शत्रूचे प्रतीक आणि करडई संरक्षण व्यवस्था; सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी-कुरडई चारा-पाण्याचे आणि करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे यात झालेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून वाघ कुटुंबातील सदस्य येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवितात.

गुढी पाडव्याची घटमांडणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मारूतीच्या पारावरही घट मांडणी करण्यात येते. त्यानंतर नऊ दिवस पुंजाजी महाराज बाजूच्या गावात भिक्षा मागून आपला निर्वाह करतात. गव्हाचे पीठ गोमूत्रात भिजवून त्याच्या पोळ्या लाटून नऊ दिवस सेवन करतात. या कालावधीत त्यांना जंगलातच राहावे लागते. या दोन्ही घट मांडणीचे निष्कर्ष जवळपास सारखेच असतात.

सातळी गावातली घटमांडणी

भेंडवळप्रमाणेच जळगाव-जामोद तालुक्यात सातळी गावात घट मांडणीवरून भविष्यवाणी कथन करण्याची इ.स. १७०० पसूनची जुनी परंपरा आहे. येथे भालतडक यांच्या घराण्यात अंदाज सांगण्याची परंपरा आहे. सातळीचे निष्कर्श भेंडवळशी मिळते जुळतेच निघाले आहेत.


पहा : सहदेव भाडळी