भूत
समजानुसार, भूत म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा. हा कोणतेही रूप धारण करू शकतो, मनोवेगाने हालचाल करू शकतो व अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यावर मुक्ति पावतो, असा समज आहे.
भूत झालेले काही अतृप्त आत्मे सज्जन असतात तर काही वाईट. बहुतेक भुतांना भांग, दारू, बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुले, लाह्या वगैरे देऊन संतुष्ट ठेवता येते. स्त्री भुते वेतांचे फटके मारल्यावर लगेच वठणीवर येतात. स्त्री भुते प्रामुख्याने दागिन्याने मढलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या, बाहेर बसलेल्या, तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात.[ संदर्भ हवा ]
या भुतांच्या निवासाच्या जागा, या त्यांच्या जातींप्रमाणे तिकाटण्यावर (जिथे तीन रस्ते एकत्र येतात) आपापली स्मशाने, पडक्या विहिरी, पडके वाडे, पडकी घरे, जुने वृक्ष, देवराया, बुरूज, जंगले, पाणवठे, धरणाच्या भिंती, गावांच्या वेशी, वा नदीचे किंवा डोंगरवाटेचे घाट या आहेत. मुंजे, समंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात. अशी झाडे उपलब्ध नसतील तर गोड, सुगंध देणाऱ्या झाडांवर वास करतात असे समजले जाते.[ संदर्भ हवा ]
भुतांना स्वच्छतेची भीती वाटते. त्यामुळे जिथे स्वच्छता असते तिथे साधारणपणे भुतांची भीती कमी असते.[ संदर्भ हवा ]
कोकणातील भुतांचे प्रकार
- अवगत : विधवा स्त्रीचे भूत. हे आवळा किंवा नागचाफ्यावर वास करतात.
- अलवंतीण : बाळंत होताना मृत्यू आल्यास स्त्रीचे ‘अलवंतीण' नावाचे भूत होते.
- आसरा : हे स्त्रीचे भूत असते जे व्यक्तीला पाण्यात ओढून नेते व मारते. हे भूत तळे, विहिर इ. जलशयातील पाण्यात राहते. दरवर्षी आसराची फळे, फुले अर्पण करून पूजा केल्यास त्या शांत होतात व कोणाला त्रास देत नाहीत व कोणालाही पाण्यात बुडवून मारत नाहीत अशी लोकधारणा आहे.
- कालकायक : कालकायकांची भुतं ही भैरवाच्या अंकित असल्याने, ती जास्त त्रास देत नाहीत. त्यांना तृप्त केल्यावर ती प्रसन्न होतात. त्यांची कृपा लाभलेला माणूस १२ वर्षे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगतो. त्यानंतर त्याचा नाश होतो.
- गानगूड :
- गिऱ्हा : गिऱ्हा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे. ते पाणवठ्यावर राहात असे आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत असे. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार या गिऱ्हामुळेच रूढ झाला असावा.
- खवीस : खवीस हे भूत दोन-तीन प्रकारचे आहे, तसेच ते ॲबिसियन लोकांचेपण असे. हबशी किंवा सिद्दी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भुते पण चौदाव्या-पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली.
- चकवा : चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो, आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्यालाच मनघाल्या म्हणतात.
- चिंद : घाटावरचे हे भूत महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याचे अन्न खाते, असे म्हणतात.
- चैतन्य : स्त्रियांना कामुक करून भटकवत ठेवणारा भूत
- जखीण : सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ‘जखीण’ होते.
- झोटिंग : कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भुतांना झोटिंग म्हणतात. झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे, हे हिंदू देवऋषांच्या अावाक्यात नसते, अशी धारणा आहे.
- झोड :
- तळखांब : अविवाहित शूद्र पुरुष मेल्यावर भूत झालाच तर त्या भुताला ‘तलखांब’ म्हणतात.
- दाव : कुणब्याच्या भुताला ‘दाव’ म्हणतात. हे बहुधा एकाकी भटकते.
- देवचार : लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो, तो ‘देवाचार’ होतो. देवाचार भूत गावकुसाबाहेर चारी दिशेला राहते.
- पीस :
- ब्रह्मग्रह : वेदविद्यासंपन्न, पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो, तेव्हा अशा भुताला ‘ब्रह्मग्रह’ म्हणतात.
- ब्रह्मराक्षस : ब्रह्मराक्षस हे पिंपळावर राहणारे सर्व भुतांमधील शक्तिशाली भूत असते. याच्या कचाट्यात कुणी सापडला, तर तो सुटणे अशक्य असते. ब्राह्मणांचा द्वेष करणारे, त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणार व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ‘ब्रह्मसमंध’ या भूतयोनीत जातात.
- मनघाल्या = चकवा
- महापुरुष भूत : वेदपारंगत ब्राह्मणाच्या भुताला ‘महापुरुष भूत’ म्हणतात.
- मुंजा : मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याअगोदर एखादा मुलगा मरण पावल्यावर तो मुंज्या होतो. त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो. उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणांखेरीज क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंजे असतात.
- राणगा : विधुर माणसाचे भूत
- लावसट : ‘अवगत’सारखेच विधवा स्त्रीचे भूत. हेही आवळा किंवा नागचाफ्यावर वास करते.
- वाघोबा :
- वीर श्रेणीतील भुते : ‘वीर’ श्रेणीतील भुते, ही अविवाहित क्षत्रियांची असत. कधी ती अ-मराठी किंवा परप्रांतीय क्षत्रियांचीही असत.
- शाखिणी : अविवाहित स्त्रीचे भूत.
- समंध : समंध ही दोन प्रकारची भुते असतात. पहिल्या प्रकारातील समंध हा संतती न झाल्यामुळे, आणि उत्तरक्रिया न केल्यामुळे होतो. त्याच्या नात्यातल्यांनीच त्याची इच्छा पूर्ण केल्यावर तो शांत होतो आणि आप्तांना मदतसुद्धा करतो. दुसऱ्या प्रकारातील समंध हा जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी असतो. समंध झाल्यावर, तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही.
- सैतान : हा अतिशय वाईट प्रकार आहे.
- हडळ : स्त्री बाळंत होऊन दहा दिवसांच्या आत मृत्यू आल्यास ती ‘हडळ’ बनते. हडळीलाच हेडळी, डाकीण, सटवी असेही म्हणत
- हिरवा :
मराठी साहित्यातील भुते
लोकसाहित्यात अनेक प्रकारच्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या जातात . गावोगावी अनेक प्रकारच्या भुताच्या गोष्टी ऐकायला भेटतात . इंटरनेटच्या उदयानंतर विविध सामाजिक माध्यमांवर खास भुतकथांसाठी अनेक समुह आहेत . युट्युबवर मराठी भुतकाथा आवडीने ऐकणाऱ्या लोकांचाही वर्ग आहे . लिखित साहित्यात नारायण धारप , रत्नाकर मतकरी , दिवाकर नेमाडे यांनी त्यांच्या भयकथेत विविध प्रकारच्या भुतांची संकल्पना वापरली आहे.
(अपूर्ण)